- डॉ. विजय जंगम (स्वामी)
आपल्या परंपरेत मानवप्राणी भौतिक रसायन द्रव्यांचा गोळा मानलेला नाही. ते त्याला पंचमहाभूतांचा समूह समजतात. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप(पाणी), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पाच मूलतत्त्वे. त्यांच्याशी मन, बुद्धी, चेतनांचा संबंध येऊन सचेतन मानव बनतो. कारण पाच मूलतत्त्वे, मन-बुद्धी-अंत:करण या आठांनी तो बनतो, असा पूर्वजांचा दावा आहे. पाहा प्राणायमाची मुख्य अंगही आठ आणि मानवी शरीर चालविणाऱ्या प्रेरणाही आठ! मुख्य दिशा आणि उपदिशा मिळूनही आठच होतात. ऊर्ध्व आणि अधर या उपदिशा या अंगाबाहेर-मस्तकावर आणि पायाखाली. बाकीच्या अंगाभोवती असतात. म्हणून त्यांनाच मोजणीत मान मिळाला. प्राणवायू हा आपल्या पूर्वजांच्या मते विश्वव्यापी चेतनाशक्ती होय. त्यांच्या मते प्राण ही अतिंद्रिय शक्ती आहे. वेदांमध्ये प्राणशक्तीचे महत्त्व आहे. अथर्व वेदातप्राणांना मूळ चेतना, विराट, संप्रेरक म्हटलेले आहे. प्राण हाच सूर्य-चंद्र आणि प्रजापतींसह सर्व भौतिक अस्तित्वांचा संचालक आहे, असेही म्हटलेय. आणखी एक मंत्र सांगतो की, प्राण हे वीर्य (तेज, अग्नीरूप), उत्साह आणि बल देणारे आहेत. प्राण अग्नीयुक्त असल्याने दीप्तिमान आहेत. चराचर विश्वजीवन, दिव्यत्वाचे माहेर आहेत. शतपथ ब्राह्मणाने सूर्यालाच ‘प्राण’ ही संज्ञा दिलीय, तो सहस्त्रावधी किरणधारी, कोट्यवधी जिवांना उत्पन्न करून आपल्या कार्यशक्तीने त्यांचे योगक्षेत्र चालविणारा आहे-असे सांगितलेय. बृहदारक उपनिषदाप्रमाणे - ‘प्राण ही बल, जीवन, अमृतमय जीवनवस्तू आहे. प्राण विश्वसम्राट आहे!’ सूर्यापासून ग्रह, उपग्रह, ग्रहांवरील चलाचल जीवसृष्टी, वायू, चुंबकीय लहरी उत्पन्न झाल्या. वायू घनीभूत होता-होता द्रवरूप झाले. ते जीवनदायी जल आणि ज्वालामुखीतले धातूरस. घनीभूत झाले ते पर्वत, पहाड. यांच्या संयोगातून प्राणचेतनेने वनस्पतींची सृष्टी केली. माणसासह प्राणी, दृश्य आणि साध्या डोळ्यांना दिसायला कठीण अशी जीवजंतूसृष्टी त्यातून उत्पन्न झाली. गुरुत्वाकर्षण, विद्युत, मरुत्, प्रकाश, ध्वनी या ऊर्जा झाल्या. चुंबकीय शक्तिंपैकी विद्युतचुंबकीय शक्तीलाच पूर्वज मरुत् शक्ती म्हणत की काय, हा संशोधनाचा विषय आहे. प्राण हा आयुर्दायी, आयुर्वधक असल्याने प्राण जाणे यातूनच मरण येण्याची घटना घडते. प्राणांमुळे शरीरबळ, आत्मबळ, मनोबळ, बुद्धिबळ मिळते. ज्यांचे आत्मबळ भक्कम त्यांना उत्तम मनोबळ लाभते. जोडीला उत्तम शरीरबळ असेल, तर आरोग्य चांगले राहते.