एकदा काय झाले. स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. तेथून ते धर्मप्रचारार्थ वेगवेगळ्या देशात गेले होते. ते परदेशात असतांना कलकत्त्याहून त्यांच्या गुरुबंधुचे एक पत्र त्यांना मिळाले. त्या पत्राचा थोडक्यात असा आशय होता, ‘स्वामीजी! इकडे कलकत्यामध्ये कालीमातेचे मंदिरात अनाचार सुरु झालेला आहे. येथे मंदिरात दारू पिणारे लोक, वाईट आचरण करणा-या स्त्रिया असेही लोक दर्शनास येतात व गर्दी करतात. तुम्ही एक पत्र पाठवून मंदिरातील व्यवस्थापकास समजावून सांगा. या लोकांना मंदिरात येण्यास मनाई करा. कारण यांच्या येण्याने मंदिर अपवित्र होते. ‘स्वामीजींनी त्या पत्राला उत्तर दिले कि ‘मंदिरात याच लोकांना येण्याची आवश्यकता आहे. जे पवित्र आहेत त्यांनी मंदिरात नाही आले तरी चालेल आणि काली माता हि सर्व विश्वाची आई आहे व आईला सर्व लेकरे सारखीच असतात. तिच्याजवळ पवित्र अपवित्र असा भाव नसतो. दवाखाना हा खरे तर आजारी लोकांसाठी असतो. निरोग्यासाठी नाही म्हणून ज्यांना आम्ही पवित्र आहोत, असे वाटते. त्यांनी मंदिरात येऊ नये पण या पतितांना मंदिरात येऊ द्या.’ स्वामीजींच्या या विचाराने एक वेगळी दिशा मिळते व कर्मठांना सडेतोड उत्तर मिळाले. सोवळे ओवळे, पवित्र-अपवित्र हे प्रकार कर्मठ लोकांच्या विचारातून आलेले असतात. पण खरे पाहता अध्यात्म हे पतितांसाठीच असते. संत श्री नामदेव महाराज प्रत्यक्ष पांडुरंगालाच जाब विचारतात, ‘पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा । पतित पावन न होसी म्हणोनि जातो माघारा ।।१।। .... पतितपावन नाम तुज ठेवियले कोणी .. असा जाब विचारला हे देवा ! तुला पतित पावन का म्हणतात तर तू पतितांना पावन करतो म्हणून म्हणतात आणि तू असा आहेस कि, ‘घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार । काय देवा रोधु तुमचे कृपणाचे द्वार ।। अशी उदारता काय कामाची ? अरे ! आम्ही तर पापी, पतित, दुराचारी आहोतच व आम्हाला जर तू पावन केले तरच तुझे देवत्व खरे, नाही तर तुज्या देवत्वाचा काय उपयोग? मी तर सर्वत्र दवंडी पिटून सांगेन कि प्रतीतीपावन नव्हेसी हरी तू मोठा घातकी ।। या अभंगातून नामदेव महाराजांनी अध्यात्मातील फार महत्वाची बाब विशद केली आहे. ती हि कि पातीतच पावन करायचे आहेत. परमार्थात हेच लोक सुधारले तरच त्या अध्यात्माला काही तरी मूल्य आहे.श्रीमद्भगवत्गीतेमध्ये ‘अपि चेतसुरदाराचारो भजते मामनन्यभाक। साधुरेव स मन्तव्य सम्यगव्यवसितो हि स:।। अध्याय ९ व श्लोक ३० मध्ये हेच सांगितले आहे कि तो कितीही दुराचारी असेल आणि जर तो परमार्थात आला तर त्याचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मग अगोदरचा कितीही दुराचारी, पापी, दुष्ट असला तरीही हरकत नाही. त्याला पश्च्याताप झाला कि तो शुद्ध झाला समजावा. मग तो कोणत्याही जातीचा, वणार्चा असू दे. काही हरकत नाही माउली म्हणतात, आणि आचरण पाहता । तो दुष्कृतांचा किर शेल वाटा । परी जीवित वेचले चोहाटा । भक्तीचिया कि ।। तो आधी जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमची अवधारी । जैसा बुडाला महापुरी अन मरतु निघाला ।।... यालागी दुष्कृती ज-ही जाहला । तरी अनुतापतीर्थी न्हाला । न्हाउनी मजआत आला । सर्वभावे ।।’