रमेश सप्रे
जसा थेंबाथेंबांचा मोठा जलाशय बनतो. वाळूच्या कणांचं विशाल वाळवंट बनतं. श्वासाश्वासाचं आयुष्य बनतं. तसंच क्षणाक्षणाचं जीवन बनतं. प्रत्येक क्षणाला काहीतरी घडत असतं. याचीच बनतात क्षणचित्रं. जीवनातले छोटे छोटे प्रसंग फार मोठी शिकवण देऊन जातात. हेच पाहा ना. रस्त्याच्या कडेला निरनिराळ्या वस्तू मांडून त्यांची विक्री करणारी व त्या वस्तू खरेदी करणारी मंडळी खूप असतात. बरीचशी मंडळी आपापल्या गाडय़ा थांबवून या वस्तू विकत घेतात असे विक्रेते नि असे ग्राहक यांच्यातील व्यवहाराची ही काही क्षणचित्रं पाहूया.
* काही वर्षापूर्वीची ही गोष्ट. एक म्हातारी रस्त्याच्या कडेला काकडय़ा विकायला बसली होती. मित्रानं दुचाकी थांबवून खाली न उतरताच त्या काकडय़ांचा भाव विचारला. तिनं तो सांगितल्यावर मित्रानं आणखी कमी किमतीत काही काकडय़ा मागितल्या. ती म्हातारी थकलेल्या आवाजात म्हणाली, ‘घे बाबा. सकाळपासून एकही काकडी खपली नाही; पण आमच्याकडे भाव कमी करून मागता; पण आम्ही दुकानात गेल्यावर घ्याव्या लागणा-या तेल तुपाची नि पिठामीठाची तुमच्या एवढीच किंमत आम्हाला द्यावी लागते. त्यांना कमी भावात मागता येत नाही.’ असं म्हणताना तिच्या सुरकतलेल्या चेह-यावर नि निस्तेज डोळ्यांमध्ये अगतिकता भरलेली होती. मित्राला काय वाटलं कुणास ठाऊक? पण तो खाली उतरला नि म्हणाला, ‘माय तुझ्याकडच्या सगळ्या काकडय़ा तू सांगशील त्या किमतीला घेतो. ’ त्यानं खरंच त्या घेतल्या. वरच्या मोडीचे पैसेही तिलाच ठेवायला सांगितले. गाडी चालू करताना एवढंच म्हणाला, ‘ती म्हणाली ते किती खरं होतं! आपण असा विचार का करत नाही?’
* आता हे दुसरं क्षणचित्र. पणजीतील सचिवालयासमोर असलेलं हिशेबाचं कार्यालय (फाजेन्द) नेहमीप्रमाणो अळम्यांच्या दिवसात काही स्त्री-पुरुष अळमी विकायला बसले होते. पानात बांधलेल्या त्या अळम्यांचा दर शंभर अळम्यांसाठी होता. एकानं त्या विकत घेऊन मोजून पाहिल्या तर होत्या फक्त साठ. पैसे मात्र १०० अळम्यांचे घेतलेले. ‘असं का?’ विचारल्यावर त्यानं दिलेलं उत्तर अगदी मासलेवाईक होतं. तो म्हणाला, ‘ साहेब, सारखं मोजता आलं असतं तर आत ऑफिसात टेबल खुर्चीवर नसतो का बसलो तुमच्यासारखं? इथं बाहेर फुटपाथवर कशाला बसलो असतो?’ निरुत्तर करणारं हे उत्तर ऐकून दुस-यानं विचारलं, ‘तुला नीट मोजता येत नाही तर कधी शंभराच्या ठिकाणी साठ मोजतोयस तसा चुकून एकशेवीस कसा मोजत नाहीस? ‘आता निरुत्तर होण्याची पाळी त्या अळमीवाल्याची होती.’
