प्रल्हाद वामनराव पैमित्रांनो, शिल्पकला जाणणारा शिल्प बनवू शकतो. चित्रकार सुंदर चित्र काढतो. शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावतात. शेतकरी धान्य पिकवितात, तसेच वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये अनेक प्रकारची कामे वेगवेगळी माणसे करीत असतात. या सगळ्या मंडळींकडे ती-ती विशिष्ट कामे करण्याचे ज्ञान असते. त्या ज्ञानाच्या आधारे काम करून जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा ते मिळवितात आणि आपल्या अनेक गरजा पूर्ण करतात. आता जरा विचार करूया! वरील सर्वांनी जीवनासाठी मेहनत, कष्ट, श्रम केलेले आहेत. बरोबर! पण तरीही प्रश्न असा येतो की, गरजा जरी पूर्ण झाल्या तरी ते पूर्ण समाधानी, सुखी आहेत का? जीवनाचं शास्त्र त्यांना माहीत आहे का? म्हणजे जीवनात एखादी समस्या आल्यावर ते त्या समस्येला कसे सामोरे जातात, सुख-दु:खामध्ये त्यांचे विचार कसे असतात, स्वत:बरोबरच इतरांच्याही प्रगतीचा ते विचार करतात का, परस्परांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत का? मुलांनो, आपले यशस्वी जीवनशिल्प घडवत असताना इतरांच्या जीवनशिल्पालाही आपला हातभार नकळतपणे लागत असतो.
खरं म्हणजे तेव्हाच आपलं जीवनशिल्प परिपूर्ण होतं आणि ते कसं करायचं, हे समजावून देणारं जीवनाचं शास्त्र म्हणजे ‘जीवनविद्या’! जीवन जगण्याची विद्या! अशा या जीवनविद्येचे अनेक पैलू आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये पाहिले, अभ्यासले. जीवनविद्येच्या या शास्त्राचा पाया आहे. आपल्या ऋषिमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरू वामनराव पै यांना त्यांच्या जीवनात आलेले अनुभव आणि आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी त्यावर केलेले सखोल चिंतन! त्यामुळे हे शास्त्र निश्चितच विश्वसनीय आणि शाश्वत आहे. जीवनविद्येची गुरुकिल्ली निसर्गनियमांवर आधारित आहे. मानवी संस्कृतीशी संबंधित आहे आणि विश्वातील प्रत्येक माणसासाठी उपयुक्त आहे. कारण, जीवनविद्या सांगते ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’