ठळक मुद्देअत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा.तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे. तसाच तो 'तोरण' असाही आहेगुढी उभी करताना ब्रम्हांडामधील शिव-शक्तींच्या लहरींना आवाहन करुन तिची स्वास्तिकावर उभारणी करावी.
चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ हि गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.
गुढीपाडवायच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठी हि चांगली असतात. चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरु होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी हि पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. आजकाल गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून लोक पारंपरिक पेहराव करून एकत्र जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात.
गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व
गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कळक(बांबू) हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो.
नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते.
असे मानले जाते कि जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे.
राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले. आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते.