- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
इंद्रिय बलवान असतात. वासनेला पूर्णत्वाला नेण्याकडे त्यांची वाटचाल असते. मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, त्यानुसार इंद्रियांना चालना मिळते. मनाप्रमाणे इंद्रिय वागतात. अपरिपक्व बुद्धी असलेल्या माणसाला विकार वश करतात. इंद्रियांच्या इच्छेनुसार मनुष्य वागला तर उंच स्थान निर्माण केलेल्या मनुष्यालाही खाली खेचतात. कारण मन अत्यंत प्रबळ आहे. प्रभावशाली असलेल्या मनावर विजय मिळवल्यास इंद्रिय ताब्यात राहातात. जो मनुष्य शांत, बुद्धिवान किंवा आत्मज्ञानी असतो, तो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो. कारण ज्ञानी मनुष्य लाभ, हानी याचा विचार करीत नाही. तो शांत चित्ताने व प्रसन्न मनाने येणाऱ्या विषयाला तोंड देतो. शांतपणे एखादा विषय हाताळतो. सुख वा दु:ख याप्रसंगी तो समान भाव ठेवतो जो मनुष्य शास्त्रविदित कर्म करतो तो अनेक प्रकारच्या चिंतेतून मुक्तहोतो. तो नेहमी प्रसन्न असतो. तो आपल्या इच्छेनुसार सर्व कर्म करतो. त्या मनुष्याला शोक-मोह बाधत नाही. तो एखादे कार्य करत असतानाही जीवन्मुक्तासारखे करतो. तो सर्व भोगूनसुद्धा त्यात आसक्ती ठेवत नाही. कारण त्याला माहिती आहे, मनच सर्व सुख-दु:खाचे कारण आहे. त्यामुळे तो निर्मलतेने जीवन जगतो.मनामुळेच माणूस बंधनात अडकतो किंवा मनामुळेच त्याला मुक्ती मिळते. जीवन जगताना सर्व कार्य मनावर अवलंबून आहे. जीवात्मा किंवा इंद्रिय जे कार्य करतात ते मनानुसारच.. मनावरच भेदभाव अवलंबून आहे. शत्रूता, मित्रता, किंवा उदासीनता ही मनाचा खेळ आहे. एकात्मता किंवा अनेकात्मता मनावर असते. विद्यावान मनुष्य सहजतेने कर्म करतो. अविद्या ही भेद उत्पन्न करते. भेद उत्पन्न झाल्याशिवाय एकरचतेचा अनुभव येत नाही. त्यामुळे मनाचा व इंद्रियांचा संबंध लक्षात ठेवा, इंद्रिय इंद्रियांचा विषयात स्वत: रममाण होतात. त्यात आत्मा निर्विकार असतो; परंतु त्याचे दोषारोपण त्या आत्मावर होते. आत्मा तर नेहमी शुद्ध आहे. आत्मा कधी बंधनात नसतो. बंधन-मोक्ष ह्या सर्व मनाच्या प्रक्रिया आहेत. मनाला शांती मनच देऊ शकते. ज्याचे मन निर्मल आहे त्याला शांती मिळते.. ज्याचे मन निरंजन किंवा निर्विकार आहे त्याचा आत्मा बंधनात अडकत नाही. म्हणजेच इंद्रियांवर त्याने पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो. मन निर्मल असले की सर्व निर्मल होते. इंद्रियांवर ताबा राहातो. इंद्रियांवर ताबा मिळवला की त्याचे वैराग्य सिद्धीत जाते. मग तो नि:संदेह मुक्ती मिळवतो.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)