* भाजी विकणारी एक बाई अशीच रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत म्हणजे अर्धा दिवस उन्हात बसली होती. एक शानदार गाडी थांबवून भारी साडी नेसलेली एक महिला झोकात उतरली नि घासाघीस करून भाजी घेऊ लागली. कोथिंबीरीची जुडी हातात घेऊन ती श्रीमंत महिला उद्गारली ‘किती बारीक आहे गं ही? हिला काय जुडी म्हणतात?’ हे ऐकून ती भाजीवाली नम्रपणे म्हणाली, ‘बाई, ही जुडी विकूून आम्ही काय तुमच्यासारखी गाडी घेणाराय, की माडी बांधणाराय, की असली उंची साडी घेऊ शकणाराय?’ तिचा तो प्रश्न ऐकून ती साडी-गाडीवाली सर्दच झाली. मोकळ्या मनानं म्हणाली, ‘खरंय तू म्हणतेस ते! आम्ही असा विचार करायला हवा.’
* आता हा फळवाला बघा. देवाच्या प्रसादासाठी म्हणून एका गृहिणीनं काही ऍपल घेतली. फोडी करून घ्याव्यात म्हणून तिनं कापल्यावर सगळी ऍपल आतून पूर्ण काळी झालेली होती. तशीच कापलेली ऍपल घेऊन ती त्या फळवाल्याला दाखवू लागली. तो तिला दमात घेऊन म्हणतो कसा ‘मी काय ऍपलच्या आत शिरून ती पाहिली होती?’ बाजूची काही गि-हाईकं हसू लागली. हे पाहून त्या बाईनं चढय़ा आवाजात विचारलं, ‘ ऍपलमध्ये नाही; पण गोव्यात तरी शिरलायस ना? बाहेर फेकून देऊ तुला.’ तिच्या आवाजातलं ते तेज नि ती जरब पाहून त्यानं मुकाटय़ानं दुसरी ऍपल दिली. त्यातही तो शिरला नव्हता; पण ती निश्चित चांगली असणार होती.
* हे चित्र मात्र डोळ्याच्या कडा ओलावून अंतर्मुख बनवणारं आहे. हमरस्त्याच्या (हायवेच्या) दोन्ही बाजूला थोडय़ा थोडय़ा अंतरानं कलिंगडं विकायला बसले होते. काही पुरुष, ब-याचशा स्त्रिया आमचा एक नियम शक्यतो स्त्रीकडून खरेदी करायची. कारण तिला मिळणारे सर्व पैसे कुटुंबासाठीच खर्च होणार असतात. पुरुषाची मात्र व्यसनं, जुगार यातून उरलेले पैसे कुटुंबासाठी येतात असो. त्या दिवशी मात्र एक जख्ख म्हातारी चार कलिंगडं घेऊन बसली होती. ‘आजी, कशी दिली कलिंगडं?’ थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ‘बाबा, पन्नास रुपयाला एक. एक तरी घे रे सकाळपासून एकही खपलं नाही. मुलानं नि सुनेनं सांगितलंय, सगळी खपल्याशिवाय घरी यायचं नाही. उपाशी आहे हो सकाळपासून!’ तिची ती परिस्थिती पाहून आमच्याकडे असलेले खाद्यपदार्थ तिला दिले, पाणीही दिलं. चारही कलिंगडं घेतली. थरथरत्या हातानं नमस्कार करत ती म्हणाली. ‘देव बरें करूं’ त्यानंतर जेव्हा जेव्हा तिकडून जाण्याचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा तिची सारी कलिंगडं आम्ही घेऊ लागलो. तीही दुवा द्यायला विसरत नसे. पण हे काही वेळाच शक्य झालं. नंतर ती दिसली नाही. शेजारच्या बाईला विचारल्यावर ती म्हणाली, ‘ती आजी देवाघरी गेली’ मनात विचार आला की आता कोण कुणाला म्हणणार ‘देव बरें करूं?’