- डॉ. गोविंद काळे
देव म्हटले की पूजा आली. एक नव्हे दोन नव्हे षोडशोपचार. सोळा उपचार. प्रत्येक उपचाराला पुरुषसूक्तातील एक ऋचा म्हणायची. मंत्र आणि तंत्र दोन्ही केले पाहिजे. नैवेद्य, वस्त्र, फळे किती किती म्हणून अर्पण करायचे? महाप्रसादाचे आयोजन वेगळेच. समाधान मानून घ्यायचे. एखादा भाविक म्हणून जातो. आम्हाला पण सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. बघूया त्याची इच्छा केव्हा होते आहे ते. पूजा तू घालणार मग त्याची इच्छा कशाला हवी? खरेच! पूजेने देवदेवता संतुष्ट होत असतील? ही बघा नको ती शंका आली. लोक आम्हाला नास्तिक म्हणायला कमी करणार नाहीत. देव कशाने संतुष्ट होत असतील त्याचे उत्तर नाट्यवेदाची रचना करणाऱ्या भरतमुनींनी देऊन टाकले आहे.‘‘न तथा गन्धमाल्येन देवास्तुष्यन्ति पूजिता:यथा नाट्यप्रयोगस्यै: नित्य तुष्यन्ति मंगलै:’देवाच्या दारात नाटक झाले पाहिजे. देव नाट्यप्रयोगाने संतुष्ट होतात. गंधमाल्य पूजनाने नव्हे, असे भरतमुनी म्हणतात. रंगभूमीचे सुंदर तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान कळलेली जगाच्या पाठीवर एकच भूमी आहे. तिचे नाव देवभूमी गोमंतक. मंदिराचे बांधकाम सुरू झाले की समोर रंगमंडपाचे कामही सुरू होते. त्याच्याशिवाय मंदिराला पूर्णत्वच नाही. मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा होते आणि सायंकाळी त्याच्या पुढ्यात रंगमंचावर नाटक सादर होते. तोंडाला रंग फासून गावच्या देवळात नाटक केले नाही, असा गोमंतकीय विरळा. गोमंतक देववेडा पाहिला, त्याचे नाट्यवेड दुसºया क्रमांकाचे. देववेडा आहे म्हणूनच नाट्यवेडा आहे.भरतमुनींचे जन्मस्थान कोणते, यावर नव्याने संशोधन करण्यापेक्षा ‘गोमंतभूमी’ हेच भरतमुनींचे जन्मस्थान असे छातीठोकपणे किमान गोमंतकीयांनी तरी म्हणायला काय हरकत आहे? गोव्यातील देवळांची संख्या आणि त्यांच्या पुढ्यातील रंगमंचांची संख्या काढून तर बघा म्हणजे विश्वास बसेल. गोवेकरांनी सर्वत्र ईश्वर पाहिला आणि मनोभावे त्याला पूजिले ते नाट्यप्रयोग सादर करूनच. घाटावरून गाडी चालली की कंडक्टर खाली उतरून उदबत्ती लावेल, नाणं ठेवेल आणि नारळ ठेवून नमस्कार करेल. इथे कसला देव आहे रे? तो म्हणेल घाटेश्वर. एखादी पाण्याची झरी लागली की म्हणेल इथे झरेश्वर आहे म्हणून नमस्कार केला. बाबराने हिंदंूना छळले, देश लुटला असे इतिहास सांगतो. कळंगुटजवळ बाबरेश्वर नावाचा देव/मंदिर आहे. त्याचीही पूजा होते. अर्थात नाटक आलेच. साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले; पण गोव्याचे ना देववेड थांबले ना नाट्यवेड.