- प्रा. अशोक झाल्टे शास्त्री, उंडणगावकर
श्री दुर्गासप्तशती आधुनिक संदर्भात
सप्तशतीतल्या ‘कवचा’नंतरचे प्रकरण आहे ‘अर्गलास्तोत्र’ त्याअगोदर सप्तशतीपाठाचा संकल्प आहे. सर्वसाधारणपणे आपली उपासना म्हणजे गंध-अक्षता-फुले उधळून किंवा नारळ-खडीसाखर, उदबत्ती, निरांजन आणि पाठ असलेल्या एखाद्या स्तोत्राने वा मंत्राने होत असते. तिही एक प्रकारे उरकल्यासारखी. सगळाच गोंधळ. गोंधळ असा की, या अनेकांना आपण कशासाठी, काय करतोय, याची कल्पनाच नसते किंवा मग या सर्वांवर त्यांचा विश्वास नसतो. भीतीपोटी ही भक्ती ते करीत असतात किंवा मग परंपरा कुळधर्म पालनासाठी त्यांना हे करावे लागते. सप्तशतीचा आधुनिकसंदर्भात विचार करीत असताना त्या ग्रंथातील प्रत्येक संकल्पनांचा विचार होणे गरजेचे आहे. म्हणजे हे केवळ देवदेव करण्याचे कर्मकांड नसून, त्यामागे मनुष्य जीवनाचे सौख्य आणि कल्याणाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. म्हणून कार्यारंभी संकल्प. संकल्प हा प्रत्येक पूजेत असतो, असावा. कारण त्याचा संबंध आपल्या मनाशी असतो. आपले मन हे अत्यंत शक्तिशाली असते, तसेच ते भित्रेही असते. मनाचे हे भय नाहीसे होण्यासाठी त्या शक्तीचे धारण, संवर्धन आणि क्रियान्वयन होणे गरजेचे असते. श्री दुर्गा सप्तशतीतल्या संकल्पाचा विचार करताना असे ध्यानात येते की, संकल्पविधीमध्ये प्रारंभी चार मंत्र आलेले आहेत. ते असे- ॐ आत्मतत्त्वं शोधयामि नम:स्वाहा. २. ॐ विद्यातत्त्वं शोध यामि नम:स्वाहा. ३. ॐ शिवतत्त्वं शोधयामि नम:स्वाहा. ४. ॐ सर्वतत्त्वं शोधयामि नम:स्वाहा आणि या प्रत्येक तत्त्वाच्या आधी ऐं ºहीम, क्लीम ही बीजाक्षरेही लावलेली आहेत. त्यांचेही अर्थ अत्यंत बोधक आहेतच, ते आपण नंतर बघूत. आपण कशासाठी काय करीत आहोत याची आपल्याला कल्पना असावी. अनेकांना ती असत नाही. त्यामुळे उपासनेतील उपचारावर त्याचा फारसा विश्वास नसतो. हा विश्वास म्हणजेच श्रद्धा. ही श्रद्धा दृढ होणे म्हणजे संकल्प. सप्तशती स्तोत्रातून आत्मतत्त्व-विद्यातत्त्व आणि शिवतत्त्व शोधावयाचा हा जो विचार आलेला आहे तो काय आहे? शोधण्यासाठी मनाची एकाग्रता हवी. त्याचवेळी कुठलेही संशोधनकार्य पूर्ण होईल, कारण व्यवहार आणि उपासना यांचे संतुलन झाल्याशिवाय कार्यसिद्धी होणार नाही. म्हणून संकल्पाचा संबंध इच्छा म्हणजे आत्मतत्त्व, ज्ञान म्हणजे विद्यातत्त्व आणि क्रिया म्हणजे शिवतत्त्व या तीन मूलभूत शक्तींशी आहे. कसा ते बघू. इच्छाशक्ती ही आपल्या मनात विचार आणि विकारांच्या रूपात प्रकटत असते. त्यामुळेच क्रियाशक्ती प्रचलित होते. या क्रियाशक्तीला प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याआधी व्यवस्थित वळण द्यावे लागते. म्हणजेच विचार आणि विकार आधी सुधारले, चांगले झाले पाहिजेत.
