- प्रा. डॉ. यशवंत पाटील
व्रत-वैकल्य करणारा / करणारी ती / तो ‘व्रतस्थ’पण विवेकानंद व्रतस्थाचा अर्थ सांगताना म्हणतात, ‘जी व्यक्ती आयुष्यातील कोणतेही स्वीकृत कार्य अखंड-अव्याहत-अथकपणे करते ती ‘व्रतस्थ’. या व्रतस्थपणास कोणतीही जात-धर्म-पंथ-देश-लिंग वा अन्य कोणत्याही भेदा-भेदाचे बंधन नसते. काण हा व्रतस्थपणा अंत:करणातून आणि तीव्र मन:शक्तीतून निर्माण होतो.
विविध क्षेत्रांत लागलेले अनेक शोध, झालेली प्रगती, उभी राहिलेली मोठमोठी सामाजिक कामे, वैयक्तिक जीवनात काही व्यक्तींनी साधलेल्या प्रगतीच्या मुळाशी ‘व्रतस्थ’पणाचाच विचार आढळतो. योगावर संशोधन, भाष्य आणि लेखन करणारे पतंजली ऋषी सांगतात, ‘व्रतस्थपणा हा योगाचा पाया आहे. त्यातील व्रतस्थपणाची कृती आणि वृत्ती अंतर्मनातून आली की ‘योग’ सिद्ध होतो.
श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ज्ञानभक्ती आणि कर्मयोगाच्या समन्वयातून येणारा व्रतस्थपणा कसा श्रेष्ठ असतो हे सविस्तर स्पष्ट केले आहे. व्यक्तिगत, सामूहिक, कौटुंबिक, संस्थात्मक पातळीवर ते सिद्धही झाले आहे. उदा. मुंबईतील डबेवाल्यांचे शिस्तबद्ध काम पाहून इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सला डबेवाल्यांचा ‘व्रतस्थपणा’ भावला म्हणून त्यांनी त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. नुकत्याच दिवंगत झालेल्या भाऊसाहेब चितळ्यांनी त्यांच्या व्रतस्थ वृत्तीतूनच जागतिकीकरणाच्या अगोदर ‘चितळे मिठाई’चा ब्रॅण्ड सर्वत्र लोकप्रिय केला.
शैक्षणिक, सामाजिक वा अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी हे दाखवून दिले आहे की, ‘कुणीही व्यक्ती, कोणत्याही क्षेत्रात ‘व्रतस्थ’ वृत्तीने आपला ठसा उमटवू शकते. कै. बाबा आमटे, मदर तेरेसा, अनुताई वाघ, नानाजी देशमुख, भीमसेन जोशी, कर्मवीर भाऊराव पाटील इ. व सद्यस्थितीतही गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इ. म्हणून व्रतस्थ वृत्तीला व्यक्ती, कुटुंब, देश, धर्माचा संस्कार म्हणतात ते यामुळेच.