प्रा. शिवाजीराव भुकेलेसरस्वतीकन्या बहिणाबाईंना ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाले. मुलांचा भार डोईवर घेऊन ही भूमिकन्या आपल्या काळ्या आईची सेवा इमाने-इतबारे करू लागली. कुठल्याही धर्म-संप्रदाय आणि जाती-पंथाचा टिळा भाळी न लावता लोकविद्यापीठाची कुलगुरू बहिणाबाई झाडा, माडाबरोबर व गुरा-पाखरांबरोबर जीवनाचे खरे तत्त्वज्ञान सांगून जायची. एवढेच नव्हे, तर आपल्या ललाटीच्या रेषा व तळहातावरच्या रेषा आपण आपल्या कर्मानेच बदलायच्या आहेत हा पुरोगामी-जीवनवादी विचार बहिणाईने आयुष्यभर जोपासला. जेव्हा तिच्याच घरासमोर एक ज्योतिषी तिचे भविष्य कथन करण्यासाठी आला व हात दाखविण्याची विनंती करू लागला, तेव्हा कर्मयोगाची
धगधगती ज्वाला या ज्योतिष्यास म्हणाली -बापा नको मारू थापा, असो खऱ्या, असो खोट्या ।नही नशीब-नशीब, तय हाताच्या रेघोट्या ।नको-नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू ।माझं दैव माले कये, माझ्या दारी नका येऊ ।
बहिणाबाईचा हा जळजळीत सामर्थ्ययोग आम्हास पचलाच नाही; कारण आमच्या डिजिटल इंडियामध्येसुद्धा ज्योतिषी पंडित, होरारत्न, ज्योतिष भूषण, भाग्यरत्न भूषण यांची भविष्य कथनाची दुकाने एवढी तेजीत चाललेली आहेत की, तुमच्या-माझ्यासारख्यांची आयुष्यभराची कमाई या तथाकथित मंडळींची महिन्या-दोन महिन्यांची कमाई आहे. पु.ल. एकदा म्हणाले होते, ‘जेव्हा माणसाचा स्वत:वरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो, तेव्हा माणूस अशा भविष्यरत्न बुवा-बायांच्या पाठीमागे लागतो.’ हे माणसाच्या सांस्कृतिक मंदत्वाचे लक्षण आहे. शिक्षणाने आम्ही अंतराळात चाललेल्या घटनेची उत्तरे शोधू शकलो; पण अंतरंगात दाटलेल्या अंधाराची उत्तरे मात्र शोधू शकलो नाही. त्यामुळे कुडबुड्या ज्योतिषासमोर हात पसरू लागलो. शिकलेल्या माणसांनी ज्योतिष, शगुन, ऋद्धी-सिद्धीच्या पाठीमागे लागलेल्या बुवा-बायांसमोर लाचारपणे हात पसरविणे हाच शिक्षणाचा सर्वांत मोठा पराभव आहे. वास्तविक पाहता क्षेत्र कोणतेही असो, त्यातील टोकाचा प्रयत्नवादच आपणास यशोशिखरावर नेऊन पोहोचवितो. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे म्हणणाºया निष्क्रिय, नीयतीवादी व भविष्यवादी माणसाची अवस्था मर्ढेकरांनी वर्णन केलेल्या गणपत वाण्यासारखी होते, जो बिडी पिताना काडी चावत माडी बांधायचे स्वप्न रंगवायचा. शेवटी बिड्याही संपल्या आणि काड्याही संपल्या; पण गणपत वाणी काही माडी बांधू शकला नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणारे गणपत वाणी थोड्याफार फरकाने हेच करीत आहेत. जे हात सामर्थ्याचे, पुरुषार्थाचे, वीरत्वाचे प्रतीक आहेत, तेच हात आज नको त्यांच्यासमोर पसरले जात आहेत हा दुर्दैवविलास आहे.
अरे! यापेक्षा उभ्याने जोंधळ्याच्या कण्या खाणारे, कण्याबरोबर देहू गावच्या तथाकथित मंडळींचे शिव्याशाप सहन करणारे आणि दगडाच्या टाळातून उभ्या महाराष्ट्राला स्वत्वजाणिवेची भावसमाधी लावणारे तुकोबा हे लाखपटीने श्रेष्ठ आहेत. या भल्या मोठ्या प्रपंचातील पिडा आपण आपल्या कर्माने भोगून संपवू, पण भूत-भविष्याचे कथन करणाऱ्यांच्या पाठीमागे लागणार नाही हा निर्वाणीचा इशारा देताना तुकोबा म्हणतात -
भूत भविष्य कळो यावें वर्तमान ।हे तो भाग्यहीन त्याची जोडी । जगरुढीसाठी घातले दुकान । जातो नारायण आंतरुनी ।तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा ऋद्धी-सिद्धी ॥