भज गोविंदम्-७
नलिनीदलगत जलमतितरलं तद्वज्जीवितमतिशयचपलम्।विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तम्॥भज गोविंद्म.. भज गोविंदम्.. भज गोविंदम मुढमते....॥ध्रु॥ ७
कमलापत्रावरील जलबिंदू अतितरल म्हणजे अतिशय अस्थिर, चंचल असतो. त्याचप्रमाणे जीवनही अस्थिर असते. असे जाण सर जग रोग आणि अहंकार व शोकाने ग्रस्त झालेले आहेत असे जाणावे.
श्रीमद् आद्य शंकराचार्यांचे वाङमय प्रासादीक तर आहेच. पण जीवाला जागृत करणारे आहे. वरील श्लोकामध्ये एक सुंदर असा विचार आचार्यांनी मांडला आहे. जीवन हे क्षणभंगुर आहे. याकरीता त्यांनी कमल पत्राचा दृष्टांत दिला आहे. कमल पत्रावरील पाण्याचा थेंब हा स्थिर राहत नाही. कारण ते पान अतिशय मऊ असते. पाणी सुद्धा त्यावर ठरत नाही. आपले जीवनही तसेच आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा। व्हा रे.. सावध सोडा, माया आशा। न चळे बळ पडेल मग फासा । पुढे हुशार थोर आहे वोळसा गा ॥३ राम राम स्मरा आधीं ।
जीवन अतिशय क्षणभंगुर आहे याची शाश्वती नाही. येथे नाही उरो आले हरिहर अवतार येर ते पामर जीव किती तु.म.
जे भगवंताचे अवतार झाले ते सुद्धा राहिले नाहीत. त्यांना सुद्धा देह सोडवा लागला. त्यामुळे बाकीच्या जीवांची काय कथा. खबर नाही इस जुगमे पलकी को जाने कलकी? उद्याचे काय घेऊन बसलात? ताटातील घास ओठात जाईल की नाही व ओठातील घास पोटात जाईल की नाही याची सुद्धा खात्री नाही. एक सुंदर दृष्टांत आहे. एकदा काय झाले. धर्मराजा काही पर्वकालानिमित्त दानधर्म करीत होता. दिवसभर त्याने हजारो याचकांना दान दिले. संध्याकाळी शेवटी एक याचक आला. धर्मराजा त्याला म्हणाला की, तू आता उद्या ये. वेळ संपली. भीम तेथेच होता. तो लगेच नगारखान्यात गेला आणि जोरजोरात नगारा वाजवू लागला. त्याला काय आनंद झाला म्हणून धर्मराजा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, अरे ! भीमा तुला कसला आनंद झाला म्हणून तू हा नगारा वाजवतोस? भीम म्हणाला, दादा थोडा वेळ थांबा. मला फार आनंद झालाय वाजवू द्या मला नगारा.
अरे पण भीमा मला सांग तरी तुला कोणता आनंद झाला. तेव्हा भीम म्हणाला, दादा तुम्ही उद्या सुद्धा जिवंत आहात. यापेक्षा कोणता आनंद असू शकतो? कारण तुम्ही त्या याचकाला म्हणालात की, तू उद्या ये. आता वेळ संपली म्हणजे तुम्हाला उद्याची खात्री आहे म्हणून मला आनंद झाला. हे ऐकल्यावर लगेच धर्मराजाने त्या याचकाला बोलावून घेतले आणि त्याला इच्छित दान दिले. कारण त्याच्या लक्षात आले की उद्याचे काहीही खरे नाही.
आचार्य त्यासाठी कमाल पत्राचे उदाहरण देतात. जीवनाचा गहन अर्थ सांगतात. आणखी पुढे सांगतात की, हे जीवन रोगग्रस्त आणि अहंकाराने भारलेले आहे. मदलसेने आपल्या मुलाला उपदेश करताना म्हटले की, हा देहो नाशिवंत मळमुत्राचा बांधा। वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा। रवरव दुर्गंधी रे.. अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥ या देहाचा भरवसा पुत्रा न धरावा? सा। माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा। बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा ते सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥ हा देह नाशिवंत आहे. या देहात मल, मूत्र, भरलेले आहे. या देहाची दुर्गंधी येते. या देहात रोग, व्याधी असतात. हे बालका तू या देहाचा भरवसा धरू नको. माझे माझे म्हणून या देहाचे तादात्म्य धरू नको. हे जीवन दुख:मय आहे. भगवान गौतम बुद्ध सुद्धा सांगतात, दुखं दुखं क्षणिकम क्षणिकम सर्व दुखमय असून क्षणिक आहे आणि अशा या देहाचा जीवाला किती अहंकार असतो. सारखा मी मी, माझे माझे करीत असतो. एक दिवस हे सगळे सोडूनच जावे लागेल .
आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा नाम हरी का साथ जायेगाऔर तू कुछ न ले पायेगाआएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ... हे जीवनाचे सत्य सार आहे व याचा विचार जीवाने केला तर सहज परमार्थात त्याचा प्रवेश होईल यात शंका नाही.
-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले, गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी पाटील, ता.नगर.