मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं आणि एखाद्या स्थिर ध्यानस्थ वटवृक्षासारखंही असतं. वृक्ष हे मौन बाळगून असतात म्हणून विशालरूप धारण करीत जातात. त्याची पाळंमुळं खूप खूप खोलवर रुतलेली असतात. वादळवाºयातसुद्धा उन्मळून पडण्याची किंचितही शक्यता नसते.
परंतु चंचल मनाला मात्र फार कष्टातून प्रवास करावा लागतो. मन बुद्धिधर्माचीसुद्धा स्थिरता पूर्णपणे नष्ट करून टाकतो. दिवसातून काही वेळ मनाला शून्यात नेऊन मौनव्रत साध्य करण्याचा प्रयत्न केला तर शरीरात नवचैतन्य प्राप्त होतं. शरीर हे मनबुद्धीचं गुलाम असतं. अनेक आजारांचं मूळ हे मनच असतं. बाभुळीच्या बीजातून बाभुळीचंच रोपटं येणार तसं मनोबीजाचं असतं. जसा विचार असेल तसेच पडसाद शरीराला सोसावे लागतात. चिन्ह बिथरलं की मन सैरावैरा पळत सुटतं. जसा खवळलेला समुद्र किनाºयावरचं सर्व नष्ट करू शकतो तसं उन्मत्त मनाचं लक्षण नष्टतेच्या मार्गावरूनच प्रवास करीत असतं. एखाद्या अट्टल गुन्हेगाराची मनाची अवस्था अभ्यासली तर एकच लक्षात येतं राहतं की त्याच्या मनातूनच वाईट कृत्याची धार वाहत राहते. त्याने सकारात्मक विचार क्षमतेची बाजू गमावलेली असते. बुद्धी एकदा मनाची गुलाम बनली की उभं आयुष्य फरपटत जाण्याची मोठी शक्यता निर्माण होत राहते.
अनेकांना मरेपर्यंत मनाच्या आजारातून बरे होता येत नाही म्हणून ज्या ज्या व्यक्तीने मौनव्रताचं नित्यनेमाने पालन केलं त्यामध्ये कासवाच्या पावलाने का होईना सुधारणा होत राहण्याची शक्यता निर्माण होत राहते. अगदी पुराणातील ग्रंथांमध्येही मौनव्रताच्या लाभाची उदाहरणं आढळतात.विजयराज बोधनकर