कोविड- 19 हा आजार पसरवणाऱ्या अतिसुक्ष्म अशा कोरोना व्हायरसने जगभरात महामारीचे थैमान घातले घातले. दोन लाखाहून अधिक लोकांचा बळी हा कोरोना आजपर्यंत घेऊन गेला आहे .आणि भविष्यातही आणखी किती लोकांचा बळी हा घेऊन जाईल याचा आज तरी अंदाज वर्तवता येणार नाही. एकंदरीतच संपूर्ण जग आज कोरोनाच्या दहशतीखाली दिसून येत आहे. जगात महासत्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या मोठ मोठ्या राष्ट्रांची या महामारीमुळे अगदीच दैन्यावस्था झाली आहे. अमेरिका, स्पेन,इटली, फ्रान्स, चीन , इराण इंग्लंड यांसह जगभरातील 200 हून अधिक राष्ट्रे आज कारोनामुळे भयभीतआहेत. कोरोणा हा अतिसूक्ष्म पण महाभयंकर विषाणू एखाद्या काल सर्पाप्रमाणे पटापट माणसे गिळंकृत करीत आहे. श्वासामधून व तोंडातील अतिसूक्ष्म जलबिंदू मधून प्रसारित होणारा हा कोरोना विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते आठ दिवस कळतच नाही .आणि एवढ्या कालावधीत संपर्कात आलेल्या प्रत्येकामध्ये तो नकळत पसरतो. आणि पुन्हा नव्याने बाधित या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकात तो पसरतो. त्याची ही गुणाकार पद्धतीने होणारी वाढ व लपून हल्ला करणाऱ्या शत्रू प्रमाणे होणारे आक्रमण ही त्याची महाभयानकता आहे. कमजोर प्रतिकार क्षमता असलेल्या ,मधुमेही, उच्च रक्तदाब असलेले, वृद्ध व्यक्तीवर हा विषाणू सहजपणे कब्जा करतो.शरीराला प्राणवायूचा पुरवठा करणारी श्वसन संस्थाच तो निष्क्रीय करून टाकतो .आणि जीव गुदमरून माणूस शेवटी मृत्यूला कवटाळतो.या महामारीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी सर्वच राष्ट्रांमधील शासन व प्रशासन यंत्रणा प्रथम प्राधान्याने उपाययोजना करीत आहेत. कोविड - 19 हा आजार पसरवणारी माध्यमे सक्तीने प्रतिबंधित केल्यास कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकतो ,याचे उत्कृष्ट उदाहरण भारताने संपूर्ण जगासमोर घालून दिले आहे. घराबाहेरील संपूर्ण मानवी व्यवहार प्रतिबंधित करणे हा त्यावरील सर्वात मोठा उपाय ठरला आहे. त्यामुळे या कालावधीत आरोग्य ,पोलीस, महसूल, स्वच्छता विभाग व पत्रकार वगळता अन्य सर्व शासकीय ,निमशासकीय ,अशासकीय विभागातील कर्मचारी ,कामगार व अधिकारी या कालावधीमध्ये आपापल्या घरातच बंदिस्त आहेत. वृत्तपत्रे, दूरदर्शन किंवा समाज माध्यमांचा अपवाद वगळता प्रत्येक जण हा आपल्या कुटुंबासोबत बाह्यजगातील प्रत्यक्ष संपर्कापासून अलिप्तच असल्यामुळे, प्रत्येकाला आपल्या व्यक्तिगत जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे. प्रत्येक जण आपल्या सवयी , आवडी, छंद व गृहसंस्कार यानुसार या वेळेचा सदुपयोग करून घेत आहे. परंतु, सदासर्वकाळ बाह्य जगामध्ये रममान होणाऱ्या ,निष्क्रीय , आळशी व्यक्तींना मात्र हा कालावधी असह्य होत असावा .. प्रतिभावान व सृजनशील माणसे मात्र जीवनात मिळालेली एक अमूल्य संधी म्हणून याकडे बघून आपले छंद ,नवनिर्मिती , कलोपसना,लेखन ,वाचन याकरिता या वेळेचा सदुपयोग करून घेत आहेत. काही परोपकारी वृत्तीची माणसे विविध मार्गांनी या महामारीशी लढणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करीत आहेत.