- रमेश सप्रे‘स्वस्तिक’ वसाहतीत नव्यानं राहायला आलेले आजी-आजोबा थोड्याच अवधीत सर्वांचे लाडके बनले. नाव विचारल्यावर म्हणायचे ‘आजी-आजोबा एवढंच पुरेसं नाही का?’ खरं तर होतं; कारण लोक त्यांना रमाआजी नि राम आजोबा म्हणून थोडंच म्हणणार होते. दोन्ही मुलं होती परदेशात. म्हणजे एन.आर.आय.! आजोबा काहीशा खेदानं आवंढा गिळत म्हणायचे ‘मुलं असतील नॉन रेसिडंट इंडियन्स एन.आर.आय. पण आम्हीही त्यांच्या दृष्टीनं एन.आर.आय.च आहोत की - नॉट रिक्वायर्ड इंडिव्हिज्युअल्स!’ पण त्यांची ही खंत ‘स्वस्तिक’ वसाहतीतील अनेक कुटुंबांची होती. जीवनाच्या भिववणा-या संध्याछायेत दोघं दोघं एकमेकांच्या आधारानं राहायची. दोघांचा मिळूनही एक पूर्ण आधार व्हायचा नाही. एकाच्या हातांना कंप तर दुसरीच्या मानेला. त्यांच्याबद्दल अनुकंपा म्हणजे सहानुभूती वाटली तर तेही त्यांना आवडायचं नाही.सण आले की ही मंडळी उदास व्हायची. दोघांसाठी काय जेवण करायचं? त्यांना गोड खूप आवडायचं. श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, गुलाबजामून म्हणजे जीव की प्राण! काही वर्षापूर्वी मधुमेह म्हणजे डायबेटीस झाला. तमाम गोड पदार्थ बंद म्हणजे बंद. आजींना आवडायचे झणझणीत, चमचमीत पदार्थ, रोजच्या जेवणात काहीतरी तळलेलं, कोणता तरी रस्सा असायचाच. पण रक्तदाब (बी.पी.) वाढल्यापासून सारं जेवण अळणी, सपक बनून गेलं. तरीही अनेक कुटुंबात असलेल्या आजी आजोबांना याची सवय झाली. कारण शरीराशी संबंधित गोष्ट होती ना ही? पण दूर राहणारी मुलं नि दुरावलेली नातवंडं यामुळे त्यांची मनं मात्र सतत उदास असत. मोबाइलवरून बोलून बोलून किती बोलणार? आणि टीव्ही तरी बघून बघून किती बघणार? एकमेकांशी गप्पा माराव्यात तर भूतकाळातल्या गोड आठवणीही डोळ्यातून अश्रू काढत, भविष्यकाळातील शरीर-मन यांच्या स्थितीची, परावलंबी परिस्थितीची कल्पनाही असह्य होई आणि या दोन्ही काळांच्या कात्रीत वर्तमानकाळसुद्धा असह्य होऊन जाई.जर व्हिडिओ शूटिंग म्हणजे चित्रीकरण केलं असतं स्वस्तिक कॉलनीचं तर डोक्याला माकडटोपी, गळ्याला मफलर किंवा मानेच्या वेदना कमी करणारी कॉलर, हातात या किंवा त्या प्रकारची काठी, डोळ्यांना जाड भिंगाचे चष्मे तर कानांना लावलेली श्रवणयंत्रं असा गणवेश घालून थरथरत, तोल सावरत जाणा-या पडद्यावरच्या आकृतीसारखी माणसांची वसाहत वाटली असती. बरीचशी विझल्या विझल्या सारखी. प्रत्येक जण म्हणजे एक बेट आणि वसाहत म्हणजे जणू द्विपसमूह! रमाआजी नि रामआजोबांनीही पहिले काही दिवस हुंदके देणा-या दबल्या स्वरात उसासे टाकणा:या वसाहतीत काढले. त्यांची शरीरं त्या मानानं ताठ नि स्थिर होती; पण मनं मात्र खूप ऊर्जा असलेली, सकारात्मक विचार करणारी होती. ‘ते काही नाही. हे चित्र बदलायलाच हवं’ एक दिवस रमाआजी काहीशा निर्धारानं म्हणाल्या, रामआजोबाही त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणाले, ‘ माहितीय ना? जो बदल घडवायचाय तो बदल तुम्ही स्वत: बनलं पाहिजे. बी द चेंज!’ दोघंही एकदम उद्गारले ‘तर ठरलं तर मग. आपणच बदलायला सुरू केलं पाहिजे.’ नुसतं म्हणून दोघंही थांबले नाही. कार्यक्रम सूत्रबद्ध तयार करण्यात राम आजोबा प्रवीण होते. तर सूत्रसंचालन करून तो कार्यक्रम राबवण्यात रमाआजी पटाईत होत्या. दोघांनी चर्चा करून एक पंचसूत्री कार्यक्रम तयार केला.* ‘स्वस्तिक’ वसाहतीत ई ब्लॉकमध्ये राहणा-या मध्यमवयीन कुटुंबासह एक ज्येष्ठ मंडळीची बैठक घेणं, स्थान वसाहतीतील उद्यानातली हिरवळ.* युवकांच्या एका सेवाभावी संघटनेतील स्वयंसेवकांमार्फत वृद्धांच्या निवासस्थानांची स्वच्छता, सजावट नि विद्युत रोषणाई करून घेणं.* जवळच असलेल्या दिवाळीला वसाहतीच्या सभागृहात एकत्र फराळ करणं. पदार्थ अर्थातच शुगर फ्री आणि कमी मसालेदार.* वसाहतीतील 20 वर्षांखालील युवा नि मुलं यांच्यासाठी उपयुक्त अशी पुस्तकं दिवाळीची भेट म्हणून देणं. ठरावीक दिवशी या पुस्तकांच्या वाचनावर आधारित स्पर्धा घेऊन योग्य बक्षिसं देणं.* मुख्य म्हणजे दर पौर्णिमेला एकत्र जमून (गेट टुगेदर) शुद्ध गप्पा मारणं. सहभोजन करणं.वसाहतीतल्या चौकीदाराकडून सर्वाचे क्रमांक घेऊन व्हॉटसअॅप संदेश पाठवले सुद्धा. बैठकही झाली. अनेकांच्या मनात घोळणारी ही कल्पना रमाआजी-रामआजोबांमुळे प्रत्यक्षात आली म्हणून गुलाबपुष्प देऊन नि टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद दिले गेले. विशेष म्हणजे दुस-या दिवशीपासून ‘स्वस्तिक’मधलं वातावरण चैतन्यमय बनून गेलं. सभेमध्ये दिलेली वैयक्तिक नि सामूहिक जबाबदारी पार पाडण्याची लगबग सुरू झाली, वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून गेला. जणू कायापालटच झाला. धनत्रयोदशीच्या दिवशी घराघरासमोर आकाशदिवे चमकत लहरू लागले. नरकचतुर्दशीला पहाटे सर्वत्र पणत्या तेवू लागल्या. रांगोळ्या सजल्या. फराळासाठी अनेकजण एकत्र जमले. हे आनंदाचं वातावरण हीच खरी दिवाळी होती. राम आजोबा म्हणाले, ‘आज आपली वसाहत ख-या अर्थानं स्वस्तिक बनली. सु-अस्ति-क म्हणजे सर्वाचे कल्याण करणारी!
मनोपालटातून कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 9:11 PM