- बा.भो. शास्त्रीअहंतेत ममता असते ती विस्तारवादी आहे. विस्तारात अडथळा आला की, अहंता चिडते, अशांती जन्मते म्हणून स्वामी कुठल्याही समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विचार देतात. मंदिरात, सत्संगात शांती मिळते हा एक समज आहे. पण देवळांनीच समस्या निर्माण केल्या त्याचं काय? ते पूर्ण सत्य नाही. तो तात्पुरता विसावा असतो. वेदनाशामक औषधीसारखं ते क्षणिक समाधान असतं. कारण हे सगळे उपचार वरचेवर असतात. मूळ बिमारी तशीच असते. औषधीने लक्षणे दिसत नाहीत एवढेच. शिवचरित्रावर चांगले व्याख्यान देणारा वक्ता महाराजांनी ३५० किल्ले ताब्यात घेतले हे न चुकता सांगतो व त्यांनी ते नीट सांभाळले, असेही सांगतो. पण वक्ताच सतत घराची किल्ली विसरतो, त्याचं काय? राजा किल्ला सांभाळतो, हा किल्ली सांभाळत नाही. राजे संयमी होते, विवेकी होते. त्यांच्या विचाराचा संचार मुळापर्यंत होता. संत तुकोबा म्हणतात,‘‘ओलेमूळ भेदी खडकाचे अंगअभ्यासासी सांग कार्यसिद्धी’’दुभंगणाऱ्या पाषाणाचा विचार तुकोबांनी वरवर केला नाही. मुळापर्यंत गेले. मूळ रोगाला असतं, भोगाला असतं, त्यागाला असतं, अशांतीला असतं. आपण साधी माणसं. कार्यकारण भावाचं चिंतन करीत नाही. हेच आपल्या अशांतीचं मुख्य कारण आहे. सुख हे शांतीच्या वेलीला आलेलं मधुर फळ आहे. आपल्याला सुख हवं की शांती? सुख हवं पण ते शांतीशिवाय कसं मिळणार, वेलीशिवाय फूल, फळ कसं मिळणार? ‘अशांतस्य कृत्य:सुखं’ असं गीता ठासून सांगते. जो स्वस्थ असतो तोच मस्त असतो, अस्वस्थ अस्ताव्यस्त होतो, अहंतेच्या आगीत जग होरपळून जात आहे. धर्म, जात, देश, धन, शक्तीचा, कृतीचा, अहंकार हा सर्वत्र व्यापला आहे. शांतीचे रोप लावणारे लावतात, पण ते टिकत नाही. शांती म्हणजे निश्चिंत रहित अवस्था. ताण व काळजी विक्षेपशून्य जीवन.
अशांतस्य कृत्य:सुखं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 4:55 AM