नवी दिल्लीः खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लू मून असा चंद्रदर्शनाचा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी जुळून आला असतानाच, ग्रहणाचे वेध लागताच झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण चंद्रग्रहणाच्या आसपास भूकंप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. चंद्र, समुद्र आणि पृथ्वी यांच्या कनेक्शनची याआधीही चर्चा झाली आहे आणि आजच्या भूकंपामुळे हे संबंध पुन्हा अधोरेखित झाले आहेत.
आज दुपारी 12.40 दरम्यान दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेशच्या काही भागांत आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, नागरिक आणि नोकरदार घरातून-कार्यालयांतून बाहेर निघाले. या भूकंपाचा संबंध आजच्या चंद्रग्रहणाची असल्याचं काही ज्योतिष्यांचं म्हणणं आहे.
चंद्रग्रहणाच्या काही दिवस आधी आणि नंतर समुद्र तुलनेनं जास्त खवळलेला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या आसपासही बऱ्याच घडामोडी घडतात. पुराणकाळापासून राहू आणि केतू यांना समुद्रमंथनाशी जोडलं गेलंय. खगोलीय घटनांच्या आधारेच ज्योतिषी भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज वर्तवतात. चंद्रग्रहणापासून पुढे 41 दिवसांपर्यंत गुरुत्वाकर्षण वाढण्याची किंवा घटण्याची शक्यता असते. त्यामुळे चंद्रग्रहणाच्याच दिवशी भूकंप येईल असं नाही, तर तो पुढे-मागे होऊ शकतो. याआधीही चंद्रग्रहणाच्या आसपास भूकंप झाल्याची उदाहरणं आहेत.
ग्रहणाच्या काळात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अधिक असतो. गुरुत्वाकर्षणाच्या कमी-अधिक वेगामुळेच भूकंप होतो.
पुष्य नक्षत्र हेही भूकंपाचं कारण असल्याचा दावा काही ज्योतिष्यांनी केला आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी पुष्य नक्षत्र कर्क राशीवर पडतंय. त्यामुळे हा भूकंप आल्याचंही बोललं जातंय. अर्थात त्यावरून बरीच मतमतांतरं आहेत.