अज्ञानाचा संपूर्ण नायनाट करणारी एखादी अमोघ शक्ती प्राप्त होते. आपणाला आपल्यात बदल झालेले जाणवतात. स्वत:त परिवर्तन झाले, स्वत्वाचा शोध लागला म्हणजे आत्मप्रकाशाची जाणीव होते. माणसे नेहमी दुसऱ्याचा विचार करतात, स्वत:मध्ये कधी डोकून बघत नाहीत. त्याची त्यांना कल्पनासुद्धा येत नाही. स्वत:ची जाणीव झाल्याशिवाय ईश्वराची वाट सापडणार नाही. ईशतत्त्व प्रथम स्वत:मध्ये यावे, कारण जे स्वत:त आहे तेच ईशतत्त्वात आहे. फक्त जाणीव होणे महत्त्वाचे आहे. कारण ‘स्व’ची आत्मानुभूती येणे म्हणजे ईशतत्त्वाची जाणी होणे होय. ज्यांनी स्वत:ला ओळखले ते ईश्वराला ओळखू शकतात.
आपल्यामध्ये अनंत शक्ती निवास करतात. त्या शक्ती क्रियान्वित करव्या लागतात. योगी आपल्या कुंडलीद्वारे आतल्या शक्तींची जाणीव करून देतात. आतल्या शक्ती जागृत केल्यास ब्रह्मांडात फिरता येते. एका जागेवर बसून ब्रह्मांडाला पाहता येते. पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते. ‘स्व’ला विकसित केल्यास याची प्रचिती येते. मूलाधार चक्रापासून सहस्त्राकार चक्रापर्यंत कुंडलीचा प्रवास म्हणजे जागृती होय. या कुंडलिनी शक्ती तत्त्वाच्या पायऱ्या विकसित करीत चालते. ‘स्व’त्वाची क्रियात्मक शक्ती विकसित झाल्यास आत्मानंदाची पहाट उजाडते. त्या पहाटेच्या अमृतरूपी किरणात न्हाता येते, मग आत्मशक्तींचा प्रत्यय येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांचा उलगडा होतो. जल, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वाशी समरसता साधता येते.
जीवनाच्या वाटेवरचा प्रवास आल्हाददायक होतो. स्वत्व गुणांची वृद्धी होते. सात्त्विकतेचा पान्हा येतो. आत्मज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडतो. त्या प्रकाशात मनाची गती शांत राहाते. मनाचा कोवळेपणा नाहीसा होऊन, ऊर्जात्मक स्पंदने स्थिरता प्राप्त करून घेतात. आत्मानंदाच्या कृपावलयात मानवी जीवनाचे अंतिम सत्य सापडते. जीवनाचा मार्ग सुखकर करावासा वाटत असेल तर स्वत्वाला ओळखा. ‘स्व’तत्त्व हेच संजीवन तत्त्व आहे. त्याची जाणीव ठेवा.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)