- शैलजा शेवडेभगवान महादेवाची दोन रूपं. जटाधारी रूप तर कैलासातले; पण मुण्डित केशरूप, जे मनुष्यलोकांत प्रसिद्ध त्या जटाजूटधारी रूपाला नमस्कार आणि मुण्डित केशरूपाला म्हणजे यती रूपातील शिवाला नमस्कार. म्हणजे आदिशंकराचार्यांना नमस्कार. त्यांनी शिष्यांना समस्त वेदांत साररूप दिले. ब्रह्मज्ञान दिले. वेदनिर्दिष्ट धर्माचा उपदेश केला. वैदिक धर्माचा ºहास होऊ लागला. मत-मतांतरे होऊ लागली, तेव्हा जणू प्रत्यक्ष शिवानेच अवतार घेतला. जैन, बौद्ध मतांकडे आकर्षित झालेले लोक वैदिक धर्माकडे परत ओढले गेले. आचार्यांनी वेदांचा नेमका अर्थ सांगितला. अर्थ न कळल्यामुळे जी गोंधळाची स्थिती माजली होती, जो अंधकार झाला होता, तो आचार्यरूपी सूर्याने जणू घालवून टाकला. मनातला संशय दूर झाला. त्यांनी लोकांना सगळीकडे ब्रह्म आहे, तुमच्या, माझ्यात एकच परमात्मा आहे हे सांगितले. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन केले. ब्रह्मसूत्रे, बारा उपनिषदे, भगवद्गीता, विष्णुसहस्रनामांवर भाष्य लिहिले. त्यांच्याच दक्षिणामूर्ती स्तोत्रात ते दक्षिणामूर्तीचे म्हणजे ज्ञान देणाऱ्या शिवाचे वर्णन करतात,मौनातुनी प्रकट करिती, युवकगुरू परब्रह्मतत्त्वा,वेढलेल्या वृद्ध श्रेष्ठ , ब्रह्मनिष्ठ तपस्वी शिष्यां,चिन्मुद्रा दावती कर, आचार्येंद्र आनंदमूर्ती,स्वात्मारामी प्रसन्नवदन, नमन त्या दक्षिणामूर्ती ।वटवृक्षाखाली गुरू-शिष्य बसले आहेत. गुरूंचे व्याख्यान मौन आहे आणि शिष्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान होत आहे. दक्षिणामूर्ती शिवाचे वर्णन; पण असे वाटते की, जणू ते त्यांचेच वर्णन आहे. अनेकांच्या हृदयात त्यांनी ज्ञानदीप चेतवला. भक्तिरसाने परिपूर्ण अशी असंख्य स्तोत्रे लिहिली. अद्वैतवादाचा म्हणजे वेदांताचा प्रसार केला. चार पिठे स्थापन केली. सगळ्या हिंदंूमध्ये पंचदेवता पूजन पद्धत रूढ केली. एकतत्त्व परमात्म्याला जाणा, भेदाभेद करू नका, असा संदेश त्यांनी दिला. त्या पूज्यपाद आद्य शंकराचार्यांना अत्यंत श्रद्धेने प्रणिपात..!
मत-मतांतरे होऊ लागली, तेव्हा जणू प्रत्यक्ष शिवानेच अवतार घेतला.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:16 AM