- वामनराव देशपांडेप्रापंचिक जीवनात आपली पत्नी, मुले, घर, वस्तू जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार या सर्वांविषयी जी एक ओढ लावणारी आसक्ती निर्माण होते, आत्मीयता निर्माण होते, ती मनातून गळून पडणे साधनेला पूरक ठरते. दु:खाच्या संयोगाचा वियोग माणसाला आवर्जून सुखाची प्राप्ती करून देते. म्हणून साधक भक्ताने प्रापंचिक आसक्तीचा, म्हणजे प्रापंचिक वृत्तीचा त्याग करणे, साधनेला पूरक ठरते. मानवी जीवनात अनुकूल वातावरण भोवती असेल, तर मन सुखाच्या झुल्यावर झुलत राहते आणि प्रतिकूलतेचे झोंबरे वारे वाहू लागले की मन अवस्थ होते.हे दोन्ही मनाचेच खेळ आहेत, हे साधकाने प्रथम लक्षात घेऊन स्थिरचित मनाने सर्व प्रतिकूल आणि अनुकूल घटनांचा स्वीकार करायला हवा. ‘समत्व चित्ताचे’ हाच मानवी जीवनातला सर्वोत्तम योग आहे. थोडक्यात, दु:खपर्यावसायी सुखाचा साधकाने त्याग केला पाहिजे. सुखदु:खाची झळ प्रत्येक माणसाला आयुष्यभर सोसावीच लागते. हे तर सत्यच आहे. भगवंत त्या संदर्भात म्हणतात की,पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम।पुन्हा-पुन्हा जन्म घेणे हा जिवाला मिळालेला एक शापच आहे. कारण देह धारण केला की, असह्य दु:ख आयुष्यभर सावलीसारखे सोबत करते. याला अपवाद फक्त संत पुरुष. कारण हे महात्मे परमेश्वराची प्राप्ती व्हावी, म्हणून देहभावनेने जगणे विसर्जित करून आत्मसाक्षीने प्रत्येक क्षण नाम घेत जगतात, असे महात्मे दु:खमुक्त आयुष्य अत्यंत आनंदाने जगतात. देहसाक्षीने जगणे हाच सर्वात मोठा दोष आहे. मर्त्य शरीराशी आणि भोवतीच्या जड मर्त्य सृष्टीशी जिवाचा नित्य संबंध जोडला गेल्यामुळे, शारीर जाणीवेने आयुष्य जगण्याची माणसाला सवय जडल्यामुळे, जड पदार्थांचा, नित्याचे आयुष्य जगताना आश्रय घेतल्यामुळे मानवी मर्त्य आयुष्यात तºहेतºहेचे दोष निर्माण होतात.
प्रापंचिक आसक्ती मनातून गळून पडणे साधनेला पूरक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 5:06 AM