कुणी विद्यार्थ्यांना ,युवकांना ,नागरिकांना आपल्याला काय देता येईल ,यासाठी समाज माध्यमांद्वारे व विविध संपर्क साधनांद्वारे प्रयत्न करीत आहेत. जीवनालाअध्यात्मिक ज्ञानाचा स्पर्श झालेल्या व्यक्ती मात्र अंतर्मुख होऊन आपल्या जीवनाचा धांडोळा घेत आहेत..अध्यात्मिक दृष्ट्या विचार केल्यास परमेश्वराने प्रत्येकाला चिंतन व आत्मचिंतन करण्यासाठी दिलेला हा एकांत आहे ,असे मला वाटते. लौकिक व्यवहाराचा व बाह्य जगाचा कंटाळाआल्यास किंवा वैतागलेल्या मन:स्थितीत प्रत्येक माणसाला एकांतातच मन: शांती लाभत असते. त्याकरिता प्रत्येक जण एकांत शोधत असतो. योगीपुरुष, संत, महापुरूष यांनी एकांतातच आत्मचिंतन करून आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेच्या योजना आखलेल्या आहेत. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या गाथेतील ' वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा अभंग याठिकाणी आठवतो.या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रापंचिक माणसाला एकांत का आवश्यक आहे, माणसाने एकांतात का जावे याचे महत्त्व सांगतात. एकांताची गरज व महत्त्व समजून घेणे हे केवळ योगी पुरुष ,साधक ,उपासक यांनाच नव्हे ,तर या लौकिक जगामध्ये प्रपंचात यश हवे असलेल्या प्रत्येक माणसाला आवश्यक आहे. व्यावहारिक जगतामध्ये आपल्या सभोवताली वावरणाऱ्या माणसांच्या मनस्थितीचा, जगातील घडामोडींचा आपल्या मनावर नकळत विपरित परिणाम होत असतो. संवेदनशील व सात्विक मनोवृत्तीच्या माणसांच्या बाबतीत ही बाब प्रकर्षाने जाणवते. एकांतातील आनंदी वातावरणामध्ये म्हणूनच मन आनंदी होत असते.. तुकाराम महाराज देहू जवळील भंडारा डोंगरावर तपसाधनेसाठी जात असत. तेथेच त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात.तेथील वृक्ष ,वेली ,वनस्पती, पशु,पक्षी यांच्याशी ते रममान होत असत. तेच जणू त्यांचे खरे सोयरे झाले त्यांच्यापासून मिळणाऱ्या सुखद अनुभूतीमुळेच तुकाराम महाराजांना हा एकांत सुसह्य व आवडीचा झाला होता. या अभंगांमध्ये संतश्रेष्ठ तुकोबारायांनी एकांताचे रसाळ वर्णन केलेले आहे.ते म्हणतात,या वनांमधील झाडे ,वेली ,वनचर ,मंजुळ गायन करणारे पक्षी हेच माझे सखे, स्नेही व सोयरे आहेत . तेणे सुखे रुचे एकांताचा वासनाही गुण दोष अंगा येत* ....आणि प्रियजनांच्या सहवासामध्ये जे सुख आम्हाला लाभते,ते मला यांच्या सहवासात लाभत आहे. आणि त्या सुखामुळे मला हा एकांताचा वास आवडू लागला आहे .आणि त्यामुळे येथे कोणताच शारीरिक, प्रापंचिक व व्यावहारिक गुणदोष अंगाला लागत नाही . *आकाश मंडप पृथ्वी आसन ’रमे तेथे मन क्रीडा करी याठिकाणी विस्तीर्ण अशी पृथ्वी ही बसण्यासाठी साधन असून आकाशाचा मंडप आहे . कंथा कमंडलू देह उपचारा’ जाणवितो वारा अवसरू ’त्याशिवाय शरीराच्या रक्षणासाठी कंथा ( घोंगडी/गोधडी) व कमंडलू असून वेळेची जाणीव व भान करून देणारा शीतल वारा सुद्धा आमच्या मनाला रममान करतो. मी त्याच्या सोबत विविध क्रीडा सुद्धा करतो .तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही विठ्ठलाच्या या कथेच्या जेवणाची गोडी ,रुची या एकांतात निरनिराळ्या प्रकारांनी घेतो....तुका म्हणे होय, मनासी संवाद,आपलाची वाद आपणाशी ’ ...या नैसर्गिक अशा एकांतामध्ये स्वतःचा स्वतःच्या मनाशी संवाद साधता येतो . आपलाच आपणाशी असलेला वाद म्हणजे मन आणि बुद्धीचे आंतरद्वंद्व त्रयस्थ होऊन बघण्याची संधीही या एकांतातच लाभते. तुकारामांसारख्या संतांच्या मुखीचे बोल म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरी वाणी म्हणावी लागेल . आपण जगाकडे कोणत्या दृष्टीने पहावे , आपण फक्त माणसांचाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीचा पण विचार करावा, हेही महाराज सांगून जातात. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असावी. संतुलित पर्यावरण नसेल तर काय होऊ शकते ,याचा अनुभव आपण वेळोवेळी घेतच आहोत..आपल्या सभोवतालचे सर्व सजीव हे माझेच सहचर आहेत. जीवनाचे सहप्रवासी आहेत. हे एकदा का समजले की, मग माणसाला आपण कधीही एकटे आहोत ,असे वाटत नाही. आणि या सर्वांसोबत आपले राहणे आनंदमय होऊन जाते. पण जर सभोवतालची माणसे भिन्न विचारांची असतील, तर मात्र अशा लोकांचा सहवास नकोसा होऊन जातो. आपली मनस्थिती ही स्थिर व अविचल करावयाची असल्यास, एकांत हाच त्याचे अत्यंत उत्तम साधन आहे ,असे अनेक संतांनी सांगितले आहे. जगावर प्रेम करणारा माणूस हा एकांतात जाण्यास कधीही उत्सुक असतो. एकांतात जाण्याचे व्यावहारिक व पारमार्थिक दोन्ही प्रकारचे फायदे व महत्त्व आहे. ज्याला आपले कार्य यशस्वीरित्या पार पडावे असे वाटते ,ती माणसे नेहमीच एकांतात आपल्या कामाच्या योजना आखत असतात .तसेच आपल्या आखलेल्या योजनेप्रमाणे आपले कार्य नीट होते किंवा नाही हेसुद्धा आपणास पाहता येऊ शकते. शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेच्या वेळी एकांतात बसून मोहिमेचे पूर्वनियोजन केलेले असायचे. पौराणिक साहित्य आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहे ते आपल्या पूर्वजांनी एकांतात मुखोद्गत केल्यामुळेच. एकांतातच भगवंताची उपासना, नामजप, परमेश्वराशी तादात्म्य इत्यादी सहजसुलभ होऊन जाते. एकांतातच मी कोण आहे? मी कशासाठी जन्माला आलो आहे? मी कुठे जाणार आहे? याविषयी चिंतन करण्यास वेळ मिळतो. ज्याला आपली स्वतःची प्रापंचिक किंवा पारमार्थिक प्रगती करून घ्यावयाची आहे, जीवन कृतकृत्य करून घ्यायचे आहे ,त्याने एकांतात मनन, चिंतन करून स्वतःचे ध्येय साधावे ,हीच या अभंगाची शिकवण आहे.सध्याच्या या लॉकडाऊनच्या स्थितीकडे सकारात्मकतेने बघितल्यास आम्हाला आमचे जीवनावलोकन करण्यासाठी ,अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्यासाठी, आणि जीवनाचे पुनर्विलोकन करण्यासाठी लाभलेली ही बहुमोल संधी म्हणूनही बघता येईल. आजपर्यंत धावपळीच्या जीवनात आमचे छंद आम्हाला जोपासता आले नसतील, काही गोष्टी करण्याची खूप दिवसांपासूनची सुप्त इच्छा मनामध्ये दडलेली असेल त्या गोष्टी करण्याची ही उत्तम संधी आहे, असे मला वाटते.