समाज हा आरसा आहे. तुम्ही जसे त्यांस सामोरे जाल तसेच प्रतिबिंब तुम्हांस दिसेल. आपण अन्यायाने वागून, दुसºयाकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे खचितच गैर आहे. पण हे अनेकांस उमगत नाही. आणि तेच त्यांच्या दु: खाचे कारण होते. थोडक्यात पेरावे तेच उगवते अशी म्हणी काही खोटी नाही. अवगुणापासून सदैव दूर राहायला हवे. या अवगुणांपासून स्वत:चे रक्षण केले तरच उत्तम गती प्राप्तं होते. दुसºयाची निंदा करणे हा एक अवगुण असून, परपीडा, परनिंदा करणे तसेच दुसºयाचे धन, वस्तू अथवा स्त्री चे हरण करणे, थोरांस योग्य तो आदर न देणे, स्व बळावर उन्मत्त होऊन दुसºयाला त्रास होईल असे वागणे पाप आहे. असे केल्याने दुष्कीर्ती होऊन अधोगती होते. नकारात्मक विचार हे देखील मनुष्याच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात. मी, माझे या भांडणात शांती, सुख, समाधान निघून गेले आहे. दु:ख, दैन्यं आणि अवगुणांचे वास्तव्य राहिले. ही स्थिती आपली होऊ नये म्हणून
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचिती ।जन्म दो दिसांची वस्ती । कोठेतरी करावी ॥ हे जग नश्वर आहे, जीवन क्षणभंगुर आहे हे जाणून वृथा त्याचा लोभ ठेवू नये. निर्लेप वृत्तीने जीवन व्यतीत करावे. आपली मयार्दा जाणावी, आपले विहित कार्य विरक्तपणे करत जावे म्हणजेच या आयुष्याचे ओझे होणार नाही. या सृष्टीवर आपल्या इतकाच इतर प्राणिमात्रांचाही तितकाच हक्क आहे हे जाणून घ्यावे, म्हणजे अधिकारासाठीचा संघर्ष संपेल. क्रोध, मद, मत्सर आणि त्या योगे येणारे क्रौर्य लोप पावेल आणि हे जग आणि जगणे सुंदर होईल. अशा प्रकारे समर्थ अतिशय सुलभ पद्धतीने मनुष्य जन्माचे प्रयोजन सांगतात. देह हा परमार्थाचे साधन आहे. जो हे जाणत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे.
- शून्यानंद संस्कारभारती