- विजयराज बोधनकरदेव या जगात अस्तित्वात नाही. तो मानवी कल्पनेतून रंगवला गेला आहे. मानवी दोष आणि गुण याची रीतसर जाणीव होण्यासाठी देवांच्या नावावर कथा रचल्या. ज्ञानी सिद्ध पुरुषांनी त्या ग्रंथातून लिहून ठेवल्या. त्या आधारेच देवांनी चित्र, शिल्प रूपाने जन्म घेतलेत. बुद्धीचा विकास व्हावा म्हणून देवाला ज्ञानाचे, शक्तीचे प्रतीक म्हणून चित्र, शिल्प रूपाने जगापुढे उभे केले. देव नावाच्या शक्तीसमोर माणूस घाबरून असतो.पण आंतरिक ऊर्जा मात्र दबून राहते आणि तिथूनच अपयश मागे लागते. मानवी आंतरिक ऊर्जा, मनाची-बुद्धीची शक्ती, सकारात्मक विचारांची ताकद, अचूक निर्णयक्षमता अशा अनेक गोष्टींची ओळख मानवाला व्हावी याच हेतूने देवालये, धार्मिक ग्रंथसंपदा निर्माण करण्यात आली. परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्माण होत गेली. फक्त पूजाअर्चा आणि कोरडे धार्मिक उत्सव यांची चलती झाली. त्यातून असे गैरसमज निर्माण झाले की देवाची भक्ती केली की तो चमत्कार करून आपल्या पदरात सर्व काही टाकतो. यातूनच वैचारिक आणि आर्थिक गरिबी वाढत गेली. ज्यांनी ग्रंथ वाचून आणि शैक्षणिक ज्ञान मिळवून कर्माच्या दिशेने पावले उचलली ते-ते सर्व प्रगतीच्या मार्गावर पोहोचले आणि जे-जे चमत्काराचे वाट बघत बसले त्यांच्या पायाखाली फक्त दु:खाची वाट आली.देव सर्वत्र भरला आहे याचा अर्थ ऊन, वारा, थंडी, जल, अग्नी, वायू, पृथ्वी हेच रूप ईश्वराचे आहे आणि याचेच प्रतीक म्हणून देवळात देवाला बसविण्यात आले. खरा देव हा निसर्ग आहे. म्हणूनच चित्रातला देव अस्तित्वात नाही. तो निसर्गाच्या ऊर्जेत जिवंत सापडेल. ज्याप्रमाणे झाडे, लता, वेली स्वयंप्रेरणेने लहानाचे मोठे होतात आणि जगाला भरभरून देतात, हीच शिकवण ग्रंथ देतात. ती अशी की, देवाला मागू नका; उलट जगाला ज्ञान द्या. सहकार्य करा. दुसऱ्याला सर्वकाही देणाºया झाडासारखे स्वत:ला निर्मळ बनवा.
वृक्ष मोठा की देव?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 5:16 AM