डॉ. रामचंद्र देखणे
शीतलता आणि सुंदरता यांचा एक आल्हादकारी सुंदर समन्वय म्हणजे पौर्णिमा. भगवंताने गीतेत ‘नक्षणामहं शशी’ असे सांगत परमात्म्याच्या शांत तत्त्वाची आणि सौंदर्याची विभूती म्हणून चंद्राला गौरविले आहे. पौर्णिमेचा चंद्र हा तर पूर्णत्वाचा आविष्कार. प्रसन्नतेचे पूर्णत्व हीच जणू पौर्णिमा आहे. महाकवी संत, प्रज्ञावंत यांनी चंद्र आणि पौर्णिमा यांचे रूपक ठायी ठायी मांडले आहे. ज्ञानदेवांनी सद्गुरूंची प्रसन्नता चंद्राच्या रूपकातून मांडली आहे.
ज्ञानदेव म्हणतात, ‘‘अगा विश्वैकधामा। तुझा प्रसादु चंद्रमा। करू मज पूर्णिमा। स्फूर्तीची जी।।’’ ज्ञाने. १४-२३ हे विश्वैकधामा, तुझा प्रसादचंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो, आणि नवरसांचे सागर भरवीत, विवेकवल्लीची लावणी करीत माझ्याकडून या भावार्थालाही खरे पूर्णत्व लाभो. एकदा का पौर्णिमेच्या चंद्राच्या शांत, अमृतत्वाचा अनुभव घेतला की तृप्तीचेही पूर्णत्व लाभते. प्राचीन काव्यात चकोर पक्षी आपल्याला ठायी ठायी आढळतो. तो चकोर फक्त पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे पिऊनच जगतो अशी कल्पना आहे.
ज्ञानदेव पुढे म्हणतात, ‘‘सांगे कुमुदळाचेनि ताटे। जो जेविला चंद्रकिरणे चोखटे। तो चकोरू काई वाळवंटे। चुंबितु आहे।।’’ ज्ञाने. ४-१०७ ज्याने चंद्रविकासी कमळाच्या ताटात पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा आस्वाद घेतला, त्याला इतर काही खावे अशी इच्छा तरी होईल का? ही पूर्णत्वाची तृप्ती आणि तृप्तीचेही पूर्णत्व पौर्णिमेचा चंद्रच देऊ शकतो. खरे तर या पूर्णत्वाची अनुभूती आपल्याही जीवनाला लाभावी यासाठी कोजागरी पौर्णिमा आहे. त्यासाठीच या कौजागरी पौर्णिमेची योजना आहे, हे निश्चितच. पूर्णत्वाच्या अनुभूतीचा लाभ सर्वांनी घ्यावा, अशी अपेक्षा आहे. तद्वतच, अशी कल्पना आहे की कोजागरीच्या मध्यरात्री लक्ष्मी भूतलावर उतरते आणि ‘वरदा लक्ष्मी; को जागर्तीति भाषिणी।’ या संपन्नतेच्या, आनंदाच्या, वैभवाच्या पूर्णत्वासाठी कोण जागे आहे? असे विचारते. या वेळी उत्साहाने, प्रफुल्लतेने वरदा लक्ष्मी देवीचे स्वागत करणे आवश्यक असते. तसे झाले तर संपन्नता, आनंद, वैभवाची प्राप्ती होते. जागेप्रमाद, आळस झटकून कर्मजागृती व्हावी, अज्ञान संपवून ज्ञानजागृती व्हावी तर आत्यंतिक भोगवासनेला सोडून विषय जागृती व्हावी आणि जागले होऊन जागेपणे जगावे हेच खरे मानवी जीवनाचे प्रयोजन होय.