या कालावधीत काय काय करता येईल याची फार मोठी यादीच अनेक विचारवंतांनी प्रसार माध्यमाद्वारे आपणापर्यंत पोहोचलेली आहे.केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम बघण्यात, झोपण्यात, फोनद्वारे अनावश्यक संवाद साधण्यात , तासनतास मोबाईलद्वारे संदेश अग्रेषित करण्यात आपला बहुमूल्य वेळ न घालवता,जीवनाला शिस्त व चांगल्या सवयी लावण्यासाठी मिळालेली ही एक सुवर्णसंधी म्हणून याकडे बघता येईल..नुकतीच पेपरला आलेली एक बातमी आहे..कोरोना विषाणूमुळे जगभरात प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. यादरम्यान जगभरात मानसिक आजार वाढतील, असा इशारा तज्ञांनी दिला असून याचा प्रभाव आणखी दीर्घ काळ राहू शकतो असे तज्ञांचे मत आहे. लॉक डाऊन व आयसोलेशन मध्ये राहिल्यामुळे लोकांना आपला व्यापार बंद पडेल, नोकरी जाईल ,आणि बेघर होण्याची प्रचंड भीती वाटत आहे. ग्लासगो विद्यापीठाचे प्रोफेसर रोरी कोपनर यांनी सांगितले की, दारु, नशा ,जुगार, नात्यात दुरावा आणि बेघर होण्याची भीती यामुळे लोकांना प्रचंड चिंता वाटत आहे .यातून निर्माण होणाऱ्या नैराश्याकडे दुर्लक्ष केले तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. संकटाच्या काळात लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले तर या लोकांचे जीवनच नव्हे, तर संपूर्ण समाजावर याचा प्रतिकूल परिणाम होईल. ज्या लोकांत गंभीर नैराश्य आहे अशाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, त्यांच्या मनात आत्मघाती विचार येऊ शकतात. त्यावर तंत्रज्ञानातून निगराणीची गरज आहे असे मत केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक एड गुलमोर यांनी व्यक्त केले आहे.
या नैराश्यातून व मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मिक वाचन, श्रवण होणे खूप गरजेचे आहे. त्यातूनच माणसाचे आत्मबल व मनोबल प्रबळ होते. ज्यांची वैचारिक बैठक परिपक्व व प्रगल्भ आहे, अशांनी समाजातील अन्य घटकांना यथाशक्य सहकार्य करून, त्यांचे मनोधैर्य वाढवणे व त्यांना भावनिक दृष्ट्या सुदृढ करून जीवनाविषयी सकारात्मक करणे, ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आजवर आलेल्या महा संकटांचा सामना मानवाने आत्मबलाने व धीरोदात्तपणे केलेला आहे. ही संकटाची काळ रात्र संपून निश्चितच एक नवीन आशादायी उषःकाल होईल, असा विश्वास मनी बाळगू या. दिलेल्या निर्देशांचे पालन करून स्वतःची काळजी घेऊ व इतरांच्याही सुरक्षिततेचे भान ठेवू.. ध्यानधारणा चिंतन-मनन, लेखन, वाचन, श्रवण ,पठन यासाठी घरातच राहू या. एकांती राहून लोकांत साधून जीवनाचे सार्थक करूया. एकांती राहुनी, लोकांत साधिला, तोचि संत झाला या जगती जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांनी हे साध्य केले होते .म्हणूनच आपण म्हणत असतो , धन्य तुकोबा समर्थ, त्यांनी केला हा पुरुषार्थ ’कोरोना हरेल, माणूस जिंकेल
- प्रकाश अंधारे, उपशिक्षणाधिकारी, जि. प.वाशिम