मनुष्यजीवनाच्या अत्युच्च ध्येयाचे निर्धारण म्हणजे अध्यात्म. माणसाच्या जीवनात आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन प्रकारची साध्ये असतात. सुखप्राप्तीसाठी माणूस भौतिक पदार्थांचा आश्रय प्रामुख्याने घेत असतो. परंतु, पदार्थांपासून मिळणारे सुख हे अशाश्वत आहे, हे अध्यात्म संत-महात्मे सतत शिकवत असतात. आपल्याला हवे असलेले सुख- सुखदायक भाग्य हे धनात आहे असे आपल्याला वाटत असते. परंतु, संत सांगतात की, धनात मिळणारे सुख हे नश्वर आहे. 'तुका म्हणे धन, भाग्य अशाश्वत जाण' त्यामुळे खरे भाग्य भक्तीत आहे, भक्तीचा जिव्हाळा जाणणाऱ्यात आहे, असेच संतांचे प्रतिपादन असून त्यातच आध्यात्मिक सौख्याचे रहस्य आहे.
आधिभौतिकात भोग आहे तर अध्यात्मात त्याग आधिभौतिकात प्रपंच आहे, तर अध्यात्मात परमार्थ आधिभौतिकात प्रवृत्ती आहे तर अध्यात्मात निवृत्ती आधिभौतिकाच्या ज्ञानसंपादनातून मनुष्याचे ऐहिक जीवन ऐश्वर्यसंपन्न होत असते तर अध्यात्म ज्ञानाने मनुष्याची दैवी संपत्ती संवर्धित होऊन कृतार्थता प्राप्त होते़.
पुरुषार्थ चतुष्ट्यातील अर्थ आणि काम हे पुरुषार्थ मनुष्याच्या ऐहिक जीवनातील ध्येये सिद्ध करणारे असून त्यांची पूर्तता आधिभौतिकातून होत असते. मनुष्याने सबल, कुटुंबवत्सल, आरोग्यसंपन्न असावे, आपल्या संसारातील कर्तव्यांचे यथायोग्य पालन करावे, जगण्यासाठी व उपभोगासाठी आवश्यक असलेली भौतिक साधने एकत्र करावीत, स्वत:साठी व कुटुंबियासाठी भौतिक साधन सुविधांची रेलचेल करावी यालाच सुखी संसार मानले जाते. अशा सांसारिक सुखासाठी आधिभौतिक पदार्थांचे महत्त्व आहे, हे नाकारता येत नाही.
त्यामुळे सुयोग्य प्रमाणात भौतिक साधने आवश्यक असली तरी त्यांच्यातच सगळे सुख आहे असे मानणे चुकीचे आहे. उलट उपभोगाच्या साधनांची अतिरिक्त वाढ झाली तर जीवनात भोगवाद वाढत जातो. अशावेळी अध्यात्मातील त्यागाचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक ठरते.
भौतिक साधनांची, पदार्थजन्य भोगांची हाव हीच अशांतीचा, व्याभिचाराचा व असत्याचा मार्ग प्रशस्त करीत असते. काम, क्रोध, लोभ हे तीन नरकाचे दरवाजे असून ते भोगवादामुळेच उघडले जातात. उपभोगामुळे कामनांची निवृत्ती होत नसते. 'भोगी काम वाढे' असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशावेळी माणसाच्या अंत:करणातील भौतिक सुखाच्या उपभोगाची इच्छा क्रमाक्रमाने कमी करून, मनुष्याचे अंत:करण ध्येयाभिमुख व्हावे यासाठीच अध्यात्मशास्त्र प्रवृत्त होते.
ऐहिक जीवनातील ऐश्वर्य, उत्कर्ष, भोगवाद यांच्यातच जीवनाची कृतार्थता मानणाऱ्या माणसांना नि:श्रेयसाचा मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी सर्वच संतांनी अध्यात्माचे महत्त्व वर्णिलेले आहे. संत अध्यात्माचे महत्त्व सांगतात याचा अर्थ त्यांना भौतिक प्रगतीचे, ऐश्वर्याचे, सुखी संसाराचे मुळीच महत्त्व वाटत नव्हते, असे नाही़ संतांनी धनाचे महत्त्व मानले आहेच, परंतु ते धन 'उत्तम व्यवहारातून जोडावे' यावर त्यांचा कटाक्ष आहे़ भौतिक व आध्यात्मिक, ऐहिक व पारत्रिक, व्यावहारिक व पारमार्थिक यांचा विरोध नव्हे, तर सुयोग्य उपकारक असा समन्वय संतांना अभिप्रेत होता.
संसारातील सुख हे क्षणिक आहे, नाशवंत आहे हे अध्यात्मातून कळते व त्यासाठी होणाऱ्या संघर्षाचा अंत होतो. अध्यात्मामुळे माणसाच्या अंत:करणातील मोह, अज्ञान, द्वेष, द्वैत, अहंकार, शत्रुत्व अशा दुर्गुणांचा अंत होतो. सत्प्रवृत्तींचे संवर्धन होते़ भौतिक ऐश्वर्याचा उपयोग स्वार्थासाठी-उपभोगासाठी करण्याऐवजी परोपकारासाठी-समाजहितासाठी करण्याची प्रेरणा अध्यात्मातूनच मिळत असते. त्यासाठीच आपण 'अध्यात्माचा नंदादीप' लावत आहोत.
- प्रा. डॉ. शरदचंद्र देगलूरकर, धुंडा महाराज मठसंस्थान, देगलूर, जि. नांदेड