संतांनी आपल्याला कर्मातच ईश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे. आपल्या हाती आज परमेश्वराने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जे काम दिले आहे त्या कामातच परमेश्वराला पाहणे हाच कर्मसिद्धांत आपल्या कर्तव्याला योग्य न्याय देऊ शकतात. संत ज्ञानेश्वर श्शयांच्या भावार्थ दिपीकेतील कर्म व विकर्माची धुसर रेषा योग्य कर्मासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानवी जीवनाला योग्य दिशा व परिमाण प्राप्त होण्यासाठी विकर्म म्हणजे काय? विकर्मांचे खरे स्वरूप व विकर्मांबद्दल असणारे सामान्य माणसांचे गैरसमज यासाठी योग्य दिशादर्शक आहे. कर्माला सत्य व सातत्यपूर्ण विकर्मांची जोड दिल्यास मानवी वृत्ती मध्ये होणारा सकारात्मक बदल हा मानस पातळीवरील असल्याने मानवी जीवनाला तो उपकारकच ठरलेला आहे. विकर्म म्हणजे काय? तर मानवाच्या कल्याणासाठी संतांनी सांगीतलेली योग्य कर्म. त्या कर्माच्या आधारे मानवाने आपल्या संपूर्ण जीवनप्रवासामध्ये योग्य त्या कर्मांची निवड करून त्याद्वारा दैवी संपत्तीचे गुण अंगी बाणवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणे होय. असे सर्वच संतांना यांना त्यांच्या कर्म श्रद्धेने व साधनेने नमुद करावेसे वाटते. श्रीज्ञानेश्वरी व त्यातील विविध विकर्म व विशुद्ध कर्म जर निश्चिंत मनाने करावयाची असतील तर त्यांना विकर्मांच्या स्वरूपातील योग्य प्रमाणामध्ये वापरण्याची तयारी साधकाची पाहीजे. त्यामुळे वृत्ती निर्भय होईल व हातून सत्कर्मे घडतील. दिव्यत्वाच्या प्रचितीसाठी ‘कर्मे ईशू भजावा’ असा दिव्य संदेश संत तुकारामांनी सुद्धा त्यांच्या अभंगवाङमयातून दिलेला आहे. कर्माला देव मानण्याची आपल्या भारतीय संस्कृतीमधील शिकवण ही अवघ्या जगामध्ये अद्वितीय आहे. जया करणे आत्महित । स्वधर्म आचरावा सतत।। कर्मे नित्य नैमित्यिक । ब्रम्हप्राप्ती लागी देव।। तिचि नित्य आचरावी । चित्तशुद्धी तेणे व्हावी ।। एका जनार्दनी कर्म । ईशभक्तीचे हे वर्म।। संत एकनाथांनी असे विकर्मांचे महिमान आपल्या एकनाथी भागवतातून मांडले आहे. त्यांना प्रत्येक योग्य कर्मामध्ये ईश्वर भक्तिची आराधना वाटते. साधकाने चित्तशुद्धीसाठी विकर्ममार्गाचे पालन करावे. कर्म तैसे फळ या सिद्धांतानुसार कर्माप्रमाणे फळ हे मिळणारच आहे. गीता तत्वानुसार- कर्मन्येवाधिकारस्ते । मा फलेशु कदाचन । मा कर्फलहेतूभूर्मा ते संङगोsस्त्वकर्माणि म्हणजेच नियत कर्म करीत राहावे. निष्काम बुद्धीने केलेले कर्माचरण हे सर्वश्रेष्ठ असून कर्माच्या फलाची आसक्ती नको. आत्मज्ञानाविषयीच्या संकल्पना लेखकांनी अगदी स्पष्ट मांडल्या आहेत. ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायातील संदर्भ समर्पक वाटतो. ब्रम्हाची महती व ज्ञान ज्याला होते तो खरा ज्ञानी मानावा असे संत ज्ञानेश्वर सांगतात. विश्र्वातल्या प्रत्येक वस्तुमध्ये ब्रम्हतत्व लुप्त आहे याला ब्रम्हज्ञान म्हणतात. याचा अऩुभव घेणे म्हणजेच आत्मज्ञान होय. या आत्मज्ञानामुळे माणसाला जगण्याची व्यापकता प्राप्त होते. संपूर्ण विश्वच ईश्वरतत्वाचा अंश असल्याची जाणीव होते. जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।। त्यामुळे जगातील प्रत्येक वस्तू व जीव आपलाच बांधव असल्याची जाण वाढीस लागते. जसे जे जे भेटे भूत । ते ते वाटे मी ऐसे विश्वात्मकतेचा भाव यातून प्रगट होतांना दिसतो. सर्व संतांनी दीन दुबऴ्यांची सेवा केली आहे. आपल्या कृतीतून त्यांनी तसा संदेश दिला आहे. मग एकनाथांचे मसरणासक्त गाढवाला पाणी पाजणे असो, की नामदेवांची भुकेल्या कुत्र्याला पोळी देणे असो की , तुकारामांचे मुंग्यांना साखर घालणे असो. त्या सर्वानी एकच भाव प्रगट केलेला आहे तो म्हणजे प्राणीमात्रांविषयी सेवाभाव. संत तुकाराम महाराज तर म्हणतात- जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखांवा । देव तेथेची जाणावा।। सत्कर्म करण्यासाठी गुरूतत्त्वाच्या शक्तीशी एकरूप होण्याचा सिद्धांत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी मांडला आहे. सत्मकर्मांची सेवा बहरली की, गुरू तुमच्याजवळ धावत येतो. तुम्हाला गुरू शोधावयाची गरज नाही. तुमची निष्ठा प्रबळ पाहिजे गुरू तुमच्याकडे धावत येईल. तो आपल्या कर्तव्यतत्परतेत असतो. विकर्मांचे श्रेष्ठपण ज्ञानदेवांनी आपल्या गुरूनिष्ठेतून व्यक्त केले आहे. प्रत्येक विकर्मांचा धागा आपल्या पुस्तकात आपल्या पद्धतीने गुंफला आहे. विकर्मांच्या प्रत्येक धाग्यातून त्संत ज्ञानेश्र्वरांचा ज्ञानविचार महत्वाचा आहे. त्यातून ते संदेश देतात की, प्रत्येक माणसाने आपले जीवनकार्य सात्त्विक ठेवावे. त्यातुन सेवाभाव प्रगटावा. सेवेसाठी संकटांचा सामना करण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक कर्म शुद्धभावाने केले तर जीवनात प्राप्त होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आज संपूर्ण जगाला सत्कर्म करणा-यांची आवश्यकता आहे. सर्व जग अनाचाराच्या दुष्कर प्रवाहातून प्रवास करते आहे. अवघ्या जगाला आज संत विचारांची आवश्यकता आहे. विज्ञानयुगामुळे सर्व विश्र्व जवळ आले असले तरी मानसांची मने मात्र एकमेकांपासून कोसो दूर गेलेली आहेत. मनशांती समाजमनातून हद्दपार झालेली आहे. त्यामुळे सर्व जग अकर्मांच्या जाळ्यात अडकलेले आहे. त्यासर्वांना दिशा दाखविण्यासाठी संत ज्ञानेश्व्ररांनी सांगीतलेली विकर्मे अंगीकारण्याची आज काळाची गरज आहे.
- डॉ. हरिदास आखरे