- डॉ. सूर्यकांत घुगरे, बार्शीमहात्मा बसवेश्वर हे भारतीय संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारक यांचे मुकुटमणी आहेत. बसवेश्वर हे मध्ययुगीन भारताचे जनक होत. बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे प्रेषित आहेत. १२ व्या शतकातील इसवी सन ११०५ ते ११६७ हा बसवेश्वरांचा ६२ वर्षांचा जीवनकाळ आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा बसवेश्वरांचा जन्मदिन आणि श्रावण शुद्ध पंचमी हा त्यांचा ऐक्य दिन आहे. श्रावण शुद्ध पंचमी ही 'बसव पंचमी' म्हणूनही ओळखली जाते. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी ही त्यांची 'जन्मभूमी' आहे. बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण तसेच महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही 'कर्मभूमी' आहे. बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम ही बसवेश्वरांची 'ऐक्यभूमी' आहे. कर्नाटक सरकारने कुडलसंगम क्षेत्राला राष्ट्रीय पर्यटन क्षेत्राचा दर्जा यापूर्वीच दिला आहे.बसवेश्वर हे कर्नाटकातील 'कल्याण' या एका विस्तारित राज्याचे काही दशके पंतप्रधान होते. बसवेश्वर हे सामान्यत: 'महात्मा बसवेश्वर' म्हणून ओळखले जातात. संपूर्ण कर्नाटकमध्ये ते 'जगत्ज्योति बसवेश्वर' म्हणून विशेष परिचित आहेत. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, शिक्षण, साहित्य, अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण या बहुविध क्षेत्रांमध्ये बसवेश्वरांनी आपल्या मूलगामी व दूरगामी विचारकार्यांचा भरीव ठसा उमटवला आहे. यासाठीच अवघ्या बसवेश्वरांना 'सकल क्रांतियोगी' म्हटलेले आहे. भारतीय ज्ञानपीठ सन्मानित डॉ. व्ही.के गोकाक महात्मा बसवेश्वरांविषयी म्हणतात, ‘बसवेश्वर हे आजच्या आधुनिक विचारवंतांपेक्षाही अधिक आधुनिक होते.’ भारतीय समाजामध्ये समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन यांचा रचनात्मक व दिशादर्शक प्रारंभ महात्मा बसवेश्वरांपासून झालेला आहे.(लेखक - बसवेश्वर साहित्याचे ज्येष्ठ संशोधक आहेत.)
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 2:10 AM