प्रा. अशोक झाल्टे शास्त्री, उंडणगावकर श्री दुर्गा सप्तशती आधुनिकसंदर्भात :वात्सल्य, करुणा ही मातेची, आईची देणगी आहे. आपण जे भौतिक सुख उपभोगत असतो त्यातून शक्तीचा ºहास, नाश होत असतो. महर्षी व्यासांना याची चांगलीच कल्पना होती. ज्ञान होते. म्हणून मानव कल्याणासाठी त्यांनी आपल्या सर्व पुराणातून शक्ती प्राप्तीचे उपाय सांगितलेले आहेत. काळाला आपण टाळू शकत नाही. काळ म्हणजे मृत्यू. त्यापासून आपण आपणास काही काळापर्यंत वाचवू शकतो. शक्ती उपासनेत ती काळरूपी शक्ती उपासकाला प्रसन्न करून घेता आली, तर त्या काळापासून देहाचे संरक्षण प्राप्त होते. सप्तशतीतल्या कवचात ते सामर्थ्य आहे. हे कवच म्हणजे त्या शक्तीची उपासना आणि उप म्हणजे वर किंवा जवळ आणि आसना म्हणजे असणे. वास करणे, उपासक तनामनाने त्या भगवतीशी जोडला गेला पाहिजे. म्हणजे लेकराची नाळ त्या आईशी जोडली जाणे म्हणजे ती आई सर्वपरीने त्याची काळजी वाहत असते. कबीरजी म्हणतात, ‘राम हमारा जप करैं। हम बैठे आराम’ त्यासाठी हवी भक्ती. देवी कवचातून आपणास हाच भक्तीचा राग आळवायचा आहे. काल आपण त्या कवचाचा प्रारंभ पाहिला. ब्रह्मदेव मार्कण्डेयाला म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ अत्यंत गुप्त, पवित्र आणि सर्व प्राणिमात्रांना उपकारक असे हे कवच तू धारण कर, श्रवण कर आणि ते देवीचे नऊ मुख्य अवतार आहेत. त्याची माहिती ऋषींना देतात.श्री देवी चरित्रात नऊ या अंकास अत्यंत महत्त्व आहे. देवीचे नवरात्र, नवचळी, नवदुर्गा, नवमीतिथी, नवार्ण मंत्र, असे हे देवीचे नव अवतार या प्रमाणे.‘प्रथमंशैल पुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चंद्र घण्टेती, कुष्माद्वेति चतुर्थकम ।।३।। पंचम स्कंद मातेति, षष्ठं कात्यायनीतिच, सप्तमं कालरात्रीश्च, महागौरीति चाष्टमम ।।४।। नवमसिद्धि दात्रीच नवदुर्गा: प्रकीर्तिता: उक्तानीतानि नामानि ब्रह्मनैवमहात्मना ।।५।। आधुनिक संदर्भात मी या नऊ नामांचा ज्यावेळी विचार करतो तेव्हा त्या नावाची सार्थकता आजही कशी योग्य व सुसंग आहे हे जाणवू लागते. श्लोकात आलेली नऊ नावे अशी आहेत. १. शैलपुत्री २. ब्रह्मचारिणी ३. चंद्रघण्टा ४. कुष्मांडा ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री.१. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या, शैल म्हणजे पर्वत, गिरी कन्या, अयगिरी नंदिनी पदात तीला शैलसुते म्हटलेले आहे. मनुष्य जीवनात त्याचे ध्येय, आकांक्षा, उच्च असतात, असाव्यात त्या उच्च ध्येयाप्रत पोहोचण्याचा मार्गही उंचच असतो. पहाड, पर्वताची चढण सोपी नसते. काटेकुटे, खाचखळगे, मोठमोठे दगडधोंडे, उंच सखल रस्ता पार केल्यावरच शिखर गाठता येते, तेव्हा त्या शैलपुत्रीचे म्हणजेच ध्येयाचे दर्शन होते. पहाड चढून गेल्यावर मातेचे जे दर्शन होते त्या दर्शनाने सर्व शिणवटा, थकावट दूर होऊन नेत्री ते अद्भुत रम्य, विलोभनीय रूप हृदयी वसते. आनंदाला उधाण आलेले असते, भावना उचंबळून वाहू लागतात. धन्य झाल्यासारखे वाटू लागते. पहाड चढण्याच्या त्या परिश्रमाने एक अनामिक शक्ती तनामनाला व्यापू लागते आणि मग कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस उपासकांत निर्माण होते. हाच तो ध्येयाबद्दलचा आत्मविश्वास, निर्भयता, कुठल्याही विपरीत परिस्थितीत अस्तित्व टिकवून ठेवण्याची जी जी विशा, महत्त्वाकांक्षा याचेच दुसरे नाव जीवनाचे संरक्षित कवच.