श्रीमदभागवद महापुरणामध्ये आजामीळ ब्राह्मणाची कथा येते हा ब्राह्मण अगदी शुद्ध आचरणाचा होता, दशग्रंथी होता. पण एकदा त्याने जंगलामध्ये एका आदिवासी स्त्रीपुरुषाचे मिलन बघितले आणि त्यांच्या बुद्धीत कामवासना उत्त्पन्न झाली व त्यातून पुढे तो अत्यंत वाईट आचरण करू लागला. स्वैर वागू लागला. लोक त्याला नावे ठेऊ लागले. पण योगायोग असा कि त्याच्या घरी संत आले व त्यांनी त्याच्या मुलाचे नाव नारायण ठेवायला सांगितले. त्यानेही त्यांचे ऐकले व मुलाचे नाव नारायण ठेवले. आणि विशेष म्हणजे अंतकाळाच्या वेळी या आजमिळाने यमदूतांना पाहून घाबरून स्वात:च्या मुलाला म्हणजे नारायणाला हाक मारली व ‘अंत:कालेच मामेव स्मरनमुक्त्वा कलेवरं ।।’ या न्यायाने त्याने मुलाला हाक मारली तरी सुद्धा भगवंताचे सेवक आले आणि त्याला त्या अपमृत्यूतून वाचवले. पश्चाताप आणि नामस्मरण य दोन गोष्टीमुळे तो वाचला, नाही तर त्याचे पाप भयंकर होते. तो वाचू शकला नसता पण नाममाहात्म्य श्रेष्ठ आहे’ नामे तरला नाही कोणी । ऐसा द्यावा निवडोनि ।।वाल्या कोळी तर भयंकर पापी होता. रांजण भरून खडे ठेवले होते. एवढे ब्रम्हवृन्द त्याने मारले होते. पण श्री नारदांनी भेट झाली आणि अनुताप झाला. खरे कळले कि आपले कोणी नाही व फक्त रामनाम स्मरण करून तो महर्षी झाला व श्रीरामायण लिहले. ‘मो सम कौन कुटील खल कामी । हौ हरी सब पतितन को राजा ।।’ हे महत्वाचे आहे .‘आपि पापप्रसक्तोपी ध्यायंनिमिषमच्यूतम । सद्यस्तपस्वी भवती पंक्तिपावन: ।। कितीही पापी असला आणि एक निमिषभर ज्याने भगवंताचे ध्यान केले तो पावन होतो. वास्तविक विचार केला तर ज्या धर्मामध्ये हीनदीन, पापी पतितांसाठी आधार नाही तो धर्म असूच शकत नाही. ‘धमोर्धारयते प्रजा:।।’ धर्म प्रजेचे धारण करतो, पापी पतितांचा उद्धार करतो तो खरा धर्म आहे. साने गुरुजींचे कवन किती छान आहे ‘खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।’जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ‘पतित पतित मी त्रिवाचा पतित । परी तू आपुलिया सत्ते । मज करावे सरते ।।’ पांडुरंगा मी तर त्रिवार पतित आहे पण तुझी सत्ता श्रेष्ठ आहे तूच मला पावन कर. माउली ज्ञानोबाराय म्हणतात, ‘पाहे पा ध्वजेचे चिरगुट । राया जातं करिता कष्ट ।।१।। तैसा मी एक पतित । परी तुझा मुद्रांकित ।।२।। मसी पत्र ते केवढे। रावो चालवी आपुल्या पाडे ।।३।। बापरखुमादेविवरदा । सांभाळावे आपुल्या ब्रीदा ।।४।। ह्या अभंगाचा विचार केला तर असे लक्षात येईल हे संत एवढे पतित होते का ? तर नाही ते पतित नव्हते पण त्यांनी भगवंतापुढे विनय प्रगट केला आहे व तो हि आपल्यासाठीच. आपल्याला एवढे जरी कळले कि आता उरलेले आयष्य अनाचारात घालावयाचे नाही. वाईट वागायचे नाही तर भगवंताला समर्पित करून अध्यात्मिक जीवन जागून जगासाठी काही तरी सत्कार्य करायचे हा उदात्त विचार अत्यंत आवश्यक आहे. तो आपले जीवन सुखी आनंदात व्यतीत करू शकतो.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीलेगुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी(पाटील)ता. नगरमोबाईल ९४२२२२०६०३
तैसा मी एक पतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:33 PM