-चंद्रकांत महाराज वांजळे
मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे. जीवन आणि शरीर याविषयी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज एकाठिकाणी सुंदर विचार मांडतात, ‘शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरा साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रम्ह...’’ एवढी मोठी गुणवत्ता मनुष्य शरीरामध्ये आहे. त्याच अनुषंगाने मनुष्य अनेक इती कर्तव्ये पूर्ण करतो. यात फार मोठी अद्भुतता आहे. जीवन हे चंगळवादी आणि भोगवादी असेल, बंदिस्त झालेले असेल, तर ही हानी संत महात्मे पाहू शकत नाहीत. म्हणून अशा स्वरूपाच्या समाज जीवनाकडे पाहताना ‘बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया...’, अशा स्वरूपाचे उद्गार मुखाविरंदातून बाहेर पडतात. त्यासाठी महात्मे कृतिशील राहतात.
स्वत:चे जीवन समाजासाठी खर्ची करत असतात. आपलाच एक आदर्श निर्माण करीत असतात. संतश्रेष्ठ तुकोबाराय प्रतिज्ञेने सांगतात की, ‘धन्य म्हणविले इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला...’’ मी असा एक जगेन की मला ज्या लोकांनी पाहिलेय ते म्हणतील आम्ही धन्य आहोत. अगदी महात्मा गांधीजींना सुद्धा विचारले होते की, ‘‘आपण एखादा संदेश द्या, त्यांवर गांधीजींनी माय लाईफ इज माय मॅसेज, माझे जीवनच माझा संदेश, आहे असे म्हटले होते. ही अहंकाराची भावना नाही. आपल्या जीवनावर असणारी श्रद्धा, विश्वास आहे. त्याचे हे प्रतीक आहे. तुकोबारायांनी म्हणावे की मी अशा पद्धतीने जगेन की ज्यांनी मला पाहिलेय ते मला धन्य म्हणतील. आणि योगायोग अशा स्वरूपाचा आहे की तुकोबारायांना ज्यांनी पाहिले. तुकोबारायांचा ज्यांचाशी व्यवहार आला ते रामेश्वर भट्टही म्हणाले की, ‘धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, तुकाराम-तुकाराम नाम घेता कापे यम....’’सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा की ही माणसे स्वत:चे जीवन अशा पद्धतीने जगली, की त्यांच्यामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य होईल, असे आचार, विचार असावेत. आपले जीवन दुसऱ्यांना प्रेरक ठरावेत. त्यातून माणसाचा विकास होणार आहे.