आपल्या साधक अवस्थेत नरेंद्र अर्थात विवेकानंदांनी आनेक गुरूप्रमाणे रामकृष्ण परमहंसांनासुद्धा एकच गहन प्रश्न विचारला होता, देव कोठे आहे? तुम्ही मला देव दाखवू शकाल का? रामकृष्णांनी मणभर उपदेशापेक्षा कणभर कृती केली अन् दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी विवेकानंदास पाण्याच्या तळात काही मिनिटे बुडविले आणि विचारले, भेटला का देव? स्वामीजी म्हणाले, देव नाही भेटला, पण काही क्षणात मृत्यू भेटला असता. परमहंस म्हणाले, नरेंद्रा, यालाच म्हणतात देव, ज्याच्या प्राप्तीसाठी तन-मनाला मरणप्राय वेदना होतात, ते घेण्याचे शिखर म्हणजे देवच ना! ते मला केव्हा भेटेल, म्हणून मी स्वत:ला शोधत गेलो आणि उद्धाराच्या पाऊलवाटा आपल्याच पायाने पादाक्रांत करीत गेलो, तेव्हा मला दरिद्री नारायणाच्या भाकरीत देव दिसला. अत:करणातील सद्भावाचे भरते जेव्हा मी आयुष्याच्या समेवर सादर करीत राहिलो, तेव्हा मला आयुष्याच्या सीमेवर देव भेटला. देव कोठे आहे? हा प्रश्न जेव्हा मनात आला, तेव्हा
विठ्ठल जळी-स्थळी भरला। रिता ठाव नाही उरला।आज मी दृष्टीने देखीला । विठ्ठलची-विठ्ठलची ।।
असा माझा सप्तपाताळात भरून उरला, विचारवंताच्या मनीमानसी विचारांच्या रूपाने प्रकट झाला. जळातळात काष्टापाषाणात जेव्हा मला त्याचे अस्तित्व जाणवले, तेव्हा तो मला उंचउंच पिकावर डोलणाºया कणसात भेटला, असे जेव्हा तुकोबाराय वर्णन करतात, तेव्हा देव कोठे आहे? हा निरर्थक प्रश्नच शिल्लक राहत नाही, पण आज मात्र या प्रश्नाशिवाय दुसरे काही शिल्लक नाही, असे दिसते. देव शोधायचा आपला पत्ता चुकला आहे. देवासाठी आम्ही देव्हारे तयार केले, पण हृदयाचा गाभारा मात्र दुसºयालाच देऊन बसलो.
- प्रा. शिवाजीराव भुकेले