रमेश सप्रे
ते कुटुंब आपण ज्याला खाऊन-पिऊन सुखी म्हणतो तसं होतं. इथं लक्षात ठेवायला हवं ते कुटुंब ‘सुखी’ होतं. समाधानी किंवा आनंदी नव्हतं. आजकाल दोन हजार पगार मिळवणारी अनेक कुटुंबे अशी खाऊन पिऊन सुखी असतात. काही कुटुंबं तर अति खाऊन-पिऊन दु:खी, रोगीही बनतात.
तर त्या कुटुंबातील दोन्हीही मुलं लग्नाची झाली होती. त्यांची वयंही वाढली होती. कुणी विचारलं तर आई वडील उत्तर देत, ‘योग असावा लागतो, जी गोष्ट जेव्हा, जशी, जिथं घडणार ती तेव्हा तिथं तशीच घडणार, प्रारब्धापुढे कुणाचंही चालत नाही. शेवटी नियती अटळ असते असं म्हणतात तेच खरं’ हे सारं, तत्त्वज्ञान त्या मुलांचे आईवडील लग्नाचा विषय निघाला की सर्वाना सांगायचे. इतक्या तळमळीनं की कुणालाही त्यांच्या प्रारब्ध नियतीवर अढळ विश्वासाबद्दल आदर वाटे.
अखेर त्या दोघांचीही लग्नं ठरली. मुली अनुरूप होत्या. सोय, व्यवस्था यांचा विचार करून दोन्ही लग्नांमध्ये दोन-अडीच महिने अंतर ठेवलं. घरातील सर्व सुखाच्या शिखरावर होती. आनंदात होती कारण ही त्यांची खुशी ‘मुलांची लग्नं ठरणं’ या रेंगाळलेल्या गोष्टीवर अवलंबून होती. अन् आनंद हा निरालंब म्हणजे कशावरही अगदी कशावरही अवलंबून नसतो. काहीही मनासारखं घडलं किंवा मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला आनंदात सहज राहता येतं. साधू संत सत्पुरूष सद्गुरु अशा अवस्थेत कायम असतात.
तर जय्यत तयारी नि भव्य उत्सवी समारंभात मोठ्या मुलाचं लग्न ठरलं. नववधू उंबऱ्यावर ठेवलेलं तांदूळाचं (धनधान्याचं) माप ओलांडून येते. तिच्या गृहप्रवेशामुळे विवाहविधी-सप्तपदी झाल्यावर सर्वांना झालेल्या सुखाचा कळस गाठला गेला होता. त्यांचा संसार त्यांच्या प्रारब्धानुसार सुरूच होता. दुसरे दिवशी कळलं की कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या मालकीच्या खटल्याचा अंतिम निकाल पुढच्या आठवड्यात आहे. तो जर या कुटुंबाच्या बाजूनं लागला तर त्यांची पिढ्यानपिढ्यांची ददात मिटली असती.
अपेक्षाप्रमाणे निकाल लागला. सर्वांनी दिवाळी साजरी केली. घरातल्या आजीबाई म्हणाल्या, ‘हा सारा नव्या नवरीचा पायगुण बरं का?’
याला विरोध कुणीच केला नाही. कारण सर्वाचं अगदी नव्या नवरीचं सुद्धा तसंच मत होतं. सर्वत्र खुशीचं, उत्सवाचं वातावरण होतं.
काळाच्या ओघात लहान मुलाचंही लग्न झालं. मुलगी अनुरूप होतीच; पण मोठ्या सुनेपेक्षा अधिक कार्यकुशल व सद्गुणीही होती. तिनंही उंबऱ्यावरच धान्याचं माप ओलांडून प्रवेश केला. ती तिच्या मनमिळावू, सेवाभावी स्वभावामुळे सर्वांना प्रिय झाली. काही दिवसांनी तीर्थ क्षेत्राला जाताना पितृवत्सल सासऱ्यांचं निधन झालं नि सासुबाईंना पक्षाघाताचा झटका (पॅरॅलिटिक अटॅक) आला. त्या पूर्णपणे परावलंबी बनल्या. पहिले काही दिवस शोक समाचारात, मृत्यूनंतरच्या क्रियाकर्मात गेले. नंतर काही दिवसांनी कुजबुज सुरू झाली. ‘लहान सुनेचा पायगुणच अशुभ!’
दोन्ही घटनांचा विचार एकत्र केला तर काय आढळून येतं?
पहिलीचा पायगुण शुभ कारण खटल्याचा निकाल कुटुंबाच्या बाजूने लागला. यात तिचं काय कर्तृत्व होतं? सर्व तारखा वाद-प्रतिवाद-युक्तिवाद (आर्ग्युमेंट्स ) सारं ती घरात सून म्हणून येण्यापूर्वीच संपलं होतं. निकाल लागला तो अनुकूल होता एवढंच. तसंच दुसरी सून ज्या यात्रा कंपनीबरोबर सासूसासरे तीर्थ क्षेत्रांच्या यात्रेला निघाले होते ती बस काही ती धाकटी सून चालवत नव्हती. घरातली दोघंच जण गेले होते. जी बस दरीत कोसळून इतरही अनेक लोक मृत्यू पावले त्यालाही जबाबदार सुनेचा अशुभ पायगुणच?
ज्याचं त्याचं प्रारब्ध, नियतीनुसार सर्व घटना घडतात तर तिथं ‘पायगुण’ हा घटकच कोठून आला?
आपल्या सर्वांची हीच चूक होते. जे, ज्यावेळी, जिथं, ज्याप्रकारे घडणार असतं ते त्यावेळी तिथं, तशाच प्रकारे घडणार असतं. प्रत्येकावर सामूहिक शुभ-अशुभ घटनांचे परिणाम वेगवेगळे असतात. हेच पाहा ना? त्या अपघातात सासरेबुवा मरणारच होते नि सासूबाई वाचल्या होत्या; पण परावलंबी बनून. त्यांनी खरं तर इतरांना प्रारब्ध नियतीचा सिद्धांत समजून सांगायला हवा होता. लहान सुनेचा काहीही दोष सोडा, साधा संबंधही त्या अपघाताशी नाही तर तिला बिचारीला का दोषी, अवलक्षणी, समजायचं? जीवनातील शुभाशुभ, चांगल्या वाईट घटनांचा असा विचार नि स्वीकार थोडे जण करतात. फारच थोडे. सासूबाईंनी ज्यावेळी ‘सुनेचा अशुभ पायगुण’ असं म्हटलं तेव्हा इतरांना तसं म्हणण्याचा परवानाच मिळाला. विचार करू या. आपण अशा परिस्थितीत काय केलं असतं? सासूबाई व इतर अनेकांसारखंच आपलं ‘सुनेचा अपशकुनी पायगुण’ हेच मत असेल तर अशा सा-यांसाठी मराठीत एक अप्रतिम म्हण आहे. ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वत: कोरडा पाषाण’
आपण जरी जीवन ज्ञान (ब्रह्मज्ञान नसलं तरी चालेल) स्वत: जगलो तर आपल्या अंत:करणाच्या कोरड्या पाषणातून आनंदाचे चिरंतन झरे वाहू लागतील, वाहत राहतील.