जेव्हा माणूस मरतो, तो आपले शरीर टाकतो आणि सोबत आपली सदसद्विवेकबुद्धीसुद्धा. पण मनाच्या स्मृतींचा हिस्सा मात्र तसाच कार्यरत राहतो आणि या शाबूत स्मृती मनोवृत्ती म्हणून कार्यरत असतात. या स्थितीत मृत व्यक्तीला निवड करणे शक्य नाही. कारण त्याने आपली सदसद्विवेकबुद्धी गमावली आहे. असे निवड स्वातंत्र्य नसल्यामुळे, जर त्याचा स्मृतिकोश दु:ख आणि क्लेशांनी भरलेला असेल, तर हे दु:ख लाखो पटींनी वाढू शकते. उदाहरणार्थ, या क्षणी जर तुम्ही रागावलात, तर तुम्ही तुमची सदसद्विवेकबुद्धी वापरून राग नियंत्रणात ठेवू शकता. पण जर ही सदसद्विवेकबुद्धी तुमच्याजवळ नसती तर हा राग उफाळून उद्वेग बनला असता. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्या क्षणापर्यंत जे काही त्यांच्या मनात साठलेलं असो, मृत्यूची ती शेवटची घटका अत्यंत महत्त्वाची असते. कारण जर आयुष्यभर त्यांची मनोदशा सामान्यत: आनंदी असेल तर मृत्यूपश्चात तीच स्थिती अनेक पटीने वाढते. आणि मनोदशा सामान्यत: क्लेशदायक स्थितीत असेल तर तेसुद्धा कित्येक पटीने वाढू शकते. एक व्यक्ती अत्यंत क्लेशकारक दशेत असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती नरकात गेली आहे. जर ती अत्यंत आनंदावस्थेत पोहोचली असेल तर आपण म्हणतो ती स्वर्गात गेली आहे.
स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत. या अनुभवाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, विशेषकरून मृत्यूनंतर. योग परंपरेत एक सुंदर कथा आहे. एक चौऱ्यांशी वर्षांचा योगी होता आणि सर्वांना तो सांगत सुटला, ‘तुम्हाला माहीत आहे मी मरणार आहे आणि लवकरच मी स्वर्गात जाणार.’ इतर योग्यांनी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कसं माहीत, तुम्ही स्वर्गात जाणार? देवाच्या मनात काय चाललंय, तुम्हाला माहीत आहे का?’ योगी म्हणाला, ‘देवाच्या मनात काय चाललंय त्याच्याशी मला काय करायचंय. माझ्या मनात मात्र काय चाललंय मला माहीत आहे.’