- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )भगवद्प्राप्ती वाचून जगणे लाजिरवाणे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले तोच भगवद् प्राप्तीच्या साधनांचा शोध घेतो. कोणत्याही वस्तूची खरी भूक लागल्याशिवाय कोणी तिच्या प्राप्तीची तळमळ करीत नाही. संसार दु:खमय असूनही त्याच्या तडाख्यातून सुटण्यासाठी कोणी धडपड करित नाही. ते दुःख मायेच्या प्रभावाने विसरुन तो आशेने जगतो. खरे पाहिले तर, माऊली जसं म्हणतात -
उपजे ते नासे । नासे ते पुनरपि दिसे ॥हे घटिकायंत्र जैसे । परिभ्रमेगा ॥
मृत्युपोटी जन्म आणि जन्मापोटी मृत्यू असतो. त्यामुळे मृत्यूला मारले तर जन्मातून सुटका होते, पण बहुतेकांचे आयुष्य झोपेत जाते. देहाचा अहंकार सर्वांना थोपटून निजवतो. आमचा सर्व व्यवहार झोपेतच होतो. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
निजेले असताच मेले । पुन्हा उपजताच निजेले ॥ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥
परमेश्वराला नेणून जगणे ही निद्रा आणि जाणून जगणे ही जागृती.. निद्रा हे बंधन आणि जागृती हा मोक्ष आहे. उपनिषदकार जे सांगतात -
जागृत रे जना: ॥
ते याच अर्थाने. संतांच्या संगतीने निद्रा उडून जाते आणि स्वरूपाची जागृती होते. ही जागृती फक्त मनुष्य देहातच आहे, इतर देहात नाही, म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
ऐसे हे अवघेचि ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे ॥असार ते जाणोनी त्यागावे । या नाव श्रवण भक्ती ॥ऐसे श्रवण सगुणाचे । अध्यात्म निरुपण निर्गुणाचे ॥विभक्ती सांडोनी भक्तीचे । मूळ शोधावे ॥
अशाच श्रवणाने देव आणि भक्त यातील अंतर संपून ऐक्य निर्माण होते पण असे श्रवण कसे करावे.? श्रोता कसा असावा.? श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
मनाच्या तोडोनी वोढी । श्रवणी बैसावे आवडी ॥सावधपणे घडीने घडी । काळ सार्थक करावा ॥अर्थ प्रमेय ग्रंथांतरी । शोधून घ्यावी अभ्यंतरी ॥दुश्चीत पण आले तरी । पुन्हा श्रवण करावे ॥
अशा श्रवणाने चित्त शुद्ध होते, बुध्दी दृढ होते, अभिमान तुटतो, मनोजय होतो आणि अंगी समाधान बाणतं म्हणून आपल्या विवेक बुध्दीला धोका पोचेल, समाधान डळमळीत होईल असं काही ऐकू नये. आज आपण आपलेच ग्रंथ, पुराणकथा, शास्त्र याविषयी विपरीत विचार करतो पण जेव्हा आपण तळमळीने ऐकू तेव्हा राजा परिक्षिती जसे म्हणतो -
नेषाति दु:सहा क्षुन्मां त्यक्तोदमपि बाधते ।पिबतं त्वंमुखांभोजच्युतं हरिकथामृतं ॥
की, मी हरिकथामृत पित असल्याने मला तहान-भूक कशाचीही बाधा होत नाही कारण संसार तापाने तापलेल्या जीवांना हरिकथामृत हेच औषध आहे.नाथ महाराज म्हणतात -
तुझे कीर्ती श्रवणाचे आवडी । लागली कर्ण पियुषी गोडी ॥तेथ अमृताची चवी थोडी । हो अर्धघडी न लागता ॥एैसे ऐकता तुझी कीर्ती । सवासाना स्पृहा नासाती ॥ते भक्त तुज न विसंबती । हृदयी वाहती सर्वदा ॥
भगवद् गुण ऐकल्याने इच्छा, वासना संपून जातात एवढेच नव्हे तर नाथ महाराज म्हणतात -
करिता माझी कीर्ती श्रवण । प्रेमे ओसंडे अंत:करण ॥विसरे देह गेहाचि आठवण । तेथे प्रत्यवाय जाण बाधीना ॥
श्रवणाने अंत:करणांत प्रेम निर्माण होते म्हणून अशा या श्रवणासाठी आयुष्यात माणसाने तीन संग निश्चित करावेत. प्रसंग, व्यासंग, सत्संग. प्रसंगाने मन घडते, व्यासंगाने ज्ञान वाढते आणि सत्संगाने माणसाचे जीवनच घडते म्हणून जीवनाचा आणि अध्यात्माचा पाया पक्का होण्यासाठी श्रवणाची नितांत गरज आहे..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