झेन गुरू हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई. शुद्ध चारीत्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत. शेजारी पाजारी, त्या प्रांतातले सृलहान थोर असे सगळेच जण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते.
त्यांच्या मठाजवळच एक सुंदर मुलगी राहत होती. तिच्या वडिलांचं खाद्य पदार्थ विक्रीचं दुकान होतं. एके दिवशी अचानक पालकांच्या लक्षात आलं की, त्यांच्या मुलीला दिवस गेले आहेत. प्रचंड संतापलेल्या तिच्या पालकांनी तिला खडसावत विचारलं, तुझ्या पोटातल्या बाळाचा पिता कोण आहे? ती आधी तोंड उघडायला तयार नव्हती. अखेर पालकांनी खूपच दटावणी केल्यानंतर तिनं तोंड उघडलं आणि सांगितलं की हाकुईन तिच्या पोटातील बाळाचा पिता आहे. ज्याच्या शुद्ध चारीत्र्याचे गोडवे गायले जातात, तो हाकुईनमुळे आपल्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यावर तर त्यांचा राग अनावर झाला. ते संतापलेल्या अवस्थेत तसेच हाकुईनकडे गेले आणि त्यांनी हाकुईनना ही घटना सांगत जाब विचारला. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर हाकुईन यांनी फक्त इतकंच म्हटलं... हे असं आहे काय?, बरं!
मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला हाकुईन यांच्याकडे आणण्यात आलं. हाकुईन यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. मानमरातब गेला होता, कुणीही विचारत नाही अशी स्थिती झाली होती. तरीही दैनंदिन आचार विचारात कुठलाही फरक न पडलेल्या हाकुईन यांनी बाळाची चांगली काळजी घेतली. बाळाच्या पालनपोषणासाठी जे काही लागतं ते हाकुईन यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आणली आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सुरूवात केली.
असंच वर्ष निघून गेलं. त्या मुलीला हा प्रकार सहन होईना. तिनं अखेर पालकांना सत्य सांगितलं की तिच्या बाळाचा पिता हाकुईन नसून दुसराच एक तरूण आहे, जो मच्छीबाजारात काम करतो. हे कळल्यावर शरमिंदे झालेले त्या मुलीचे आई वडील पुन्हा हाकुईनकडे गेले. त्यांच्या पाया पडून माफी मागितली आणि बाळाला पुन्हा नेत असल्याचं सांगितलं.
बाळाची काळजी घेत असलेल्या हाकुईन यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले...हे असं आहे काय?, बरं!