माकडें मुठीसी धरिले फुटाणे ।गुंतले ते नेणें हात तेथें ।।१।।
काय तो तयाचा लेखावा अन्याय ।हित नेणें काय आपुलें तें ।।२।।
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय ।विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।।३।।
तुका म्हणे एक ऐसे पशु जीव ।न चले उपाव कांहीं तेथें ।।४।।
अर्थ: एका माणसाने माकडाला पकडण्याकरिता युक्ती केली.एका निमुळत्या तोंडाच्या घागरीत फुटाणे ठेवले.सहजच एक माकड फुटाण्याच्या लोभाने तेथे आले व त्याने घागरीत हात घालून मुठीत फुटाणे धरले.पण ( फुटाणे धरल्याने मूठ फुगली आहे त्यामुळे ) हात घागरीत अडकला आहे हे त्यास कळले नाही.।।१।।यात माकडाचा तरी काय अपराध मानावा? कारण,आपले हित कशात आहे ते त्यास कळले नाही.।।२।।
एका पारध्याने पोपटाला पकडण्याकरिता एका मोठ्या नळीत दोर ओवून त्याची दोन टोके दोन झाडांना बांधली व त्या नळीवर पेरू इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले. पोपट ते खाण्याच्या आशेने नळीवर बसताच,त्याच्या अंगाच्या वजनाने ती नळी एकदम फिरली.त्यामुळे त्याचे वर पाय खाली पंख असे झाले.त्यामुळे आपण जमिनीवर पडून मरू अशा कल्पनेने तो पोपट स्वत:चे पाय त्या नळिकेला अधिकच आवळून धरू लागला व आकाशात उडून जाण्यास दोन्ही पंख समर्थ असूनही भ्रमाने तो ते विसरून गेला.।।३।।*ज्ञानीअमरेंद्र श्रीतुकाराममहाराज* म्हणतात,जगात अशी काही पशूसारखी (मूर्ख) माणसे आहेत की,तेथे उपदेशाचा उपायच चालत नाही.
बोलिलों तें कांही तुमचिया हिता ।वचन नेणतां क्षमा कीजे ।।१।।
वाट दावी तया न लगे रुसावें ।अतित्याई जीवें नाश पावे ।।२।।
निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।पोंभाळिता वरी आंत चरे ।।३।।
तुका म्हणे हित देखण्यासी कळे ? ।पडती आंधळे कृपामाजीं ।।४।।
अर्थ:-* मी जो काही उपदेश केला आहे तो तुमच्या कल्याणासाठी होय. माझ़्या बोलण्यातील अभिप्राय न समजल्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही मला क्षमा करा.।।१।।
जो मनुष्य सन्मार्ग दाखवितो त्याच्यावर रागावू नये.कारण दुराग्रही मनुष्य दुराग्रहामुळे वाईट माझ्या जाईल तर त्याच्या जीवाचाही नाश होतो.।।२।।
पोटातील रोग नाहीसा होण्याकरिता,एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील.।।३।।
*लोकतारक श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, 'आपले हित कशात आहे' हे विचारदृष्टीच्या माणसाला कळते.पण जे विचारांध आहेत ते दु:खाच्या खड्ड्यात पडतात.।।४।।
- हभप चैतन्य कबीरबुवा -