धर्मराज हल्लाळे
सज्जन, सद्वर्तनी माणसे ही समाजाला दिशा देतात. त्यांची उक्ती जशी असते तशी कृती असते. म्हणुनच जो जसे बोलतो तसे चालतो त्याला वंदन केले पाहिजे, असेही सांगितले जाते. त्यांच्या विचारात आणि आचारात अंतर असत नाही. ज्यांना आपण कैकदा देवमाणूस असे म्हणतो. अशा आपल्या अवतीभोवतीच्या माणसांमध्येच देव, देवत्व शोधावे, असेच संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे. ‘तीर्थी धोंडा पाणी, देवरोकडा सज्जनी’ हा अभंग पूर्ण करताना तुकाराम महाराज समाजातील सदाचारी माणसांच्या पाठीमागे जा असा संदेश देतात.
देव भक्तीसाठी आपण तीर्थस्थळी जातो. आपल्याला आशीर्वाद मिळावेत, आपले कल्याण व्हावे, सर्वांचे भले व्हावे, हा विचार असतो. संत विचार मात्र आपल्याला अधिकाधिक सद् विचाराकडे घेऊन जातात. भावभक्तीला सद्वर्तनाची जोड देण्याचा संत वचनातून प्रयत्न होतो. इतकेच नव्हे संत समाजाला कर्म सिद्धांताच्या दिशेने नेऊ इच्छितात. मानवी श्रद्धांना हळुवारपणे सज्जन वृत्तीकडे घेऊन जातात. निव्वळ कर्मकांडात गुंतणाऱ्यांना सज्जन माणसांकडे पाहण्याचा सल्ला देतात. तुम्हाला देवत्व शोधायचेच असेल आणि त्या दिशेने जायचे असेल तर रोकडा सज्जन आपल्यासमोर आहे.
कुप्रथांच्या भोवती घुटमळणाऱ्यांनाही समाजाच्या भल्यासाठी कृतीशील होण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी सज्जन माणसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. सज्जन माणूस म्हणजे कोण ? जो योग्य मार्गाने धन मिळवितो. सदाचारी आहे. स्वत:चे भले करण्याबरोबरच इतरांचेही भले करतो. सूडबुद्धीने वागत नाही. कोणी निंदा केली म्हणून सद्मार्ग सोडत नाही. तसेच कोणी स्तुती केली म्हणून अहंकारी होत नाही. ज्याचे मन प्रेमाने भरलेले असते. जो इतरांच्या सुखात काटे बनत नाही आणि दु:खात सोबती बनतो. अशा सद्वर्तनी सज्जन माणसांत देव पहावा आणि आपणही त्याच्या दिशेने तल्लीन होऊन पुढे जावे.