- विजयराज बोधनकर
शेषराव आणि मुरलीधर हे दोघेही बालमित्र, एकत्रच शिक्षण पूर्ण केलं, दोघांनाही नोकऱ्या लागल्या. मागेपुढे दोघांची लग्नं झाली, संसार बहरला. काही वर्षांतच मुलांच्या शैक्षणिक जबाबदाºया पार पडल्या. मुलांची लग्नं झाली. नातवंडं झाली. दोघेही निवृत्तीचा उंबरठा ओलांडून शांतीच्या मार्गावरून चालू लागले. पण बºयाच वर्षांत शेषरावची भेट झाली नाही म्हणून मुरलीधर अस्वस्थ होते. त्यांनी बºयाच वर्षांनी शेषरावच्या घरी फोन केला तेव्हा कळले की शेषराव आता कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहतात. तेव्हा मात्र मुरलीधर खूप अस्वस्थ झाले. शेषरावच्या मुलाकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन जिवलग मित्राला तातडीने सपत्नीक भेटायला गेले.
अचानक मुरलीधरांना वृद्धाश्रमात पाहून शेषरावचं मन भरून आलं. इतक्या काटकसरीने जीवन जगणारा आपला मित्र अशा अवस्थेत पाहून मुरलीधर यांना खूप वाईट वाटलं. हळूहळू गप्पांच्या ओघात मुरलीधर यांच्या प्रश्नाला उत्तरे मिळत गेली. शेषराव यांनी अतिलाडाने मुलं बिघडतात अशा विचारामुळे शिस्तीचा अतिरेक केला होता. कधीही त्यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नव्हती. त्यामुळे शेषराव आणि मुलांमध्ये मित्रत्वाचं नातं कधीच निर्माण न झाल्याने मुलांमध्ये बापाविषयीचा ओलावा निर्माणच झाला नव्हता.
मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आयुष्यभर मुलांशी जेलरसारखं वागल्यानंतर मुलांकडून वृद्धापकाळात प्रेम मिळण्याची अपेक्षा शेषराव गमावून बसले होते. मुलं ओल्या मातीच्या गोळ्यासारखी. आकार देऊ तशीच ती होतात. त्यांना प्रेम दिलं ते प्रेमच देतील. पेरू तेच उगवतं. शेषराव यांच्याबाबतीत हेच झालं होतं. याउलट मुरलीधर यांनी त्यांच्या मुलांना मित्रत्वाच्या नात्याने वाढवलं होतं. त्यांची मुलं मात्र त्यांना जीवापाड जपत होती.