- सदगुरू श्री वामनराव पैमाणूस हा दु:खी होतो, सुखी होत नाही याचे नेमके कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न मानवजातीने कधी केला असे मला मुळीच वाटत नाही आणि जे प्रयत्न केले ते योग्य दिशेने केले नाहीत. प्रयत्न अयोग्य दिशेने झाल्यामुळे माणूस सुखी होण्याऐवजी दु:खी होतो आहे. ज्याप्रमाणे नदी वहात वहात समुद्राला जावून मिळते त्याप्रमाणे माणसाचे मन हे नेहमी विचाररूपाने वहात असते. विचार नाही असे कधीच होत नाही. स्वप्न सुध्दा पडतात ते ही विचारांचे दृश्य रूप असते. झोपेत विचारांना दृश्य रूप प्राप्त झाले की ते स्वप्न असते. त्यामुळे जी स्वप्न पडतात ती विचारांमुळेच पडतात. फक्त गाढ झोपेत माणूस विचार करत नाही. मात्र अंर्तमनात विचार चाललेले असतात. अंर्तमन श्वासोच्छवास करतच असते. बहिर्मन जेव्हा स्थगित झालेले असते तेव्हा माणूस विचार करण्याचे थांबतो. माणसाचे मनात ही विचारांची नदी सतत वहातच असते. त्याचे मन हे काहीतरी कृती करण्याचा विचार करत असते.काळजी, चिंता, द्वेष, मत्सर, तिरस्कार या गोष्टीच मनात सतत चाललेल्या असतात. हे एक प्रकारचे विचार प्रदुषण आहे.
विचार प्रदुषण हा जीवनविद्येचा शोध आहे. विचार प्रदुषण हे माणसाच्या दु:खाचे मूळ आहे,परंतू दुर्देवाची गोष्ट अशी की या सत्याचे ज्ञान मानवजातीला झालेले दिसत नाही व त्यामुळे त्या मूळ समस्येवर उपाय योजनासुध्दा केली जात नाही. मानवी जीवनात सैतान हा अज्ञानरुपाने वावरत असतो. या अज्ञानातूनच अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया व असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होवून विचार प्रदुषण निर्माण होते. माणसाची बुध्दी देव होण्याऐवजी दानव होण्याकडे झुकते. ती देव नसते म्हणून तर जगात सुख पहाता जवापाडे व दु:ख पर्वताएवढे अशी वस्तुस्थिती आहे.
“देव कुठेतरी स्वर्गात, दानव कुठेतरी पाताळात व मानव पृथ्वीवर” असा काल्पनिक प्रकार प्रत्यक्षात नाही. माणसांमध्येच देव दानव व मानव असतात. कृष्ण हा देव होता तर त्या कृष्णाचा मामा कंस हा दानव होता व तोच कृष्ण ज्याच्या घरी वाढला तो नंद मानव होता म्हणून माणसे ज्या पध्दतीने विचार करतात, बोलतात व आचार करतात त्यावर माणसे कशी होणार हे ठरत असते. थोडक्यात दुस-यांच्या दु:खाने सुखी होतो तो दानव, दुस-यांच्या दु:खाने दु:खी होतो तो मानव व दुस-यांच्या सुखाने सुखी होतो तो देव जाणावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार ज्यांना आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव व ज्यांच्या वृतीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणावे.