- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदायाचा देव ‘श्रीविठ्ठल’ ! संत जेव्हा देव हा शब्द वापरतात तेव्हा तो ब्रह्मवाचक किंवा विठ्ठल वाचक असतो. वारकरी संप्रदायामध्ये पंढरीची वारी ही त्या देवावर निष्ठा व प्रेमभाव व्यक्त करण्यासाठीच आहे. वारकऱ्यांचा असा विश्वास आहे की, भगवान आम्हाला भेटण्यासाठी उभा आहे. ‘‘वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ।।’’त्याच देवाचे स्वरुप व्यापक असून तो विश्वरुपाने नटलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आता विश्वात्मके देवे’’ असे संबोधतात, तर संत तुकाराम महाराज ‘‘ऐसा ज्याचा अनुभव ! विश्व देव सत्यत्वे ।।’’ असे उच्चारातात. ‘‘विठ्ठल जीविचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेला चाळा विश्व विठ्ठले।।’’ अशा प्रकारे संतांनी विश्वाकडे देव म्हणून पहाण्याची दृष्टी दिली आहे, अशी विशाल दृष्टी हीच भक्ती होय. विश्वाकडे भोगपर न पाहाता भावपर, पूज्य दृष्टीने पाहिले पाहिजे. तुकाराम महाराज विठ्ठल रुपाचे वर्णन करतात. त्यात त्यांची दृष्टी विठ्ठलाच्या समचरणावर आणि समदृष्टीवर त्यांनी स्थिर केली आहे आणि प्रार्थना करीत आहेत. ‘‘समचरण दृष्टी विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ती राहो ।।’’ हे प्रभो तुझे समचरण आहेत म्हणजे तुझे आचरण सर्वांसाठी समान आहे तर तुझी दृष्टी भेदभावरहित आहे तसेच माझेही आचरण आणि दृष्टी शुध्द व्हावी, जेणे करुन मी तुझी चांगली भक्ती करु शकेन. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘‘तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी । पाहता पाहणे दूरी सारोनिया ’’ ज्ञानदेव म्हणे ज्योतिची निजज्योति । ते हे मूर्ती उभी विटेवरी ।।’’ हरि तोच विठ्ठल आणि विठ्ठल तोच ओमकार म्हणून शंकराचार्य म्हणतात ‘‘परब्रह्म लिंगम् भजे पांडुरंगम् ।।’’विठ्ठलाची भक्ती निष्काम भावनेच होऊ शकते. जेव्हा निष्काम भावाने आणि नित्ययुक्त होऊन भक्ती केली जाते, अशा भक्तांची त्यांच्या गरजांची योगक्षेत्राची मी काळजी घेतो असे भगवंताने आश्वासन दिलेले आहे. एकूण ईश्वराच्या आत्मरुपावर प्रेम करावे आणि त्याची सेवा निष्काम भावाने करावी. ‘‘ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा । अखंडित सेवा करा त्याची ।।’’
श्रीविठ्ठल
By admin | Published: August 29, 2016 4:02 PM