हेमंत भेंडेलोकमत न्यूज नेटवर्कअध्यात्म विद्या म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. या विद्येचा शोध मनुष्यात दिव्य गुणांची वाढ करून त्याला त्याच्या परमोच्च ध्येयापर्यंत पोहोचविणे आहे. स्वत:च्या चैतन्य शक्तीचा विकास करून त्याद्वारे परमोच्च आनंद व सृष्टीचे अंतिम सत्य जाणणे हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. यालाच सच्चिदानंदस्वरूप परमेश्वर प्राप्ती सुद्धा म्हणतात. नराचा नारायण बनण्याच्या मार्गावर चालण्याने शेवटी मानवी समाज व्यवस्थाच उत्कृष्ट बनत असते. सत्यप्राप्तीच्या या मार्गाला निश्चित असा अंत नाही. हा सतत चालत राहण्याचा, पाशवीपणाशी अनवरत संघर्ष करीत राहण्याचा मार्ग आहे. चराचरात व्याप्त असलेला परमेश्वर जो अनंत दिव्य शक्तींचा समुच्चय आहे तो माझ्यात सुद्धा सूक्ष्म रूपाने सुप्तावस्थेत विद्यमान आहे आणि त्या शक्तीला विकसित करून ईश्वरप्राप्ती करून घेणे हाच अध्यात्माचा मूळ सिद्धांत आहे.अध्यात्माचे वरवर दिसणारे कलेवर म्हणजे परमेश्वराची भक्ती अथवा उपासना होय. परमेश्वर प्राप्तीचे असंख्य मार्ग आहेत, असे वैदिक वाङ्मय सांगते. सत्य प्राप्तीपर्यंत पोचण्याचे अनंत मार्ग हे माज्याच दिशेने येतात व विद्वान लोक मलाच वेगवेगळ्या नावाने संबोधितात, असा सहिष्णु व महान उपदेश वेद ग्रंथात सांगितला आहे. हाच हिंदू धर्माचा सर्वधर्मसमभाव सांगणारा संदेश आहे.परमेश्वरी शक्तींना म्हणजे दिव्य गुणांना जीवनात स्थान देणे हीच त्याची खरी उपासना आहे. यासाठी स्वत:च्या अंतरंगातील मलीनतेला दूर करावे लागते. शुद्ध व पवित्र जीवनाचा मार्ग चोखाळावा लागतो. यालाच उपनिषद ग्रंथ आत्मविद्या अथवा ब्रह्मविद्या म्हणतात. सर्व प्रकारच्या उपासनेचे ध्येय म्हणजे चित्तशुद्धी. या मार्गावर चालणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहे असा स्पष्ट संदेश उपनिषदात दिलेला आहे. मनुष्याचे पशुत्वाकडून देवत्वाकडे प्रस्थान करणे हेच अध्यात्म विद्येचे प्रयोजन आहे.अध्यात्म तत्त्वज्ञानाचे व्यावहारिक व सामाजिक स्वरूप म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे एखादी ठराविक उपासना पद्धती नव्हे तर उत्कृष्ट समाजाच्या धारणेसाठी जे काही आवश्यक कर्तव्य मनुष्याला करावे लागतात, त्यांनाच धर्म म्हटल्या गेले आहे. प्राचीन धर्मग्रंथात धर्म शब्दाच्या ज्या काही व्याख्या व स्पष्टीकरणे आढळतात त्यावरून त्याचा संबंध कर्तव्याशी निगडीत दिसून येतो. समाजधर्म, राष्ट्रधर्म, गृहस्थ धर्म, पतिव्रत धर्म, पत्नीव्रत धर्म, वर्णाश्रम धर्म असे असंख्य धर्म (कर्तव्य) मनुष्याला अंगीकारावे लागतात. आजच्या भाषेत याला राष्ट्र अथवा जगाचे संविधान सुद्धा म्हणता येईल. हेच काम प्राचीनकाळी धर्मशास्त्रकारांनी केले. संविधानातील नियमांचे पालन उत्तम रीतीने व्हावे याकरिता प्रत्येक मनुष्याने उत्तम नागरिक बनावे हे अपेक्षित असते. यासाठी मनुष्याच्या योग्य शिक्षणाची, संस्काराची व्यवस्था करावी लागते, जेणेकरून त्यात माणुसकी येईल आणि या सृष्टीतील प्रत्येक घटकाला जगण्याचा समान हक्क आहे ही जाण त्यात विकसित होईल. अध्यात्म विद्येने आत्मविकास साध्य झाला की मनुष्य ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वावर चालू लागतो आणि परिणामस्वरूप समाजसुद्धा विकसित होतो.हेमंत भेंडेगायत्री परिवार प्रचारकमो.९३७१४९३७०८