- रमेश सप्रेमंदार एक यशस्वी व्यावसायिक होता. खूप श्रीमंत असला तरी आपल्यावर घडलेले संस्कार तो विसरला नव्हता. वाचनाचा छंद नव्हे, व्यसन त्यानं स्वत:ला लावून घेतलं होतं. व्यवसायानिमित्त प्रवास करताना त्याचं चिंतन सतत चालू असे. सकारात्मक विचारसरणी ही त्याच्या जीवनाचं अंग बनली होती. त्याला दोन मुलं. दोघंही प्राथमिक शाळेत. त्या शाळेसाठी त्यानं अनेक उपक्रम राबवले. योजना अमलात आणल्या. शिक्षणावरच्या त्याच्या विचारावर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव होता.
अन् म्हणूनच अनेकदा सांगूनही शिक्षक समोरच्या चिमुरडय़ा जीवांना म्हणजे बालविद्यार्थ्यांना मारतात याचं त्याला खूप वाईट वाटे. दुसरी मुलगी प्राथमिक शिक्षण संपवून शाळेतून बाहेर पडली त्या शेवटच्या दिवशी मंदारच्या मनात एक भन्नाट कल्पना आली.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्याध्यापिकेपासून साऱ्या शिक्षकवर्गाला पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दिवस आरामात राहाण्याची व्यवस्था त्यानं केली. एका अर्थानं तो या योजनेचा प्रायोजक होता. दिवसभर हसत खेळत एका विषयावर चर्चा करायची. रात्री मग विविध गुण दर्शन किंवा मनोरंजन.
चर्चेचा विषय देताना एक दोन मिनिटांचं भाषण सर्वापुढे मंदारनं केलं. त्यात एक गोष्ट सांगितली. अनेकांना ती माहित होती. एक आजी आपल्या शाळेत जाणा-या नातवाबरोबर राहत असते. हिचा मुलगा नि सून एका अपघातात मृत्यू पावल्यानं नातवाची जबादारी हिच्यावरच आली. नातू खूप हुषार होता. एकदा स्वातंत्र्यदिनाच्या परेडला मार्गदर्शन करत ध्वजाला मानवंदना देण्याची जबाबदारी नातू राजू याच्यावर सोपवण्यात आली. राजूनं पांढरा गणवेश काढला. पाहतो तो दोन बटणं तुटलेली होती. आजीला बटणं आणून देऊन ती संध्याकाळपर्यंत शिवून ठेवायला सांगून राजू शाळेत गेला. संध्याकाळी अंधार झाल्यावर घरी परतला. पाहतो तो आजी रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात काहीतरी शोधतेय. राजू म्हणाला, ‘आजी, काय हरवलंय? मी मदत करू का?’ आजी म्हणाली ‘अरे, तुझ्या सद-याला बटणं लावताना सुई धाग्यातून निसटून खाली पडलीय ती शोधतेय’, राजूनं आश्चर्यानं विचारलं, ‘आजी, पण तू रस्त्यावर बसून बटणं कशाला लावत होतीस?’ आजी म्हणाली, ‘नाही रे बाबा, मी झोपडीतच शिवत होते; पण तिथं अंधार आहे ना? रस्त्यावर छान प्रकाश आहे म्हणून इथं शोधतेय.’ राजू हसून उद्गारला, ‘अगं आजी, सुई जिथं पडली तिथंच सापडणार ना? इथं ती कितीही शोधली तरी मिळणारच नाही. चल आपण दिवा लावून झोपडीतच शोधू या.’ त्याचप्रमाणे केल्यावर राजूच्या तीक्ष्ण नजरेला सुई दिसली. नंतर आजीनं सद-याला बटणं लावूनही दिली.
ही गोष्ट सांगून मंदार समोरच्या शिक्षकांना म्हणाला, ‘चर्चेचा विषय असाच आहे. मुलांकडून चुका होतात ही ती पडलेली सुई. त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी वर्तनात बदल, चुका टाळाव्यात म्हणून मार्गदर्शन ही खरी पद्धत की त्यांना शारीरिक शिक्षा करून, भय दाखवून चुका सुधारणं योग्य? मनमोकळी चर्चा करा. इथं तुम्हाला हवं ते बसल्या जागीच मिळेल अशी व्यवस्था केलीय. आता फक्त तुमचे तुम्हीच असाल. चर्चेतून भावी काळासाठी निश्चित मार्ग निघेल अशी आशा करतो. धन्यवाद!’ असं बोलून मंदार तिथून निघूनही गेला. चर्चेला मार्गदर्शन करण्यासाठी एका अनुभवी समुपदेशकाची योजना केली असल्यानं चर्चा रंगली. अगदी निश्चित मार्ग जरी निघाला नाही तरी समस्या एकीकडे आहे; पण आपण उपाय दुसरीकडे करत आहोत याची जाणीव सर्वाना झाली.
मुलांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना कधीही शारीरिक शिक्षा करायची नाही. याउलट प्रेमानं जवळ घेऊन प्रसंगी रागावून त्यांना सुधारायचं याबद्दल एकमत झालं. शांती, आनंद, समाधान ज्यातून मिळणार नाही त्यातून मिळवण्याचा खटाटोप आपण करत असतो. चांगले कपडे, दागिने घालून श्रीमंतीच्या थाटात आलिशान घरात राहून महागाडय़ा वाहनातून फिरून, विविध पार्टी, समारंभ यात सहभागी होऊन कधीही आनंदाची प्राप्ती होणार नाही. एकवेळ गवताच्या ढिगात हरवलेली सुई शोधून काढणं जमू शकेल पण जिथं सुई नाहीच आहे तिथं कितीही शोध घेतला तरी ती सापडणार नाहीये.
आनंद हा निरालंब आहे म्हणजे कशावरही अवलंबून नाही. कोणतीही वस्तू, व्यक्ती सर्वाना आनंद देऊ शकणार नाही. आपण आतूनच आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे. कोणत्याही स्थितीत किंवा परिस्थितीत आपली मन:स्थिती आनंदी ठेवण्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. याला एकही पैका वा साधन लागत नाही. कदाचित म्हणूनच आनंद मिळवणं अवघड जात असेल.
सत्ता, संपत्ती, सौंदर्य यातून आनंद मिळत नाही. उलट अनेक सत्ताधीश, संपन्न सुंदर व्यक्ती सतत ताणतणावाखाली असतात असं दिसून येतं. आनंदाच्या बाबतीत असं म्हणता येईल तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!