भागवत धर्मामध्ये अशी मान्यता आहे कि या जगामध्ये एकंदर ८४ लक्ष योनी आहेत व चार खाणी आहेत. जारज, अंडज, उभ्दिज आणि स्वेदज अशा या चार खाणी आहेत. म्हणजे जगातील यच्चयावत प्राणी या वर्गातील आहेत. पण! या सर्व प्राण्यामध्ये मनुष्य हा सर्वात बुद्धिमान आणि चाणाक्ष आहे. स्वत:विषयी जाणून घेण्याची क्षमता फक्त मनुष्य देहातच आहे. कोहं कथामिदं जातं । मी कोण आहे? मला कोठे जायचे आहे? हे प्रश्न फक्त मनुष्याला पडतात. इतर प्राण्यांना असे प्रश्न पडत नाही. पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह नेमका आहे तरी कसा? याच्या अवस्था किती आहेत? अंतिम सध्या काय आहे? हा देह पडल्यावर पुढे काय? मी कुठे जातो किंवा पुढे काही वेगळी गती आहे कि नाही? हे आणि असे अनेक प्रश्न ज्याला पडतात, त्याला शास्त्रीय भाषेत मुमुक्षु म्हणतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तात्विक चिंतनाची जरुरी आहे. हे चिंतन तुम्हाला शास्त्रात मिळते. शाश्त्र यथार्थ फक्त संतांकडूनच जाणून घेता येते.या देहाच्या मुख्य तीन अवस्था आहेत जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृत अस्वस्था ही स्थूल देहाची आहे. स्थूल देहसंबधी सर्व व्यवहार याच अवस्थेत होतात. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये या अवस्थेत कार्यरत असतात. या अवस्थेची व्यावहारिक सत्ता असते. सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था असते. या अवस्थेची प्रतिभासिक सत्ता असते. स्वप्नावस्थेतील पदार्थ अनिर्वचनीय असतात. सुषुप्ती अवस्था म्हणजे गडद अज्ञान. विश्व , तैजस, प्राज्ञ हे क्रमश: तीन देहाचे अभिमानी आहेत. या तीनही देहाचा, त्यांच्या अस्वस्थेचा साक्षी चैतन्य असतो. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ।। असो ! स्वप्नस्थ पदार्थ फक्त स्वप्नकाळी सत्य असतात. जागृतीत आले कि ते मिथ्या ठरतात. तसेच जागृती सुद्धा एक प्रकारे स्वप्नच आहे नव्हे. ती दीर्घ स्वप्न आहे. जेव्हा ब्रहमज्ञान होते तेव्हा हि जागृती सुद्धा मिथ्या ठरत असते. वेदांताचा एक नियम आहे. सामान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. सत्ता भिन्न असेल तर व्यवहार होत नाही. स्वप्नातील पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत आणि जागृतीतील पदार्थ स्वप्नात उपयोगाला येत नाही. माउलींनी त्यांच्या एका अभंगात सांगितले आहे. स्वप्नीचिया घायी विव्हळे जो साचे । चेईल्यावरी म्हणे मी न वचे ।। जन कैसे माया भुलले । आपले स्वहित आपण विसरले ।। किंवा "स्वप्नीचिया घाया । ओखद चेववी धनंजया । तैसे अज्ञान यया । ज्ञानची खङग ।। उदा. स्वप्नामध्ये एक मनुष्य फिरत फिरत जंगलात गेला. अचानक त्याच्या मागे एक लांडगा लागला हा मनुष्य धावत पळत सुटला पण शेवटी दमला आणि त्याला लांडग्याने जोरात चावा घेतला त्याला भयानक वेदना होऊ लागल्या. एवढ्यात त्याला जाग आली आणि पाहतो तो काय लांडगा नाही आणि जखमही नाही कारण सत्ता भिन्न असून अवस्था बदलली स्वप्नातून जागृतीत आला त्याबरोबर वेदना सुद्धा गेल्या. माउली आणखी सांगतात, जैसा चेईला तो अर्जुना । म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना । मीची जाहलो होतो ना । निद्रावशे ।। ज्ञा. ९-१५-४६।। स्वप्न का पडले? तर झोप आल्यामुळे. जागृतीत स्वप्न पडत नाहीत अर्थात दिवा स्वप्न हि आणखी वेगळी गोष्ट आहे. जेव्हा स्वप्नातील मनुष्य जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येते कि स्वप्नातील पदार्थ हे अनिर्वचनीय आहेत, नव्हे ते जागृतीत येऊ शकत नाहीत कारण स्वप्नांतील पदार्थ मीच झालो होतो. संत एकनाथ महाराजांनी फार छान दृष्टांत दिला आहे, भ्रतार शेजे निजोनि नारी । स्वप्न वैधवे शंख करी । भ्रतार तियेसी पुसे जरी । म्हणे मी रांडवले ।। नवराबायको त्यांच्या शयनगृहामध्ये झोपले होते. त्यावेळी त्याच्या बायोकोला स्वप्न पडले ते असे कि, एका अपघातामध्ये तिच्या नव-याचे निधन झाले आणि ती मोठ्याने रडायला लागली. माणसे कधी कधी स्वप्नातही ओरडतात, हसतात, रडतात. इतकेच नव्हे तर ते घरातून उठून बाहेरही चालत जातात आणि बाहेर जाऊन कोठेतरी धडकतात, ते बाहेर जाऊन ओट्यावर झोपतात आणि नंतर उठल्यावर म्हणतात,अरेच्च्या ! मी तर घरात झोपलो होतो इथे कसा आलो ? तसेच ती स्त्री जोर जोरात रडायला लागली तेव्हा तिच्या रडण्याने तिचा पती जागा झाला त्याने तिला हलवून विचारले. अग ! काय झाले? का रडते? तेव्हा ती त्याला म्हणाली. अहो ! काय सांगू ! माझे पती अपघातात सापडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले हो.... मी विधवा झाले हो ..... !! तिच्या पतीने तिचा कान पिळला आणि सांगितले, अग ! मी मेलो नाही तर इथेच तुझ्या जवळच आहे. तुला स्वप्न पडले होते. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिचे दु:ख नष्ट झाले आणि शोक निवृत्त झाला.जीवाला अज्ञानाची झोप आली आहे आणि त्याच झोपेचा परिणाम म्हणून मिथ्या, नाशवान असलेले जग सुद्धा सत्य वाटू लागते यालाच अन्यथा ज्ञान किंवा विपरीत ज्ञान म्हणतात. आणि हेच अन्यथा ज्ञान दु:खाला कारण असते अज्ञानाची निवृत्ती झाली कि दु:खाची निवृत्त होते खरे म्हणजे अज्ञानाच्या पोटातच दु:ख आहे. पण माणसे अज्ञान निवृत्त करण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाहीत. असतो मा सदगमय ॥ तमसो मा ज्योतिर्गमय ॥ मृत्योमार्मृतम् गमय ॥ हे श्रुती माउली सांगते कि असत्याकडून सत्याकडे अंधाराकडून प्रकाशाकडे , मृत्यूकडून अमरत्वाकडे जायचे हा श्रुतीचा आदेश आहे. आत्मा अमर आहे व तो व्यापक आहे हा सिद्धांत अबाधित आहे. जीवब्रहमैक्य ज्ञान झाले कि मग आत्मा आत्मत्वाने तर कळतो पण तो ब्रहमत्वाने सुद्धा कळतो मग सर्वत्र आपलीच प्रतीती येते आणि हि खरी जागृती आहे. अज्ञान जर गेले नाही तर समजा आपली अजून झोप गेलीच नाही व बाह्य दृष्टीने जरी आपण जागे असलो तरी आपण स्वप्नातच आहोत असे समजायला हरकत नाही. स्वामी विवेकानंदांचे आवडते उपनिषद कठोपनिषदात म्हटले आहे कि उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत । क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ।।(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र १४) उठा , जागे व्हा आणि प्राप्तव्य प्राप्त करा. हा मार्ग तसा सोपा नाही दुधारी सु-यावर चालण्यासारखे हे आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजही म्हणतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ।। ज्ञान मार्ग असो कि भक्ती मार्ग किंवा कोणताही मार्ग असो तो साधनकाळात कठीण असतो पण तो मार्ग मात्र साध्यप्राप्तीनंतर मात्र सोपा असतो.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीलेगुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पा) ता.नगरमोबाईल :- ०९४२२२२०६०३.
स्वप्नीचिया घाया विव्हळे जो साचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:57 AM