डॉ. दत्ता कोहिनकर
आजकाल घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . त्यातून ऐन उमेदीच्या काळात तरुण मुले - मुली डिप्रेशनमध्ये जात आहेत. आयुष्याची वाताहत होत आहे . काही जणांना हे दुःख पचवता नाही आले तर ते आत्महत्येकडे वळत आहेत . पूर्वीच्या रूढीनुसार कांदापोहे व चहाच्या बैठकीत ठरलेली लग्न आज मोडत आहे . पहिल्याच वर्षात संसाराची राखरांगोळी झालेली बऱ्याच ठिकाणी दिसत आहे . त्यातून घटस्फोट दावा , पोलिस , कोर्टकचेरी , कौन्सलिंग , एकमेकांना दहशत , भांडणे , प्रसंगी मारामाऱ्या , अपत्यांची हेळसांड यासारख्या भयंकर प्रकारांनी विवाहसंस्था पोखरली जात आहे . एकरकमी पैसे दिले किंवा घेतले तरी मनाच्या जखमा , भावभावनांचे खुन थांबवणे अवघड झाले आहे . प्रचंड मानहानीने घरे रस्त्यावर येताना दिसत आहेत . हा प्रकार थांबवण्यासाठी बैठकीत पसंती झाली तरी
आपल्या मुलामुलींना काही काळ एकमेकांबरोबर घालवू द्या . एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना काही महिने द्या . त्यांना स्वातंत्र्य द्या . काही महिन्यानंतर दोघेही स्वभावाने प्रेमाने एकमेकांच्या पसंतीवर उतरले तरच विवाहबंधनाचा निर्णय घ्या . लंगडत चालणाऱ्या हत्तीचा माहूत लंगडत चालायचा, हत्ती त्याच अनुकरण करायचा . म्हणून गौतम बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलण्यास सांगीतले व तद्नंतर हत्ती लंगडायचा थांबला . जसा हत्ती माहूताचे अंधानुकरण करत होता तशाच काही जुन्या चालीरीतीच आपण अंधानुकरण करतोय . मित्रांनो या लंगड्या हत्तीवर उपचार करा . जुन्या चालीरीती जर जीवनात दुःख आणत असतील तर त्या बदला . या बदलाची आज नितांत गरज आहे . संस्कृतीच्या नावावर अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आज समाजाची मोठी हानी केलीय . एका मुलीचे पती लग्नानंतर एकाच वर्षात वारले . ती नैराश्यात चालली होती, तिच्या आई वडिलांशी चर्चा करून तिचे दुसरे लग्न करून दयावयास सांगितले . ते म्हणाले आमच्यात मुलीचा पुर्न:विवाह करत नाही . अशा विधवा स्त्रियांना सामाजिक चालीरीतीमुळे एकटे रहावे लागते . भावभावनांचा निचरा न झाल्याने त्या नैराश्यात जातात. जास्त चौकटीत राहणारी माणसे दुःखी जीवन जगतात . मध्यम मार्ग हा आनंदाचा पाया आहे . लग्नानंतर मुलाच्या आई वडिलांनी सुनेला धाकात ठेव, डोक्यावर बसवू नकोस व मुलीच्या घरच्यांनी जावयाला आपल्या मुठीत ठेव , सासू सासऱ्यांपासून वेगळ रहा असे सल्ले थांबवले तरच कुटंबव्यवस्था टिकेल. आज मुलामुलींना लैंगिक शिक्षण द्यावयास हवे. "मुलामुलींच्या लैंगिकतेचा विचार आपल्या समाजात केला जात नाही. मुलामुलींशी लैंगिकतेबाबत बोलणंही अनेकवेळा टाळलं जातं. त्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन योग्य लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना स्वतःच्या लैंगिक जाणिवा, नातेसंबंध, स्वतःच्या भावना योग्य प्रकारे कश्या हाताळाव्यात हे समजेल. आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, याचं ज्ञान त्यांना स्वतःला येईल, अशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. याबाबत त्यांच्याशी बोललं पाहिजे." लैंगिकता हा विषय झाकून ठेवल्याने त्यातील रस वाढला जातोय . प्रेम व शारिरिक सुख या भावनांबाबत समाजात जागृती व ज्ञान देण्याची आज गरज भासतीय . मुलांची मने आज नुसती मुलींभोवतीच फिरू लागली तर ही मुले चंद्रावर मंगळावर जाण्याचा विचार करणार कधी ?म्हणूनच प्रेमाला व लैंगिक भावनांना समजुन त्यांना योग्य तो न्याय देणाऱ्या बदलाची आज नितांत गरज आहे .यावर आज दुर्लक्ष झाले तर विवाहसंस्था अजुन ढासळेल . व दुःखी व मनोरुग्ण समाजाची निर्मिती होईल .