- बा.भो. शास्त्री‘येथीची सेवा ती भूता अविरोधे करावी’सेवेला विविध नावे आहेत. दास्य, भक्ती, कर्म ही सेवाच. हेतू बदलला की, शब्द व अर्थ बदलतो. प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते. नगरसेवक, ग्रामसेवक या शब्दांत सेवा व स्वामित्वाचे मिश्रण आहे. स्वयंसेवक या शब्दांंत स्वामित्व नसते. निर्हेतुक व सहेतुक असे सेवेचे दोन प्रकार आहेत. सहेतुक वाईट नाही. ती जीवनाची गरज आहे व निर्हेतुकाने जीवनाचे सोने होते़ असा एक उत्तम सेवक स्वामींनी सूत्रात घेतला आहे. ‘भक्ती जैसी रामाची लक्ष्मणने केली’ या सूत्रात सेवा भक्तीमय झाली. ते उत्कट प्रेमाचे समर्पण आहे. लक्ष्मणाने अयोध्या तर सोडाच पण वनवासात रामाला भाकरही मागितली नाही. उपाशी राहून तो रामाची सेवा करत होता. अशा सर्वोत्तम सेवकाचा उल्लेख स्वामींनी केला. एकदा गुंफेचे बांधकाम चालले होते. भक्तांनी माती बजवून ठेवली. रात्र गेली. सकाळी परिवार कामाला लागला़ पण ओल्या गारेत मुंग्या झाल्या, स्वामींनी काम बंद केले व म्हणाले, ‘येथीची सेवा ती भूता अविरोधे करावी’ येथे प्रस्तुत सूत्राचा जन्म झाला. एकाला दुखवून दुसऱ्याची सेवा करायची नाही. गरिबांचे घर पाडून मंदिर बांधले जाते, तेव्हा पुण्यात पाप मिसळलेले असते़ वनमहोत्सव साजरा करताना झाडे तोडून मंडप घालायचा व ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविती’ हा अभंग म्हणत ‘झाडे वाढवा झाडे जगवा’ हा संदेश द्यायचा, हा सेवेला दिलेला गळफास नाही का? गीता म्हणते, नर्वैर: सर्वभूतेषुय: स मामेत पाण्डव़ जो सर्वभूतमात्राविषयी निर्वैर असतो तो माझा आहे. असे झाले तर जगात हिंसा थांबेल, ‘युद्ध नको बुद्ध हवा’ ही लोकांची मागणी पूर्ण होईल. तुटत चाललेला माणूस जोडला जाईल हेच स्वामींना अभिप्रेत होते़
‘येथीची सेवा ती भूता अविरोधे करावी’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:14 AM