उदा. क्रोध विकारापूर्वी त्याचे संयमन केले गेले, तर पुढचा अनर्थ टळेल. विचार आणि विकार हे इच्छाशक्तीतून प्रकटत असतात. म्हणून इच्छाशक्ती संयमित करावी, हा त्यामागचा उद्देश. आत्मतत्त्वं शोधयामि असे ज्यावेळी सप्तशतिकार म्हणतात, तेव्हा त्याचा संबंध केवळ बुद्धिमत्तेशी नसून तो भावाविष्काराशी संबंधित आहे. कारण अध्यात्म समजून घेण्यासाठी भावाविष्काराची आवश्यकता असते. हे आपल्या पूर्वसूरींनी लक्षातच घेतलेले आहे. हाच सिद्धांत आज आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रख्यात असलेले मानसशास्त्रज्ञ व संशोधक डॉ. डॅनियल गोलमन यांनी अत्याधुनिक संशोधनाआधारे मेंदू आणि वर्तनासंबंधीच्या कल्पनांना हादरा देणारे संशोधन करून हे सिद्ध केलेय की, जेव्हा उच्च बुद्धिमत्तेचे लोक अडखळतात तेव्हा मानवी बुद्धीत असे काही घटक कार्यरत होतात ज्यामुळे सामान्य बुद्ध्यांकाची व्यक्ती आश्चर्यजनकपणे बाजी मारून नेते. ते घटक म्हणजेच आत्मजाणीव किंवा सजगता, स्वयंशिस्त आणि समानुभूती. गोलमन यांच्या संशोधनातून हेच सिद्ध होते की, त्यांनी भावनिक जीवनाविषयी नवीन ज्ञानाची संपत्ती आणि प्राचीन शहाणपण यांच्यात चैतन्यशील संबंध प्रस्थापित केलाय, म्हणून आत्मतत्त्वं शोधयामि. हे तत्त्व शोधणे म्हणजे आत्मजाणीव निर्माण करून त्या चैतन्यशीलतेला अनुभवणे. तो अनुभव आला म्हणजे मग त्या तत्त्वाबद्दल जो भाव निर्माण होईल किंवा होतो ती असते भक्ती. त्यानंतर विद्यातत्त्वं शोधयामि, म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि शिवतत्त्वम् म्हणजे वैराग्यप्राप्ती. म्हणजे सप्तशतिकार प्रारंभीच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या त्रिपुटींची उपासना प्रतिपादित करतात. कारण भक्तीरूपी उपासना म्हणजे परिश्रमानंतरचे ज्ञान. श्रमऐव जयते हे आपले घोषवाक्य म्हणून ही भक्ती म्हणजे श्रम देवतेचीच उपासना. त्यातून प्राप्त झालेले ज्ञान हे अनुभवजन्य असेल. ते केवळ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) असणार नाही. आजही अध्यात्मात साधकाला अनेकविध अनुभव येतातच. एकदा हे ज्ञान झाले म्हणजे मनाची संभ्रमावस्था राहणार नाही. ‘टू बी आॅर नॉट टू बी’ तिथे विवेक जागा होईल आणि निर्णयक्षमता विवेकाधीन असेल. त्यानंतरच तत्त्व आहे. शिवतत्त्वम्शिवाय जीवनच अत्यंत पवित्र आणि वैराग्यपूर्ण मानले गेलेय. जीवनाचे खरे ज्ञान आत्मज्ञान झाले म्हणजे जीवनाच्या भौतिक सुख-दु:खातून निवृत्त होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. यालाच वैराग्य, शिवतत्त्व म्हणायचे आणि आता शेवटचे सर्वतत्त्व शोधयामि. यात वरील तीनही तत्त्वांचा शोध असून, तीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. कारण आतापर्यंत आपण हे माझे, ते माझे, इदम्मम इदम्मम म्हणत आलोय आता इदम् नमम, इदम् नमाम असे केवळ म्हणण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष करण्यासाठीचा, त्यागण्यासाठीचा भाव निर्माण होणे म्हणजे खऱ्या अर्थाने वैराग्य. असे हे आध्यात्मिक मनोवैज्ञानिक, तांत्रिक आणि मांत्रिक तत्त्वज्ञान चैतन्यशक्तीच्या उपासनेत आलेले आहे. म्हणून केवळ भोळ्याभाबड्यांची ही उपासना आहे. असे न समजता विद्वानांनी, ज्ञानवंतांनी, बुद्धिवंतांनीही चैतन्यशक्तीची उपासना करावी. सप्तशतीत त्यांच्यासाठी आलेला श्लोक असा- ‘ज्ञानिनापि चेतांसि भगवती हि सा। बलादा कृष्य मोहाय महामाया प्रयच्छति।’ अर्थात ज्ञानी जणांच्या स्फूर्तिचेतनेचे रहस्य भगवतीच्या स्तुती स्तोत्राने फुलते, तेव्हा अशा ज्ञानवंतांना ती आदिमाया जबरदस्तपणे आकर्षून घेते. मग सामान्यजन तर तिच्याकडे आकृष्ट झाल्याशिवाय कसा राहील.