- प्रा. डॉ. यशवंत पाटील
‘समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळतेही. पण, ते काही काळापुरते. त्या त्या घटना, प्रसंग, व्यक्ती इत्यादींशी निगडीत असते. ते चिरकालीन नसते. अर्थात या अशा समाधानाला कमी लेखून चालणार नाही. ते मिळवण्याचाही प्रयत्न करावयास हवा. अन्यथा व्यक्तीच्या सर्जनशीलतेला, क्रयशक्तीला बाधा येईल. समाधान-असमाधानाचा झोका अथवा लंबक हा मागे-पुढे होत असतो. हे वास्तव मनोमन ठसवून जीवन जगण्यात ‘मौज’ आहे. ही मौज त्या-त्या क्षणापुरती मनापासून लुटावयास हवी.
समाधानास आशेची, भविष्यातील आशावादाची झालर असावी. यातूनच वर्तमानात मिळणाऱ्या समाधानाची चव कळत असते. उदा. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी शेतात राब-राबतो, ते कोणत्या आशेवर? चांगले पिक येईल, त्यातून समाधान लाभेल या आशेवरच ना? हेच आचार-विचार सूत्र प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे असते, असावे. आशावाद त्यातून मिळणारे समाधान हा विचार लोप पावल्यास जीवनात, कोणतेही काम करण्यात रुक्षता येईल.
‘समाधाना’बाबत सॉक्रेटीस म्हणतो, आयुष्यात समाधान कशाला म्हणावे? तर जे मिळाल्यानंतर वा मिळविल्यानंतर दुसरे अन्य काहीही हवे-हवेसे न वाटणे या मानसिक स्थितीला समाधान म्हणावे. श्री संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘समाधान मिळविण्यासाठी घर-प्रपंच, बायको-मुले, मित्र-आप्तेष्टांकडे पाठ फिरविण्याची गरज नाही. या सर्वांना सोडून कितीही दूर वनात एकांतात डोंगर दऱ्या-खोऱ्यात गेलात आणि मन त्या सर्वांमध्येच गुंतलेले असेल तर समाधान कसे मिळणार? काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपूंचा आणि समाधानाचा छत्तीसचा आकडा आहे. या शत्रूसंगे समाधान नांदूच शकत नाही. ‘षडरिपू बाळगुणी मनी । कोण होईल समाधानी ।’
समाधान प्राप्तीवर ‘सुख-दु:ख समे कृत्वा । मनीचा भाव जयाचा । तो समाधानी अक्षय काळाचा ।। आपले ‘मन’ हेच समाधानाचे खरे मूळ आहे. शीख धर्मगुरू गुरूनानक म्हणतात, ज्याच्या मनरूपी भांड्यास तळच (बूड) नसतो ते भांडे कितीही कशानेही भरा, ते रिकामेच राहते’ प्रयत्न करीतच रहायचे पण, ठेविले अनंते (परमेश्वराने) तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। यावर श्री संत तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला आहे, ‘मन करारे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’ बदलत्या जीवनशैलीतही, सर्व सुख-सुविधांच्या उपलब्धतेत अथवा कमतरतेत ‘मन’ हेच समाधानाचे मूळ आहे.