- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
श्रवण कां हवे..? तर वासनेतून मुक्ती, विचारांतून मुक्ती, विषयांतून मुक्ती यासाठी.. श्रवणाने आपल्याला परमेश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यय नक्कीच येतो पण जोपर्यंत आपण स्वतःला विसरुन श्रवण करीत नाही तोपर्यंत हे घडत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
श्रवणद्वारे घेता शोध । मननकर्त्यास विशद परमार्थ होतो ॥
पण यासाठी आपल्या मनावर असणारा मायेचा पडदा दूर होण्याची गरज आहे. मग प्रश्न असा पडतो की, माया खोटी आहे का..? ती खोटी नाही पण दिसण्यापुरती किंवा भासमान सत्य आहे.
एकदा आकाशमार्गाने राजहंसांचा थवा जात होता. पौर्णिमेचं टिपूर चांदणं. एका जलाशयांत पडलेलं चांदण्यांचं प्रतिबिंब राजहंसांनी बघितलं आणि त्यांना त्या चांदण्या मोत्यांसारख्या भासल्या. त्यांनी झेप घेतली आणि टाकलेल्या जाळ्यात ते अडकले. मोती नसताना ते अडकले. मोती नसताना ते भासले. म्हणजे नसेलेलं ते दिसणं म्हणजे माया. मग ते प्रतिबिंब खोटं होतं का..? नाही..! चांदण्यांचा रुपाचा तो आविष्कार होता. दिसण्यापुरतं सत्य होतं म्हणून हंस अडकले. तसा जीव सुख नसलेल्या विषयजाळ्यात अडकतो. भगवान म्हणतात -
मम माया दुरत्यया ।
तरीही जर मानवाने निर्विकल्पाच्या शोधासाठी झेप घेतली तर तो तिथपर्यंत पोचतो म्हणून कवी म्हणतात -
आकाशी झेप घे रे पाखरा । सोडी सोन्याचा पिंजरा ॥
सोन्याचा असला तरी तो शेवटी पिंजराच आहे. तू नित्यमुक्त अशा ईश्वराचा अंश आहेस, बंधनात अडकू नकोस. यासाठी मनांतून श्रवण केलं की, विषयांचे बंध हळूहळू सुटतात, मृत्यूचं भय संपतं आणि लक्षात येतं की -
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -जैसे जीर्णवस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्य नाथे ॥
अथवा श्रीमद् भगवद् गीता सांगते -
वासांसि जीर्णानि यथाविहाय । नवानि गृण्हाति नरोपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान । अन्यानि संयाति नवानि देही ॥
किंवा श्री समर्थ रामदास स्वामी मनोबोधात म्हणतात की -
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।अकस्मात तो ही पुढे जात आहे ।म्हणोनि कुडी वासना सांडि वेगी ।बळे लागला काळ हा पाठिलागी ॥
देहाविषयी अनासक्ती निर्माण होण्यासाठी श्रवणाची गरज आहे. विकारांची वस्रं गळून पडल्यानंतर केलेलं श्रवणंच फक्त भगवंताला आवडतं. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
भगवंतास जयाचि प्रीति । आपण वर्तावे तेणेचि रीती ।मग सख्यत्व घडे नेमस्ती । भगवंतासी ॥
म्हणून -विकाराचे विटाळ टाळून जे टाळ वाजवले जातात तेच टाळ विटेवरल्या विठ्ठलाला आवडतात आणि असे टाळ वाजवणाराची तो विठ्ठल जन्म - मरणांतून टाळाटाळ करतो..!श्रवण हे स्वतःच्या उद्धारासाठी आहे.दोन संन्यासी रस्त्याने जात असतात. संध्याकाळचीवेळ झालेली असते. अंधार पसरत होता आणि नदी पार करून पलीकडे जायचं होतं. संन्यासी नदीत प्रवेश करणार एवढ्यात एक तरुण स्त्री त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, मलाही नदीच्या पैलतीराला जायचंय पण पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तुम्ही मला पैलतीरी पोचवाल कां.? एक संन्यासी काही न बोलता पुढे निघाला पण जो दुसरा संन्यासी होता त्याने एक क्षण विचार केला की, सभोवती किर्रऽऽ जंगल आहे आणि अंधार पडतोय अशावेळी या स्त्री ला एकटं टाकणं हा धर्म नाही. त्याने झटकन त्या स्त्री ला आपल्या पाठीशी घेतले आणि पैलतीरी सोडून दिले. तिने मनापासून त्याला धन्यवाद दिले पण काही अंतर चालून गेल्यावर आधी पैलतीरावर आलेला संन्यासी त्याला म्हणाला, तुला संन्यासधर्म माहित नाही. स्त्री शी बोलणं सुद्धा आपल्याला वर्ज्य आहे आणि तू तिला पाठीशी घेऊन आलास. तो संन्यासी म्हणाला, मी तर तिला कधीचीच पैलतीरी सोडली पण तू मात्र अजून मनांत घेऊन चालतो आहेस. खरं सांगू का तुला.. मला त्या स्त्री च्या जागी स्त्री न दिसता त्या परमेश्वराचंरुप दिसत होतं जे मी आजपर्यंत श्रवण केलेलं आहे..!म्हणजे काय तर श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