पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिला श्रावण सोमवार आहे. भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. या दिवसात देशातील १२ ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त आपण तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व जाणून घेऊया...
शास्त्रातील मान्यतेनुसार, या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व कष्ट आणि चिंता दूर होतात. याच कारणामुळे भारतातील प्रमुख १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी होते. त्यातील पहिली तीन ज्योतिर्लिंगांचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे...
1. सोमनाथ
सोमनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातीलच नाहीतर पॄथ्वीवरील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर गुजरातमधील सौराष्ट्र क्षेत्रात आहे. शिवपुराणानुसार, जेव्हा चंद्राला दक्ष प्रजापतीने क्षय रोग होईल असा श्राप दिला होता, तेव्हा या ठिकाणी तप करून या श्रापापासून चंद्रदेवाने मुक्ती मिळवली होती. असेही मानले जाते की, या शिवलींगाची स्थापना स्वत: चंद्रदेवाने केली होती. विदेशी लोकांच्या आक्रमणांमुळे हे मंदिर 7 वेळा नष्ट झाले आहे, पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने उभे करण्यात आले. सातव्या वेळेस हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.
2. मल्लिकार्जुन
हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या तटावर श्रीशैल नावाच्या पर्वतावर आहे. या मंदिराला भगवान शिवच्या कैलाश पर्वतासारखेच मानले जाते. श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे 210 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले.
3. महाकालेश्वर
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी असलेल्या उजैन येथे आहे. या ज्योतिर्लिंगाची खासियत म्हणजे हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. इथे दररोज केली जाणारी भस्मारती जगभर प्रसिद्ध आहे. उजैनचे नागरिक मानतात की, महाकालेश्वर त्यांचे राजा आहेत आणि तेच त्यांची रक्षा करीत आहेत. येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा आहेत. दक्षिण दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे.
आज पहिला श्रावण सोमवार आहे. आज देशातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत. प्रत्येक सोमवारी आम्ही तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्व तुम्हाला सांगणार आहोत.