सोलापूर : यंदा पौर्णिमा दोन दिवस आल्याने वटपौर्णिमा व कर्नाटकी बेंदूर (कारहुणवी किंवा बैलपोळा) कधी साजरा करावा याबाबत गृहिणी व शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पंचागकर्ते मोहन दाते यांनी वटपौर्णिमा रविवारीच साजरी करावी असे म्हटले आहे. रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
यंदा ज्येष्ठ पौर्णिमा रविवार दि. १६ जून रोजी दुपारी दोन वाजता प्रारंभ होऊन सोमवार दि. १७ जून रोजी दुपारी दोन वाजता समाप्त होत आहे. पंचागकर्ते दाते म्हणाले की यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी दुपारी २.0१ पर्यंत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु. १४ ला म्हणजे रविवारी दिली आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापीनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. दि. १६ जून रोजी रविवारी ज्येष्ठ शु. १४ दुपारी २.0२ पर्यंत असून याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटीपेक्षा अधिक आहे. म्हणून रविवार दि. १६ जून रोजी वटपौर्णिमा दिलेली आहे.
-------------चौथा वेळेस दिला असा निर्णययापूर्वी शक १९३२, १९३८ आणि १९३९ मध्ये पौर्णिमेचा काळ असाच आला होता. त्यावेळेसही शास्त्रवचनानुसार वटपौर्णिमा कधी करावी असा निर्णय दिलेला होता. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी २.0२ पर्यंत चतुदर्शी तिथी असली तरी त्याच दिवशी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. या शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु. १४ ला रविवारी म्हणजे दि. १६ जून रोजी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे, असे पंचागकर्ते दाते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे लोकमत कालदर्शीकेतही पंचागाप्रमाणे वटपौर्णिमा १६ जून रोजी व कर्नाटकी वृषभपूजन अर्थात कर्नाटकी बेंदूर १७ जून रोजी दिलेली आहे.