- विजयराज बोधनकरदूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते. अगदी माणसाचंही आयुष्यही दुधासारखंच आहे. आयुष्यात काहीच केलं नाहीतर आयुष्य दुधासारखं नासून जातं, अगदी तसंच अति सुखाच्या मागे लागलं तर सुखही नासून जातं. जसे दुधापासून कापलेले लिंबू चार हात दूर ठेवावे लागते, तसे षड्रिपूचे लिंबूही दूर ठेवावे लागते. दुधासाठी लिंबू जसे विष असते, तसे उत्तम जगण्यात अति सुखाचे आगमन झाले की माणसाचं मन अस्थिर होत जातं आणि आपल्या अवतीभोवती आपला द्वेष करणारे स्वार्थ साधू पाहणाीे भकास माणसे गोळा होत राहतात आणि ते लिंबूसारखेच असतात.दुधात लिंबू पिळणारी मंथरा वृत्ती आजही आपल्या आजूबाजूला घुटमळत राहू शकते. अशा बऱ्याच घातकी वृत्तीला जिंकणे हेच महत्त्वाचे असते, बरेचदा ती मंथरा मनातही दडलेली असते. म्हणून तर संतसंगतीची परंपरा आपल्या देशात जन्माला आली. चार शब्द कानावर पडले तरी ते औषधासारखे कामी पडतात. अति दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर मनाला तिथपर्यंत नेण्याअगोदरच मनातल्या सत्संगाची दारे उघडली तर मनातली, डोक्यातली भुतावळ हळूहळू पळून जाऊ शकते. त्यासाठी कुठल्याही सत्संगाच्या मंडपात जाण्याची गरज नसते. आपल्या मनबुद्धीच्या मंडपात आपणच आपला चिंतनाचा सत्संग करू शकतो, अज्ञान आणि ज्ञान याचा गुंता फक्त आपणच सोडू शकतो.अति सुखाची कुटुंबाला लागण झाली की समजायचे आता सत्संगाची वेळ आली आहे. षड्रिपूंचा विजय होण्याअगोदर आपले सत्यवृत्तीचे शस्त्र तयार ठेवले पाहिजे. मोहात अडकून कैकयीचे, रावणाचे काय झाले हे आपण जाणतो. आयुष्यात अकारण मोहात माणूस गुरफटत जातो आणि शेवटी हाती येत काय? केवळ निराशा, बुद्धाच्या मार्गांवर शांती आहे, निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका.
निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:30 AM