२. ब्रह्मचारिणी- उपासक उपासनेच्या, भक्तीच्या मार्गावर असताना ही भक्ती जेव्हा परिपक्व होते, तेव्हा मग भक्ताला ज्ञानप्राप्ती होते. ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि आचरणी म्हणजे त्या प्राप्त ज्ञानानुसार आचरण करणे. जीवनातले संकल्पित ध्येय गाठण्यासाठी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ज्ञानार्जित आचरण महत्त्वाचे असते. ज्ञान म्हणजे अनुभव, ज्ञान म्हणजे विवेक, अनुभवाने हा विवेक जागा होतो, कुठे, काय, केव्हा, का आणि कसे करावे, वागावे याची जाण व भान म्हणजे विवेक. आज या ज्ञानी विवेकाची आम्हाला अत्यंत गरज आहे. नव्हे तेच आमच्या जीवनाचे संरक्षित कवच आहे. म्हणून या ब्रह्मचारिणीची पूजा, कारण ब्रह्मचर्य अवस्थेतच सर्व नीती-नियमांचे पालन करण्याची मनोधारणा पक्की, दृढ होत असते. ती दृढ झाली तरच आम्ही नीतिमान.३. चंद्रघण्टा- दुर्गेचे तिसरे रूप आणि नाम आहे चंद्रघण्टा. दुर्गेने आपल्या केसात चंद्रकोर माळलेली आहे. जिचा आकार घण्टेसारखा भासतो म्हणून चंद्रघण्टा. घण्टा हे वाद्य आहे. देवीने रणांगणावर राक्षसांना भीतीने पळवून लावण्यासाठी याचा भयंकर नाद केला ज्यामुळे राक्षस भयभीत होऊन पळू लागल्याचे वर्णन आहे. घण्टानाद असुरांच्या पलायनासाठी जसा आहे तसा तो सौम्य मृदू स्वरात देवांच्या आगमनासाठीसुद्धा आहे, म्हणून आपल्या देवघरात शंखाबरोबर घण्टा असावी. तिची पूजा करताना आगमनार्थ तू देवानाम गमनार्थच राक्षसाम, असे म्हटले जाते. म्हणजेच आमच्या संकल्प सिद्धीसाठी, ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी मार्गात ज्या दुष्ट शक्ती, वाईट शक्ती शिरकाव करू लागतात, तेव्हा भयाची, धोक्याची घण्टा घालवून देण्याची भयप्रद घण्टा वाजवली गेली पाहिजे. त्या भयप्रद घण्टानादात असुरी, वाईट शक्तीचा नि:पात होऊन जे चांगले, मंगल, शुभ आणि कल्याणकारी असेल त्याचे सौम्य मधुर घण्टानादात स्वागतही झाले पाहिजे, म्हणजे दुष्ट शक्तीचा नाश आणि सुष्ट शक्तीचे स्वागत झाले म्हणजे आम्ही उपासक निर्भय होतो. ही निर्भयता म्हणजे देवी कवच.४. कुष्मांडा- असे म्हणतात की, विश्वाच्या निर्मितीपूर्वी काहीच नव्हते. भगवतीला सृष्टी निर्मितीची इच्छा झाल्यावर उष्णतेचे सूक्ष्म अंडे निर्माण झाले. त्यातच विश्व निर्मितीचे बीज होते. कुष्मांड शब्दाची फोड केल्यास कु+उष्म+अंडे अशी होईल. या अंड्यातून विश्व निर्माण करणारी म्हणून ती कुष्मांडा.
शारदीय नवरात्रौत्सव : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा... जाणून घ्या देवीच्या चार रूपांबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 9:00 AM