- डॉ.दत्ता कोहिनकर
रमेश अमेरिकेला गेल्यापासून रमेशची आई संपूर्ण बंगल्यात एकटीच असायची. वडिलांचे निधन होऊन 5 वर्षे लोटली होती. रमेश आईला अधुन-मधुन फोनही करायचा. फोनवर सुनबाई व नातीशी मनसोक्त गप्पा व्हायच्या. रमेश महिन्याला आईसाठी तिच्या अकाऊंटला 20 हजार रूपये पाठवायचा. त्याने सांगितल्याप्रमाणे मी साफसफाई-स्वयंपाक व धुण्याभांड्यासाठी एका बाईला बंगल्यावर - रमेशच्या आईला मदत करण्यासाठी नियुक्त केलं होतं. सगळं कसं छान चाललं होतं. एक दिवस अचानक रमेशचा मला फोन आला. दत्ता घरी जा, आई फोनवर बोलताना तिचा आवाज खचलेला, दुःखीकष्टी वाटत होता. ती व्याकूळ वाटत होती.
माझी व रमेशची लहानपणापासूनची मैत्री. माझे पेपरला फोटो पाहिले की, रमेशची आई लगेच मला फोन करून अभिनंदन करायची. माझे प्रत्येक लेख वाचून फोनवर अभिप्राय कळवायची. मी तीला मावशी म्हणायचो. मावशीचं प्रेम तिने मला भरूभरून दिलं होतं. मी त्वरीत रमेशच्या घरी गेलो व बेल दाबली. दार उघडल्यावर मी मावशीच्या पाया पडून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतलं व काय मावशी - काय झालं? मी आहे ना - असे उच्चारताच, मावशी माझा हात पकडून ओक्साबोक्सी रडू लागली. मी तिला सोफ्यावर बसवलं व थोपटत-थोपटत रडू दिलं व तिला पूर्ण बोलतं केलं. मी मावशीचा हात हातात तसाच धरून तिचं संपूर्ण बोलणं लक्ष देऊन ऐकत होतां. *संपर्ण बोलून झाल्यावर मला लक्षात आल , तिला कित्येक दिवसांत ऐकून घेणार, स्पर्शाने जवळ घेणार, हातात - हात देऊन विश्वास संपादन करणार कोणीही भेटलं नव्हतं. संपूर्ण बंगल्यात रात्रंदिवसाचा एकटेपणा तिला छळत होता. निघताना मी मावशीला प्रेमाने मिठी मारली व मी तुझ्याबरोबर नेहमीच आहे हा विश्वास दिला. जाताना गाडी चालवताना लक्षात आले की, स्पर्शाची ताकद, ऐकून घेण्याची कला किती महत्वाची असते. तरीही आपण स्पर्शाला किती लांब ठेवतो. मित्राला मिठी देण्यास कचरतो, काचकुच करतो, रंध्राना बंदिस्त कुलूप लावतो. काय तर सामाजिक बंधन. मित्रांनो परमेश्वराने आपल्याला प्रज्ञा दिलेली आहे. त्यामुळे स्पर्श कुठे कधी - कसा करावा, कुठे काय बोलावे याचे भान तर प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे. त्याचबरोबर समोरच्या माणसाचे पुर्णतः ऐकून पण घेतले पाहिजे. आज 125 करोड लोकसंखयेचा देश पण आपले म्हणणे ऐकून घ्यायला कोणी उपलब्ध नसल्यामुळे ताणतणावाचे प्रमाण वाढून लोक नैराश्यात जात आहे.
स्पर्शासारख्या सुंदर नैसर्गिक अनुभूतीला आपण मुकलोय. मन मोकळं करायला आज लोक घाबरत आहेत. प्रेमाने मिठी मारल्यानंतर मेंदूत ऑक्सीटोसीन नावाचं रसायन तयार होते. ज्यामुळे स्ट्रेस दूर होतो. ज्या मुलांना बालपणी भरपुर प्रेम व उबदार मिठी मिळाली आहे. अशी मुले मोठयापणी भावनिक स्थिर असल्याचे आढळले. मित्रांनो, मुन्नाभाई MBBS सिनेमातील जादूच्या झप्पीची ताकत तुम्ही पाहिलीच असेन. खरोखर प्रेमाच्या स्पर्शात खूपमोठी ताकत असते. म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना, मुलींना, आई-बाबांना, मित्रांना, नातेवाईकांना, जीवलगांना ‘‘जादू की झप्पी’ द्या. पहा प्रेमात किती पटीने वाढ होते ती. खरोखर जादूच्या झप्पीची ताकदच काही ओर असते.