-सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा काही विद्यार्थी कुठल्यातरी सामाजिक कामासाठी वर्गणी गोळा करता करता गल्लीतल्या एका घराजवळ पोहोचले. त्यांनी दारावर टकटक केली. एका ऐंशी वर्षांच्या आजीने दार उघडलं. आजीने त्यांना आत बोलावलं. विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यांनी आजींना या कार्याला त्या वेगवेगळ््याप्रकारे कशी मदत करू शकतात, हे समजावून सांगितलं आणि मग ते आजींना म्हणाले, ‘तुम्ही सगळी रक्कम लगेच द्यायचीही गरज नाही, तुम्ही तीन वर्षांचा वायदा करू शकता.’ आजी म्हणाल्या, ‘मी या वयात आता कच्ची फळंसुद्धा पिकल्यावर खाईन म्हणून घेत नाही. तीन वर्षांचा वायदा तर शक्यच नाही.’ अध्यात्म मार्गाच्या प्रवाशांनीही असंच असलं पाहिजे. तुम्ही कच्ची केळीसुद्धा विकत घ्यायला कचरलं पाहिजे, तुम्हाला घाई असायलाच हवी! लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते. यासाठी सातत्य लागतं, मग प्रगतीही सातत्याने होत जाते व मग काही कालावधीतच तुम्हाला स्वत:मध्ये लक्षणीय फरक जाणवेल. तुम्ही सातत्य मात्र राखलं पाहिजे. तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘आॅन’ असलं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे मी कामावर जायचं नाही का? कुटुंबाबरोबर राहायचं नाही का? तर तुम्ही सर्वकाही एक आध्यात्मिक प्रक्रिया बनायचंय. लोकांशी बोलताना, आॅफिसमध्ये काम करताना, प्रत्येक कृती, तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास हे सर्व काहीएक आध्यात्मिक प्रक्रिया बनली पाहिजे. मग तुम्ही पाहाल की, काही महिन्यांतच तुम्ही एका वेगळ््या विश्वात असाल, जिथे तुमच्या अस्तित्वाचा सुगंध सर्वांनाच आनंद देईल. फक्त लोकच नव्हे, तर इतर जीवसृष्टीसुद्धा. अगदी प्राणिमात्र आणि वनस्पतीही तुम्हाला अप्रतिम प्रतिसाद देतील. तुम्ही फक्त सातत्य राखायला हवं. तुम्ही जर आॅन- आॅफ, आॅन-आॅफ असे करत राहिलात, तर मात्र यासाठी अनेक जन्म लागतील.
तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘ऑन’ असलं पाहिजे, म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 3:12 AM