आपल्याला जर आपले नशीब चांगले घडवायचे असेल तर त्यासाठी आपणही प्रयत्नपूर्वक चांगले, सुखाचे, आनंदाचे, यशाचे, समृद्धीचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे विचार करायला हवेत. जर मनात वाईट, अपयशाचे, दु:खाचे, विचार येत असतील तर ते प्रयत्नपूर्वक बदलून त्यांच्या ठिकाणी सकारात्मक विचार करायला हवेत. कारण.. जर तुम्ही रोगाचे विचार केलेत तर तुम्ही रोगी व्हाल, जर तुम्ही भोगाचे विचार केलेत तर तुम्ही भोगी व्हाल, जर तुम्ही योगाचे विचार केले तर तर तुम्ही योगी व्हाल; आणि जर प्रयत्नपूर्वक यशाचे विचार केलेत तर यशस्वी व्हाल. मग आता चांगले, यशाचे विचार करण्यासाठी नेमके काय करावे तर विचारांचा अभ्यास हवा. १. विचारांकडे पाहायला हवे. २.विचारांना ओळखायला हवे. ३. विचारांना वळवायला हवे.जीवनात आपल्याला हवा तसा बदल करण्यासाठी व विचारांवर नियंत्रणासाठी प्रथम विचारांवर लक्ष ठेवण्याची कला साधता आली पाहिजे. आपल्या मनात एका क्षणात असंख्य इष्ट-अनिष्ट विचार निर्माण होतात. विचारांवर लक्ष द्यायला लागल्यानंतर लक्षात येते की आपली विचार निर्मिती हळूहळू कमी होत आहे. म्हणजे काही क्षणांत निर्माण होणाऱ्या असंख्य विचारांचे प्रमाण कमी होते. साहजिकच मग आपण चांगले विचार करतो की वाईट करतो आहोत हे चटकन लक्षात येऊ लागते. हळूहळू जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपण चांगले विचार करून वाईट विचार बाजूला सारू लागतो. असे सरावाने केल्यास आपल्याला चांगले विचार करायची सवयच लागते. खरी जीवन साधना हीच आहे. कारण यातून उत्कर्ष आणि उन्नती होऊन जीवनात खरी प्रगती होते. माणूस यशस्वी होतो. कारण निसर्गाचाच नियम आहे ‘जसा विचार तसा जीवनाला आकार.’ जीवनाला चांगला आकार देण्यासाठी विचार सकारात्मक, व्यापक, सहकारात्मक असावेत.हे सकारात्मक आणि सहकारात्मक विचार सातत्याने, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक करण्याकरिता थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या सर्वांसाठी विश्वप्रार्थना निर्माण केली. ‘‘हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.’’ ही प्रार्थना सुंदर सकारात्मक आणि सहकारात्मक विचारांनी भरलेली, भारलेली आहे. हा व्यापक विचार आहे. तो आपण सातत्याने केला, की साहजिकच आपली विचारशैली सकारात्मक आणि व्यापक होते.
सर्वांसाठी विश्वप्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 4:09 AM